जलशास्त्रज्ञांनी घेतले म्हादईच्या पाण्याच्या क्षारतेचे नमुने

0
194

रुरकी येथील राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी कणकुंबी येथील कळसा भांडुरा प्रकल्पाला भेट देत तेथील पाण्याच्या क्षारतेचा अभ्यास करण्यासाठी काल बुधवारी पाण्याचे नमुने गोळा केले. या पथकाने कळसा भांडुरा प्रकल्पाला दिलेली ही दुसरी भेट आहे. यापूर्वी दोन वैज्ञानिकांनी गेल्या सप्टेंबर महिन्यात कळसा भांडुरा प्रकल्पाला भेट देऊन पाण्याचे नमुने गोळा केले होते. पाण्याची क्षारता तपासण्यासाठी आता यापुढे मे महिन्यात पाण्याचे नमुने तपासण्यात येणार आहेत. तीन वेगवेगळ्या ऋतूंत पाण्याची क्षारता पहाण्यासाठी तीन वेळा ही तपासणी होणार आहे.

या अभ्यासाचा अहवाल शेवटी जलशक्ती मंत्रालयाकडे सुपूर्द करणत येणार आहे. त्या अहवालावर जलशक्ती मंत्रालय कर्नाटकने म्हादईचे पाणी वळवल्याने राज्यातील जल जैवसृष्टीवर काय परिणाम होऊ शकतो त्याबद्दल आपले म्हणणे मांडणार आहे. गोवा सरकारने मार्च २०२० मध्ये जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहून कर्नाटकने जे म्हादईचे पाणी वळवले आहे त्यामुळे राज्यात म्हादईच्या पाण्याची क्षारता वाढणार असून परिणामी जैव सृष्टीवर त्याचा गंभीर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त केली होती.