जर्मनी उपांत्यपूर्व फेरीत

0
85

एकतर्फी लढतीत जर्मनीने कोलंबियाचा ४-० असा पराभव करत फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. ‘अंतिम ८’मध्ये त्यांचा सामना ब्राझिल व होंडुरास यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.

कोलंबिया व जर्मनी यांच्यात काल सोमवारी झालेली उपउपांत्यपूर्व फेरीची लढत अटीतटीची होण्याची अपेक्षा होती. परंतु, कोलंबियाचा खेळ शेवटपर्यंत खुलला नाही. तसेच जर्मनीच्या आक्रमकतेसमोर त्यांचा निभाव लागला नाही.

सामन्याच्या सुरुवातीपासून जर्मनीने आक्रमकतेची कास धरली. याच जोरावर सातव्याच मिनिटाला त्यांनी आघाडी घेतली. जर्मनीचा कर्णधार जेन फिएटे आर्प याच्या दृष्टिक्षेपात असलेला चेंडू गोलरक्षक केव्हिन मियर याला ताब्यात घेण्यात अपयश आल्याने कोलंबियाला पहिला गोल स्वीकारावा लागला. आर्प याने या चेंडूवर ताबा मिळवून एका अवघड कोनातून चेंडूला गोलजाळीची दिशा दाखवली. कोलंबियाने काही चांगल्या चाली रचत जर्मनीच्या बचावफळीची परीक्षा पाहिली. परंतु, त्यांच्या खेळात सातत्याचा अभाव जाणवला. जर्मनीच्या जॉन येबोहा याला ३४व्या मिनिटाला सुवर्णसंधी प्राप्त झाली होती. परंतु, दुर्देवाने त्याने लगावलेला फटका क्रॉसबारला लागून बाहेर गेला. येबोहा याने गमावलेल्या संधीमुळे कोलंबियाचा संघ सुस्कारा सोडत असताना ३९व्या मिनिटाला साहवर्दी केटिन याच्या क्रॉसवर यान बिसेक याने हेडरद्वारे अप्रतिम गोल करत जर्मनीची आघाडी २-० अशी फुगवली. पहिले सत्र गाजवल्यानंतर जर्मनीने दुसर्‍या सत्रातही वर्चस्व कायम राखले. कोलंबियाच्या बॉक्समध्ये आर्प याने दिलेल्या पासवर जॉन येबोहा याने ४९व्या मिनिटाला जर्मनीचा तिसरा गोल फलकावर लगावला.

६५व्या मिनिटाला आर्प याने संघाचा चौथा व स्वतःचा दुसरा गोल करत संघाचा विजय साकारला. यादरम्यान त्यांचा ‘विंगर’ डेनिस जास्त्राझेमबेस्की याला पिवळे कार्ड मिळाल्याने त्याला पुढील सामन्याला मुकावे लागणार आहे.