अमेरिका ‘अंतिम ८’ संघात; विआची शानदार हॅट्‌ट्रिक

0
76

टिम विआ याने नोंदविलेल्या शानदार हॅट्‌ट्रिकच्या जोरावर अमेरिकेने फिफा अंडर १७ विश्‍वचषक स्पर्धेतील सामन्यात ५-० असे लोळवून ‘अंतिम ८’ संघांत स्थान मिळविले. उपउपांत्यपूर्व फेरीतील हा सामना जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात आला.

पहिल्या सत्रात पॅराग्वेकडे अधिक वेळ चेंडूचा ताबा होता. परंतु, संधी निर्माण करण्यात मात्र अमेरिकेने बाजी मारली. सामन्याच्या १९व्या मिनिटाला अँडी कार्लटन व अयो अकिनोला यांनी रचलेल्या चालीवर पॅरिस सेंट जर्मेनच्या विआ याने या स्पर्धेतील व सामन्यातील पहिला गोल नोेंदविला. मध्यंतराला काही मिनिटे असताना ख्रिस गॉसलिन याने संघाची आघाडी दुप्पट करण्याच्या उद्देशाने लांब अंतरावरून जोरदार फ्री किक लगावली. परंतु, पॅराग्वेच्या दक्ष बचावफळीने संभाव्य धोका टाळला. अतिरिक्त वेळेतही अमेरिकेचा संघ गोल नोंदविण्याच्या अगदी जवळ आला होता. परंतु, पॅराग्वेने मध्यंतरापर्यंत केवळ एका गोलची पिछाडी राखण्यात यश मिळविले. पहिल्या सत्रात काही संधी गमावल्यानंतर दुसर्‍या सत्राची सुरुवात अमेरिकेने वेगवान केली. ५३व्या मिनिटाला विआ याने डोळ्यांचे पारणे फेडणारा गोल केला. पॅराग्वेचा गोलरक्षक दिएगो हुएस्का याला कोणतीही संधी न देता विआ याने प्रेक्षकांनादेखील स्तंभित केले. अँडी कार्लटन याने ६३व्या मिनिटाला अमेरिकेचा तिसरा गोल करताना ७४व्या मिनिटाला चौथा गोल नोंदविण्यात कर्णधार जॉश सार्जंटला सहाय्य केले. अवसान गळालेल्या व खांदे पाडलेल्या पॅराग्वे संघावर वीअ याने ७७व्या मिनिटाला स्वतःचा तिसरा गोल करत हॅट्‌ट्रिक पूर्ण केली. शनिवारी गोव्यात होणार्‍या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेचा सामना इंग्लंड व जपान यांच्यातील विजेत्या संघाशी होणार आहे.