अजय जयरामसह भारताच्या पाच बॅडमिंटनपटूंनी रशिया ओपन ‘बीडब्ल्यूएफ टूर सुपर १००’ या ७५,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेच्या स्पर्धेची काल दुसरी फेरी गाठली. या महिन्याच्या सुरुवातीला व्हाईट नाईट्स आंतरराष्ट्रीय चॅलेंज स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेल्या जयरामने कॅनडाच्या शियाओडोंग शेंग यांचा पहिल्या फेरीत २१-१४, २१-८ असा पराभव केला. पहिल्या फेरीत ‘बाय’ मिळालेल्या शुभंकर डे याच्याशी त्याचा दुसर्या फेरीत सामना होणार आहे.
प्रतुल जोशी याने एकतर्फी लढतीत कॅनडाच्या जेफ्री लाम याचा २१-११, २१-८ असा पाडाव केला. आज बुधवारी स्पोटर्स हॉल ऑलिम्पिक कोर्टवर त्याचा सामना इस्रायलच्या मिशा झिल्बरमन याच्याशी होणार आहे. अन्य भारतीयांमध्ये मिथुन मंजुनाथ, सिद्धार्थ प्रताप सिंग व राहुत यादव चित्ताबोईना यांनीदेखील दुसरी फेरी गाठली. मिथुन याने बेल्जियमच्या इलियास ब्राके याला २१-१४, २१-१३ असे अस्मान दाखविले तर सिद्धार्थने मलेशियाच्या जिया वेई टान याला २१-१७, २१-१६ असे पराजित केले. राहुलने रशियाच्या माकसिम माकालोव याला २१-११, २१-१० अशी धूळ चारली. राहुलचा सामना भारताच्या आठव्या मानांकित सौरभ वर्मा याच्याशी तर सिद्धार्थची लढत बोधित जोशी याच्याशी होणार आहे.