जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यातील चकुरा परिसरात काल जवान व दहशतवाद्यांमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. शिवाय या परिसरात अद्यापही शोधमोहीम सुरू आहे. जम्मू-काश्मीर खोर्यात काही दिवसांत दहशतवादी कारवाया वाढल्याचे दिसत असताना, या अगोदर पाच दिवसांत जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. तर, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण देखील केले होते. शिवाय, दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचादेखील खात्मा झाला आहे.
पाकिस्तानमधील असलेल्या लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा तीन दहशतवादी हल्ल्यात सहभाग होता. ज्यामध्ये सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. तर, आत्मसमर्पण केलेला दहशतवादी डोडा येथील रहिवासी असून, त्याची चौकशी सुरू आहे. अशी माहिती जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनी दिली होती.
याशिवाय या वर्षात आतापर्यंत ७५ यशस्वी मोहिमा राबवल्या गेल्या, ज्यामध्ये १८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला. स्वतंत्रपणे, १३८ दहशतवादी आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती डीजीपी दिलबाग सिंग यांनीदिली.