जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सोमवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत चार भारतीय जवान शहीद झाले. त्यात एका लष्करी अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या कारवाईत शहीद झालेल्या जवानांची नावे कॅप्टन ब्रिजेश थापा, नाईक डी. राजेश, शिपाई बिजेंद्र आणि शिपाई अजय नरुका अशी आहेत. लष्कराचे जवान आणि जम्मू-काश्मीर पोलीस सोमवारी सायंकाळपासून डोडा जिल्ह्यातील धारी गोटे उरारबागीमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात शोधमोहीम राबवत होते, त्यानंतर झालेल्या चकमकीत 4 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
सविस्तर माहितीनुसार, डोडा जिल्ह्यातील जंगलात दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम राबवण्यात आली होती. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. त्यानंतर लष्कराच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्यानंतर दहशतवादी पळू लागले, तेव्हा सैनिकांनी त्यांचा पाठलाग केला. परिसरात घनदाट जंगल असल्याने दहशतवादी जवानांना चकवा देत राहिले. त्यानंतर रात्री 9 वाजता पुन्हा गोळीबार सुरू झाला. त्यामध्ये लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह अन्य 3 जवान गंभीर जखमी झाले. त्यानंतर रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
एका महिन्यात 5 वेळा हल्ला
जम्मूतील डोडा येथे गेल्या 32 दिवसांतील ही पाचवी चकमक आहे. यापूर्वी (9 जुलै) रोजी सुद्धा चकमक झाली होती. तसेच (8 जुलै) रोजी जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते.
राहुल गांधींनी वाहिली श्रद्धांजली
लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी शहीद झालेल्या चार जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. हे सततचे दहशतवादी हल्ले जम्मू-काश्मीरची बिकट स्थिती उघड करत आहेत. भाजपच्या चुकीच्या धोरणांचा फटका आमचे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना भोगावे लागत आहेत. वारंवार होणाऱ्या सुरक्षेतील त्रुटींची संपूर्ण जबाबदारी सरकारने स्वीकारावी, ही प्रत्येक भारतीयाची मागणी आहे. देशाचे आणि सैनिकांचे नुकसान करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करा, या दुःखाच्या काळात संपूर्ण देश दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे.