जम्मूत दोन लष्करी अधिकारी व पाच जवान शहीद

0
84

येथून १५ किलो मीटर अंतरावर असलेल्या नगरोटा येथे काल पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास भारतीय लष्कराच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २ लष्करी अधिकारी व ५ जवानांना वीर मरण आले असून भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत चारही दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याशिवाय सांबा व चमलियाल भागांमध्ये गस्तीवर असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला करणार्‍या तीन दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी ठार केले आहे. दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्यांची जवानांनी सुटका केली आहे.

नागरोटा येथे लष्कराच्या १६ व्या कोअरचे मुख्यालय आहे. लष्करासाठी हा अत्यंत संवेदनशील भाग असून या भागाला दहशतवाद्यांनी अत्याधुनिक शस्त्रांसह लक्ष करीत आत ग्रेनेड फेकले व नंतर अंदाधुंद गोळीबार केला. दहशतवादी लष्कराचे अधिकारी, त्यांचे कुटुंब राहत असलेल्या दोन इमारतींमध्ये घुसले व त्यांनी १२ जवान, दोन महिला व दोघा मुलांना ओलीस ठेवले. यावेळी दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत भारतीय जवानांनी चार आतंकवाद्यांना कंठस्नान घातले. या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा हल्ला लष्करी तळाच्या जवळ झाला असून लष्करी तळावरच हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. लष्कराने आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. मात्र, नेमके किती दहशतवाद्यांनी हल्ला चढवला याची माहिती अद्याप लष्कराला मिळालेली नाही. त्यांच्याकडून ३ एके ४७ रायफल्स, २० एके मॅगाझिन्स, ३१ ग्रेनेड तसेच युद्ध सामग्री सापडली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्याची मोहीम सुरू असून ती आज सकाळपर्यंत सुरू राहणार असल्याचे लष्कराचे अधिकारी मनीष मेहता यांनी सांगितले. उरी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक्स केल्यापासून दहशतवाद्यांनी आतापर्यंत डझनभर हल्ले केले आहेत.

महाराष्ट्राचे दोन वीर शहीद
नागरोटा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या दोघा जवानांना वीर मरण आले आहे. शहीद झालेल्यांमध्ये पंढरपूरचे मेजर कुणाल गोवासी व नांदेडमधील लोहा तालुक्यातील जानापुरी येथील संभाजी कदम यांचा समावेश आहे. गोसावी यांची सहा महिन्यांपूर्वीच जम्मू-काश्मीर येथे नियुक्ती झाली होती.