>> मंत्री गोविंद गावडे यांची माहिती; कला अकादमी नूतनीकरणाचे काम २ महिन्यांत पूर्ण
म्हापसा येथील रवींद्र भवनाचे बांधकाम जमिनीअभावी मार्गी लागू शकलेले नाही. जमीन उपलब्ध झाल्यास म्हापसा, पेडणे आणि सांगे येथील रवींद्र भवनाची कामे प्राधान्यक्रमाने हाती घेतली जाणार आहेत, असे कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी विधानसभेत कला-संस्कृती, क्रीडा खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल सांगितले.
बार्देश ही कलाकारांचा खाण आहे; परंतु, रवींद्र भवनासाठी जागा मिळत नाही. गेली बारा वर्षे रवींद्र भवन बांधकामाच्या केवळ चर्चा केल्या जात आहेत, असे विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी अनुदानित मागण्यांवरील चर्चेत बोलताना म्हटले होते. तसेच राज्यात क्रीडा क्षेत्रात साधनसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे राष्ट्रीय खेळाचे आयोजन करू शकलेला नाही, असेही लोबो म्हणाले.
कला आणि क्रीडा क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज आहे. कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या कामासाठी तीन संस्थांकडून सल्ला घेण्यात आला. कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे, असे मंत्री गावडे यांनी सांगितले.
गोवा राज्याला पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याची संधी मिळेल, असा विश्वास मंत्री गावडे यांनी व्यक्त केला. राज्यात क्रीडा साधनसुविधा उभारण्यात आलेल्या आहेत; परंतु त्यांची योग्य देखभाल केली जात नाही, असेही गावडे म्हणाले.
राज्यात क्रीडापटूंसाठी नोकरीत २ टक्के आरक्षण मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्यातील क्रीडा संस्थांना राष्ट्रीय क्रीडा कोडची अंमलबजावणी सूचना करण्यात आली आहे. गोवा राज्य अकादमीची स्थापना केली जाणार आहे. राज्यात क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याची गरज आहे. क्रीडापटूंना विमा संरक्षण दिले जाणार आहे. क्रीडा प्रशिक्षक आणि इतरांचे प्रलंबित मानधन येत्या चतुर्थीपूर्वी वितरित केले जाणार आहे. क्रीडा खात्याच्या कामचुकार कर्मचार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.