>> वाळपईत सत्तरीवासीयांची मोर्चाद्वारे मागणी
>> सत्तरही गावातील नागरिकांचा सहभाग
सत्तरीकरांना जमिनीचा संपूर्ण मालकी हक्क द्या अन्यथा जनक्रोधाला सामोरे जा असा इशारा काल मंगळवारी वाळपईत सत्तरीतील भूमिपुत्रांनी आयोजित केलेल्या मोर्चात सरकारला दिला. काल सकाळी वाळपई हातवाडा येथून या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी सुमारे पाच हजार सत्तरीतील भूमिपुत्र सहभागी झाले होते. सत्तरीतील साठ वर्षांच्या इतिहासात हा मोर्चा महत्त्वपूर्ण मानली जाते. जमिनीच्या मालकी हक्काच्या या मोर्चासाठी सत्तरी तालुक्यातील सर्व सत्तरही गावांतून नागरिक सहभागी झाले होते.
‘आमचे जमनी आमकां जाय’ अशा घोषणांनी वाळपई शहर दुमदुमून गेले सकाळी अकरा वाजता सुरू झालेला हा मोर्चा वाळपई बाजारात आल्यानंतर त्याचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी गणपत गांवकर, दशरथ मांद्रेकर, राजेश गांवकर, रणजीत राणे, कृष्णा गावस, विश्वेष परब, सुहास नाईक, शंकर नाईक, शिवाजी देसाई यांची उपस्थिती होती.
अभयारण्यातील जमिनींना
मालकी हक्क द्या ः गावकर
सत्तरीतील ३२ गाव म्हादई अभयारण्यात येतात. त्या जमीन मालकांना मालकी हक्क द्या अशी मागणी राजेश गांवकर यांनी केली. ह्या जमिनीत हेतुपुरस्सर अभयारण्य केले असून त्याला जबाबदार सत्तरीतील लोकप्रतिनिधी असल्याचा आरोप यावेळी गावकर यांनी केला.
महसूल खात्याच्याही
जमिनीची मालकी हवी
महसूल खात्याने चुकीच्या पद्धतीने भूमिपुत्रांच्या जमिनी आपल्या नावावर करून घेतल्या आहेत. त्या जमिनींचा मालकी हक्क द्या अशी मागणी गणपत गांवकर यांनी केली.
गावठण जमिनी द्या
सत्तरीतील अधिकांश घरे ही गावठण जमिनीत येतात. पण त्या घरांचा मालकी हक्क मिळालेला नाही. त्या जमिनीचा मालकी हक्क द्या अशी मागणी रणजीत राणे यांनी केली.
मोकासदारी बरखास्त करा
सत्तरीतील भूमिपुत्रांची जमिनीसाठी लढाई गेली साठ वर्षे सुरू आहे. राज्यकर्ते सत्तरीतील भूमिपुत्रांची दिशाभूल करीत आहेत. गेली साठ वर्षे फक्त भाषणे ऐकत आहोत. पण आता निर्णायक लढाई असून जमीन मालकी हक्कावरून क्रांतीची ज्योत पेटत ठेवली पाहिजे. सत्तरीतील भूमिपुत्रांची मोकासदार सतावणूक करत असून बारीक गोष्टींसाठी भूमिपुत्रांना मोकासदारांकडे जावे लागते. त्यासाठी सत्तरीतील मोकासदारी बरखास्त करा अशी मागणी दशरथ मांद्रेकर यांनी केली.