
जेजे लालपेख्लुआने पेनल्टीवर नोंदविलेल्या एकमेव गोलमुळे चेन्नईन एफसीने हीरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीला १-० असे पराभूत केले. पूर्वार्धात जेजे लालपेखलुआ याने पेनल्टीवर केलेला गोल चेन्नईसाठी तारक ठरला, तर त्यानंतर काही मिनिटांत पेनल्टी दवडलेल्या र्केवेन्स बेल्फोर्टची चूक जमशेदपूरसाठी मारक ठरली.
चेन्नईने आठ सामन्यांत १६ गुणांसह आघाडी वाढविली. हा त्यांचा पाचवा विजय आहे. एक बरोबरी व दोन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. एफसी गोवा, बेंगळुरू एफसी आणि एफसी पुणे सिटी यांचे प्रत्येकी १२ गुण आहेत. जमशेदपूर नऊ गुणांसह सहाव्या क्रमांकावर कायम राहिले. पुर्वार्धाचा अंतिम टप्पा नाट्यमय ठरला. ४१व्या मिनिटाला जमशेदपूरचा मेहताब होसेन चेंडूवर ताबा मिळविताना पडला. चेन्नईच्या फ्रान्सिस्को फर्नांडीसने संधी साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी चेंडू मेहताबच्या हाताला लागला. त्यामुळे पंचांनी चेन्नईला पेनल्टी बहाल केली. जेजेने जॉगिंगच्या शैलीत नेटच्या उजव्या कोपर्यात मैदानालगत फटका मारला. तेव्हा जमशेदपूरचा गोलरक्षक सुब्रत पॉल याने चेंडू सरळ येण्याचा अंदाज बांधला असावा. त्यामुळे तो चकला. जेजेने खाते उघ़डताच चेन्नईच्या खेळाडूंनी जल्लोष केला.