जेरी माहमिंगथांगा आणि अशिम बिश्वास यांनी नोंदविलेल्या गोलांच्या जोरावर हीरो इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) जमशेदपूर एफसीने घरच्या मैदानावरील विजयाची प्रतीक्षा अखेर दुसर्या टप्यात संपुष्टात आणली. त्यांनी केरळा ब्लास्टर्सला २-१ असे हरविले. दहा नंबरची जर्सी घालणारा स्ट्रायकर जेरी माहमिंगथांगा याने केवळ २२व्या सेकंदाला खाते उघडले. हा गोल जमशेदपूरच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरला.
जमशेदपूरचे दोन्ही गोल पूर्वार्धात झाले. सहा मिनीटांच्या भरपाई वेळेतील चौथ्या मिनीटाला मार्क सिफ्नेऑसने ब्लास्टर्सची पिछाडी कमी केली. जमशेदपूरने दहा सामन्यांत तिसरा विजय मिळविला. चार बरोबरी व तीन पराभव अशी त्यांची कामगिरी आहे. १३ गुणांसह एक क्रमांक प्रगती करीत जमशेदपूरने एटीकेला (१२ गुण) मागे टाकत सातवा क्रमांक मिळविला. ब्लास्टर्सला ११ सामन्यांत तिसरा पराभव पत्करावा लागला. तीन विजय व पाच बरोबरींसह १४ गुण मिळवून त्यांचे सहावे स्थान कायम राहिले.