ही अस्मिता जपूया!

0
173

गोव्याच्या जनमत कौलाच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता काल ‘अस्मिताय दिस’ च्या रूपाने सरकारने साजरी केली. किंबहुना सरकारमधील घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डने भाजपला ते करणे भाग पाडले असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. भाजपाच्या विरोधात रान पेटवून निवडणूक लढलेल्या, परंतु एका रात्रीत जादू होऊन भाजपच्याच वळचणीला आलेल्या गोवा फॉरवर्डवर त्याचे मतदार – विशेषतः ख्रिस्ती मतदार प्रचंड नाराज आहेत. आपल्यापासून दूर गेलेल्या या ख्रिस्ती मतदारांना जनमत कौलाचे भूत उकरून काढून, ‘अस्मिताये’ चे ढोल पिटून आणि जॅक सिक्वेरांचा उदोउदो करून जवळ ओढण्यासाठीच विजय सरदेसाई यांची ही धूर्त राजकीय खेळी आहे. परंतु जुन्या जखमेवरची खपली काढल्यास ती चिघळते याचे भान त्यांच्यामागे फरफटत चाललेल्यांना राहिलेले दिसत नाही. जनमत कौलात विलीनीकरणाच्या बाजूने भाऊसाहेब बांदोडकरांच्या पाठीशी जो बहुजन समाज उभा होता, त्याच्या जखमेवरची खपली यातून निघाली आहे. ‘गोवा मुक्त झाला तरीही अनेकांचे पोर्तुगीजधार्जिणेपण हटले नव्हते. त्यामुळे विलीनीकरणाचा पुरस्कार करणे म्हणजे भारताशी ऐक्य ही हिंदू बहुजन समाजाची भावना होती, तर विलीनीकरण म्हणजे हिंदूंच्या वर्चस्वाखाली राहणे ही ख्रिस्ती समाजाची भावना बनली, त्यामुळे त्यांनी विलीनीकरणाविरोधात एकगठ्ठा मतदान केले’ हे ज्येष्ठ पत्रकार स्व. वामन राधाकृष्ण यांनी जनमत कौलाचे केलेले विश्लेषण सार्थ आहे. विलीनीकरणाविरोधात बहुसंख्य जनतेचा कौल मिळवणे हे केवळ जॅक सिक्वेरांचेच कर्तृत्व नव्हते. पुरुषोत्तम काकोडकर, उदय भेंब्रे, उल्हास बुयांव यासारख्या अनेकांचे त्यात सक्रिय योगदान राहिले. मात्र, आज पन्नास वर्षांनंतर ‘याचसाठी केला होता का अट्टहास’ हा प्रश्न स्वतः भेंब्रे विचारत आहेत त्यातच सारे आले. गोव्याच्या ज्या स्वतंत्र अस्मितेचा पुरस्कार विलीनीकरण विरोधकांनी केला ती आज राहिलीय कुठे हा खरा प्रश्न आहे. दुधापासून मासळीपर्यंत आणि भाजीपासून फळांपर्यंत येथे सगळे काही बाहेरून येते. येथील पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा झाले आहेत. सलूनपासून हलवायापर्यंत सारे व्यवसाय परप्रांतीय चालवतात. राजधानी पणजीत दुकानदारांशी हिंदीत बोलावे लागते अशी परिस्थिती आहे. गोवेकर ख्रिस्तींनी आखातात किरकोळ नोकर्‍या करण्यात आणि फार तर पोर्तुगीज पासपोर्ट करून युरोपमध्ये घुसण्यात धन्यता मानली. येथील सरकारी आणि खासगी नोकर्‍यांमध्ये आजही उच्चपदस्थ परप्रांतीय दिसतात. हक्काचे घर घेणे गोवेकरांच्या आवाक्यात उरलेले नाही. मग गेल्या पन्नास वर्षांमध्ये आपली अस्मिता जोपासण्यासाठी आपण केले काय? ‘‘नको आम्हाला श्रीखंड पुरी, अमुची शीत कढीच बरी’’ म्हणणार्‍यांनी स्वतः मात्र श्रीखंड ओरपले. गोवा आज गोवा उरलेला नाही. तो दिवसेंदिवस आपली ओळख गमावत चालला आहे आणि अशा स्थितीत ‘अस्मिताये’च्या इतिहासात लोकांना गुंगवण्यात काय हशील? उलट जुने विषय अकारण उकरण्याचा प्रयत्न झाल्यास त्यातून सामाजिक आणि भाषिक तेढ निर्माण होण्याचा धोका आहे हे माध्यमांतून आणि सामाजिक माध्यमांतून उमटणार्‍या प्रतिक्रियांतून दिसते आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये गोवा मुक्तीलढ्याचा इतिहास विस्ताराने अवश्य यावा, कुंकळ्ळीचे बंड यावे, राष्ट्रवादी विचारांच्या ख्रिस्ती सेनानींनी गोवा मुक्तीला दिलेले योगदान यावे, मुक्तिपूर्व काळामध्ये ‘भारत’कारांसारख्यांनी बजावलेली भूमिका स्मरली जावी, परंतु तो सारा देशभक्तीने ओथंबलेला इतिहास विसरून गेल्या पन्नास वर्षांतील सामाजिक आणि भाषिक तेढ मुलांना शिकवण्याच्या या काव्यामागील कारणे कोणती? गोवा फॉरवर्डच्या या आततायी मागणीला सरकारमधील घटकपक्ष असलेला मगो षंढपणे सहमती दर्शवतो हे खरोखरीच आश्चर्यकारक आहे. मगोने आपला इतिहास आणि भाऊसाहेबांचा वारसा सत्तेसाठी बासनात तर गुंडाळलेला नाही ना? गोवा फॉरवर्डमागे कोठवर फरफटत जायचे ते भाजपानेही ठरवावे लागेल. गोव्याची अस्मिता जपायची असेल तर त्यासाठी इतिहास उकरण्यापेक्षा आणि अस्मितायेची गुंगी समाजाला देण्यापेक्षा भविष्याचा वेध घेऊन वर्तमानामध्ये कणखर पावले अपेक्षित आहेत. गोव्याच्या जमिनी, गोव्याचे डोंगर, गोव्याचा निसर्ग, गोव्याची संस्कृती जपण्याची आवश्यकता आहे. वाढते शहरीकरण, ड्रग्स, कॅसिनोंचा विळखा यात घुसमटणार्‍या गोव्याचा श्वास मोकळा करण्याची गरज आहे. गोव्यातून गोमंतकीय हद्दपार होण्याची वेळ येऊन ठेपलेली असताना रोजगारापासून व्यवसायांपर्यंत त्याला त्याच्या पायांवर उभ्या करणार्‍या कणखर धोरणांची आवश्यकता आहे. अन्यथा उद्या मडगावच्या ‘अस्मिताय चौका’त परप्रांतीय मजुरांच्या झुंडी जमू लागल्या तर त्यासारखा दैवदुर्विलास नसेल!