जबाबदारीने वागूया!

0
173

वास्कोतील मांगूर हिल परिसरामध्ये एका मच्छिमाराचे संपूर्ण कुटुंब आणि त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. गोव्याच्या जनतेची झोप उडवणारे हे वृत्त आहे यात शंका नाही, कारण प्रथमच राज्यामध्ये कोरोनाचे स्थानिक संक्रमण झालेले असण्याची दाट शक्यता येथे दिसते आहे. गेले दहा पंधरा दिवस हा मच्छिमार आणि त्याचे कुटुंबीय कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणे नसल्याने मुक्तपणे वावरत होते, स्थानिक जनतेमध्ये मिसळत होते. खोकला आणि तापाचा असर वाढल्यानंतरच त्याने डॉक्टरांना गाठले आणि डॉक्टरांनी त्याला तपासून कोविड चाचणी करण्याचा सल्ला दिला. परंतु या दरम्यान कळत नकळत कोरोना संक्रमणाची एक साखळी तयार झाली. त्यामुळे या काळामध्ये या कुटुंबाकडून आणखी किती स्थानिक व्यक्तींपर्यंत कोरोना विषाणूचे हे लोण नकळता गेलेले असेल सांगता येत नाही.
मांगूर हिल हा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. अंतर्गत गल्ल्यांमधून येथे नागरिक दाटीवाटीने राहतात. त्यामुळे मुंबईतील धारावीमध्ये जे घडले, ते या परिसरातून घडू नये यासाठी आरोग्य खात्याला फार मोठा खटाटोप आता करावा लागणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य वेळीच ओळखून मांगूर हिलचा हा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांना केली आणि त्यांनीही तत्पर हालचाली करून त्या मागणीची तात्काळ पूर्तता केली ही बाब त्यातल्या त्यात दिलासादायक आहे, कारण कोरोनाचा आणखी फैलाव होणे या निर्बंधांमुळे यापुढील काळात तरी टळू शकेल.
मांगूर हिलमधील ज्या परिसरात या मच्छिमाराचे कुटुंब राहते, तो भाग आता कंटेनमेंट झोन घोषित झाल्यामुळे निर्बंधित राहील. आतील लोकांना बाहेर जाता येणार नाही आणि आत जाणार्‍यांना पुन्हा बाहेर येता येणार नाही. या निर्बंधांचे कसोशीने पालन होईल हे सुरक्षा यंत्रणेला पाहावे लागेल. आरोग्य खात्यावर मोठी जबाबदारी आता आहे ती म्हणजे या कंटेनमेंट झोनमधील प्रत्येक व्यक्तीची कोविड तपासणी करून त्यापैकी जो कोणी पॉझिटिव्ह येईल, त्याच्या संपर्कात गेल्या दहा पंधरा दिवसांत आलेल्या व्यक्तींची यादी बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि त्यांचीही कोविड तपासणी करून संसर्गाच्या संशयाचे निराकरण करणे. कोरोनाची साखळी ही अशी निर्माण होत असते आणि गुणाकाराने वाढत जात असते. त्यामुळे जेवढ्या लवकर ही साखळी तोडता येईल तेवढी संक्रमणाला आटोक्यात ठेवण्याची शक्यता बळावते, नाही तर परिस्थिती हाताबाहेर जायला फार वेळ लागत नाही.
मांगूर हिलमध्ये जे घडले आहे ते स्थानिक संक्रमणापुरते म्हणजे लोकल ट्रान्समिशनपुरते सीमित आहे की त्याही पलीकडचा सामाजिक संक्रमणाचा किंवा कम्युनिटी ट्रान्समिशनचा टप्पा एव्हाना गाठला गेला आहे हे फार महत्त्वाचे असणार आहे, कारण एकदा का असे कम्युनिटी ट्रान्समिशन झाले की गुणाकारांची ती साखळी तोडणे फार फार कठीण असते. आज देशातील महानगरांमध्ये कोरोना आटोक्यात येत नाही, त्याचे कारण हेच आहे. कंटेनमेंट झोनच्या बाहेर जेव्हा तो पसरत जातो, तेव्हा तो कुठून कुठे आणि कसकसा पसरत गेला आहे हे शोधणेच कठीण बनलेले असते. त्यामुळे संपर्क साखळीचे दुवे जोडत जोडत त्या प्रत्येक दुव्याची कोविड तपासणी करीत जाणे आपल्या हाती राहात नाही. एव्हाना तो विषाणू समाजामध्ये संक्रमित झालेला असतो.
गोव्यात आजवर आढळलेले सर्वच्या सर्व रुग्ण बाहेरून आलेले आहेत असे सरकार आतापर्यंत सांगत आले. स्थानिक संक्रमणाची प्रत्येक शक्यता आजवर सरकारने फेटाळून लावली. राज्यात येणार्‍या प्रत्येकाची कोविड तपासणी करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे याची शेखीही गोव्याने आजवर मिरवली. मग या मांगूर हिलच्या मच्छीमाराला कोरोनाची देणगी कोणी दिली या प्रश्नाचे उत्तर आता सरकारला शोधावे लागेल. संबंधित व्यक्ती मच्छीमार आहे आणि आंध्र प्रदेशातून येणारी मासळी खरेदी करण्याचा आणि विक्री करण्याचा तिचा व्यवसाय आहे. या व्यवहारादरम्यान परराज्यातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात तो आला असेल का हे आता तपासावे लागणार आहे. मग प्रश्न येईल की ती परराज्यातील व्यक्ती सीमेवरील तपासणीला फाटा देऊन आतपर्यंत कशी आली? कोरोनाबाबत पुन्हा पुन्हा सांगण्याजोगी बाब हीच आहे की त्याचे ऐंशी टक्क्यांहून अधिक रुग्ण हे कोणत्याही बाह्य लक्षणांविना वावरत असतात. त्या काळात स्वतःच्याही नकळत कोरोना विषाणूचे वाहक बनून ते वावरत असतात. आज कोरोना सगळ्या जगामध्ये पसरला आहे आणि अमेरिकेसारख्या महाबलाढ्य देशालाही त्याने हवालदिल करून सोडले आहे ते त्याच्या याच गनिमी काव्यामुळे. त्यामुळे गोमंतकीय जनतेचा याबाबतीतला आजवरचा सुशेगादपणा फार महाग पडेल हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत आलो आहोत. कोरोनाचे स्थानिक वा सामाजिक संक्रमण झाले तर त्याचा सर्वच दोष सरकारच्या माथी मारता येणार नाही. जनतेचेही म्हणून काही कर्तव्य आहे. सरकारने जागृत जनतेच्या दबावाखातर का होईना, राज्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला कोविड चाचणी सक्तीची करून महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. आपल्या तपासणी यंत्रणेची क्षमता वाढविली आहे. पण म्हणून जनतेने मात्र बेफिकिर राहावे हे योग्य नव्हे. आजही गोव्याच्या रस्तोरस्ती मास्कही न घालता मुक्तपणे फिरणारे लोक मोठ्या संख्येने दिसतात. अशा बेफिकिर लोकांना इतरांनी जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे, कारण शेवटी ही बेफिकिरी सर्वांच्याच जिवाशी खेळ मांडणारी ठरेल. मास्क हाताळावा कसा याचेही ज्ञान अनेकांना दिसत नाही. केवळ सरकार सांगते आहे म्हणून तोंडाला मास्क लटकावून फिरणार्‍यांना त्यामागची कारणे, त्याच्या हाताळणीचे तंत्र आणि त्यामागचे गांभीर्य समजावून सांगण्याची गरज आहे. हे सगळे सरकार करू शकणार नाही. हे जनतेनेच करावे लागेल. कोरोना हा असा संसर्ग आहे की ज्यात एखाद्या व्यक्तीचे अनारोग्य हे केवळ त्या व्यक्तीपुरते सीमित राहात नाही. इतरांच्या जिवालाही ते धोका पोहोचवू शकते. त्यामुळे जनजागृतीची ही सामूहिक जबाबदारी सर्वांनाच उचलावी लागेल. सरकारचे काही चुकत असेल, त्रुटी असतील, तर त्याविरुद्ध आवाज उठवावाच, परंतु स्वयंशिस्तीचे पालन जनतेनेही करणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सामूहिक संकल्पशक्तीचा आपल्या ‘मनकी बात’मध्ये उल्लेख केला, ती सामूहिक संकल्पशक्ती प्रत्यक्ष जीवनव्यवहारामध्ये प्रकटली पाहिजे ती यासाठीच. मांगूर हिलच्या घटनेने तरी गोमंतकीय बोध घेतील आणि यापुढे कोरोनासंदर्भात अधिक काळजी घेतील, अधिक जबाबदारीने वागतील अशी आशा करूया!