
>> ‘फेअर प्ले’च्या आधारे आगेकूच
अकिरा निशिनो यांच्या जपानने पोलंडकडून ०-१ असा पराभव पत्करूनही फिफा विश्वचषक स्पर्धेच्या ‘अंतिम १६’ संघात स्थान मिळविले आहे. जपानच्या पराभवानंतर व कोलंबियाने सेनेगलला हरविल्यामुळे जपान व सेनेगलचे प्रत्येकी ४ गुण झाले. दोघांनी प्रत्येकी ४ गोल नोंदविल्यामुळे गोल फरकदेखील शून्य झाला. यामुळे ‘फेअर प्ले’ पद्धतीचा वापर करून जपानचा बाद फेरीतील प्रवेश मोकळा करण्यात आला. गट फेरीत सेनेगलला ६ व जपानला केवळ चार यलो कार्ड मिळाल्याने या पद्धतीच्या आधारे सेनेगलला बाद ठरविण्यात आले.
‘समुराई ब्ल्यू’ म्हणून ओळखल्या जाणार्या जपानने आपल्या पहिल्या सामन्यात कोलंबियाला नमविले होते व सेनेगलविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवला होता. पोलंडचा संघ यापूर्वी स्पर्धेबाहेर गेल्याने जपानला या सामन्यात केवळ बरोबरी पुरेशी होती. परंतु, प्रशिक्षकांनी या सामन्यात तब्बल सहा बदल केले. शिंजी कागावा व ताकाशी इनुई यांना त्यांनी स्टार्टिंग इलेव्हनमध्ये संधी दिली नाही. पोलंडकडून जान बेडनारेक याने ५९व्या मिनिटाला गोल करून जपानला अडचणीत आणले होेते. परंतु, दुसरीकडे सेनेगलचा पराभव झाल्याने जपानने अखेरची काही मिनिटे चेंडू स्वतःकडे पास करण्यात घालवून आक्रमणाचे प्रयत्न न करता अखिलाडूवृत्तीचे दर्शन घडवले. विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश करण्याची जपानची ही केवळ तिसरी वेळ आहे. २००२ व २०१० सालीदेखील त्यांनी पहिल्या फेरीचा अडथळा पार केला होता.