जनमत कौलाचे राजकारण नको

0
163

>> ढवळीकरांचा विजय सरदेसाईंना टोला

जनमत कौलाचे कुणी विनाकारण राजकारण करू नये. उगीच कुणाचा पुतळा वगैरे उभारण्याची मागणी केली जाऊ नये. विधानसभा परिसरात यापुढे कुणाचाही पुतळा उभारायचा नाही, असा निर्णय सरकारने घेतलेला आहे, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी परवा गोव्यात जनमत कौल दिन पाळण्यात आल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काही लोकांनी जनमत कौलासाठी काम केले व गोवा महाराष्ट्रात विलीन केला जाऊ नये यासाठी योगदान दिले. पण गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतला नाही. मात्र, या उलट असेही काही नेते होते ज्यानी जनमत कौलाच्या वेळी विलीनीकरणाच्या विरोधात तर काम केलेच. शिवाय गोवा मुक्तीलढ्यातही भाग घेतला. जनमत कौलाच्यावेळी विलीनीकरणास विरोध करणारे काही नेते हे पोर्तुगीज धार्जिणेही होते. अशापैकी काही नेत्यांना गोवा हे एक स्वतंत्र राष्ट्र झालेलेही हवे होते.
जनमत कौलावरून मगोवर टीका करणार्‍यांनी या कौलानंतरही गोव्यात मगोचीच सत्ता आली होती व ती कित्येक वर्षे टिकून होती हे विसरता कामा नये, असे ते म्हणाले.

१९६७ साली जेव्हा जनमत कौल झाला तेव्हा राज्यात शिकलेले लोक जवळ जवळ नव्हतेच. होते ते अगदीच अल्प. नेते मंडळीचीही वानवा होती. त्यामुळे ज्या राज्यात चांगली नेते मंडळी व शिकलेले लोक होते त्या महाराष्ट्रात गोवा विलिन केले जावे असे बर्‍याचजणांना वाटत होते. माझे वय तेव्हा फक्त ११ वर्षे एवढे होते. त्यावेळी आपण विलीनीकरणाच्या विरोधात मतदान केले होते असे ढवळीकर यांनी नमूद केले.

उद्यानात स्वातंत्र्यसैनिकांचे
पुतळे उभारावेत
नव्या विधानसभा परिसरात आणखी कुणाचे पुतळे उभारायचे नाहीत, असा निर्णय सरकारने घेतलेला आहे. माझे स्वतःचे असे एक मत आहे की सरकारने दोन लाख चौ. मी. एवढ्या जागेत एक उद्यान उभारावे व त्या उद्यानात स्वातंत्र्य सैनिकांचे पुतळे उभारावेत.
जनमत कौलाच्या नावाने आता उगीच कुणी राजकारण करू नये, असेही ढवळीकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

मगोने मोठा विकास साधला
गोवा मुक्तीनंतर सत्तेवर आलेल्या मगो पक्षाने राज्यात शैक्षणिक क्रांती केली हे सर्वांना माहीत आहे व सर्वजण त्याचा उल्लेखही करतात. पण त्याही पलीकडे जाऊन मगो पक्षाने गोव्यात मोठमोठे उद्योग आणले याची बर्‍याच जणांना माहिती नसल्याचे ते म्हणाले. गोव्यात सध्या ते सर्वांत मोठे उद्योग आहेत ते मगो पक्षाने आणले होते. जुवारी ऍग्रो कॅमिकल्स, सीबा, एमआरएफ या मोठ्या कंपन्या गोवा शिपयार्ड तसेच संजीवनी साखर कारखाना आणला तो मगोने. त्याशिवाय बहुजन समाजाच्या उद्धारासाठी पक्षाने कसेल त्याची जमीन हा कायदाही आणल्याचे ते म्हणाले. त्याकाळी महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनीच भाऊसाहेब बांदोडकर यांना गोव्यात नेता बनवले हेही आज कुणाला सांगितले तर खरे वाटणार नसल्याचे ढवळीकर म्हणाले. मगो पक्ष विलीनीकरणाच्या बाजूने होता यासाठी या पक्षाचा एक नेता या नात्याने यापूर्वीच आपण माफी मागितलेली आहे असेही ढवळीकर यांनी सांगितले.