जनमत कौलाचा अन्वयार्थ जनमत कौलाचा अन्वयार्थ 

0
199
  • वामन राधाकृष्ण

गोव्यातील ऐतिहासिक जनमत कौलास ५१ वर्षे पूर्ण होत असल्याने ‘अस्मिताय दिवस’ आज राज्यातील भाजप सरकार साजरा करीत आहे. जनमत कौलात विलीनीकरणवादी का हरले आणि कौल हरले तरी नंतरच्या गोव्याच्या दुसर्‍या विधानसभा निवडणुकीत म. गो. पक्षच सत्तेवर का येऊ शकला?

आपण निवडणुकीचे बादशहा आहोत असे के. के. शहांनी गोव्याला सांगितले होते. लोकशाहीत बादशहांना किंमत नसते हे निकालावरून सिद्ध झाले. ओपिनियन पोल श्री. बांदोडकरांनी मान्य केला व आपण तो नक्की जिंकू असे श्री. के. के. शहांप्रमाणे ठामपणे सांगायला सुद्धा त्यांनी सुरवात केली. आज जे बंडखोर म्हणून समजले जातात, ते सारेजण ओपिनियन पोलच्या विरुद्ध होते. ही राष्ट्रविघातक पद्धत आहे असे श्री. दत्ताराम चोपडेकर यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
आकडेशास्त्र सहजासहजी फसवे नसते याची जाणीव आम्हाला होती. माझ्याजवळच्या आकड्यानुसार पहिल्या निवडणुकीला विधानसभेच्या निकालावरून विलीनीकरणवाद्यांना ११८१३५ मते पडली होती, तर विलीनीकरणविरोधी मतांची संख्या १३१४०० अशी होती. पार्लमेंटच्या निवडणुकीच्या निकालाचे आकडे जर पाहिले तर विलीनीकरणविरोधकांची संख्या सहा हजारांनी आणखी वाढत होती. हे आकडे ज्यावेळी दाखविले गेले, त्यावेळी बांदोडकर म्हणाले, ‘‘मी ख्रिश्‍चनांना आता वळवू शकलो आहे. आम्ही केलेल्या प्रगत कायद्यामुळे ते आता आमच्या बाजूने मते देणार आहेत.’’ पण प्रत्यक्षात ख्रिश्‍चनांना सोडाच, हिंदूंीही विलीनीकरणविरोधी मत प्रदर्शित केले होते.

जनमत कौलात विलीनीकरण विरुद्ध घटक राज्य असा पर्याय असल्यामुळे सारे विलीनीकरण विरोधी एकत्र वावरतील ही भीती त्यावेळी होती आणि म्हणूनच सार्‍या विलीनीकरणवाद्यांची एक आघाडी व्हावी म्हणून २२ नोव्हेंबर १९६६ रोजी वास्को द गामा क्लब, पणजी येथे बैठक भरली. त्यावेळचे प्रजासमाजवादी रमेश देसाई यांनी आघाडीला विरोध केला. बांदोडकरांनी त्यांना होकार दिला आणि आघाडी खतम झाली. म. गो. पक्षाने सारी सूत्रे हातात घेतली आणि प्रचारास सुरवात केली.प्रचारासाठी महाराष्ट्रातून अनेक कलापथके आणि अनेक वक्ते आले. त्यांनी जिद्दीने प्रचार केला. प्रचारपत्रिका मात्र आमच्या चांगल्या नव्हत्या. इथल्या वातावरणाला ‘अपिलींग’ असे त्यात काही नव्हते. ‘आमची शीतकढी बरी’ अशा तर्‍हेची मनाला भिडणारी वाक्ये वापरून विरोधकांनी बाजी जिंकली होती. आमचे सारे प्रचारसाहित्य आम्ही तयार केले नव्हते. आमच्या कचेरीचा मी त्यावेळी चिटणीस होतो. पण माझ्याकडून एकही प्रचाराचे साहित्य लिहून घेण्यात आले नव्हते. महाराष्ट्रातून सारे इंपोर्ट झाले होते.

या जनमतकौलात दोन्ही पक्ष अगदी निकराने, कडवेपणाने झगडले. या निवडणुकीइतक्या मारामार्‍या कुठल्याच निवडणुकीत झाल्या नाहीत. आमच्या एका कार्यकर्त्याला विरोधकांनी बेदम मारहाण करून त्याला गोणपाटात घालून नाल्यात फेकून दिले होते. नशीब त्यात तो वाचला. ऑफिसच्या समोर उभ्या असलेल्या एका कार्यकर्त्याच्या पाठीत धावत्या गाडीतून सोड्याची बाटली मारली होती. अशा अनेक तक्रारी होत्या. पोलीस चौकीवर आम्ही एक तक्रार घेऊन गेली की त्याचवेळी तेही आपली एक तक्रार घेऊन येत. अशा हिकमती त्यावेळी लढवल्या गेल्या. आम्ही एकाकी होतो. ते सगळे एक झाले होते. तरी पण आम्ही शिकस्त केली होती.म. गो. कार्यकर्त्यांनी व्यवस्थित काम केले नाही असा एक आरोप त्यावेळी केला गेला व आजही त्याचीच री ओढली जात आहे. पण हा आरोप बरोबर नव्हता. माझ्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ मी मतदानाचे आकडे येथे देत आहे- मतदारसंघ पहिल्या निवडणुकीत म. गो. ला मिळालेली मते जनमत कौलातील विलीनीकरणाच्या बाजूने मिळालेली मतेपेडणे ३१८३ ५९६८मांद्रे ६६६३ ७९६३शिवोली ४५८४ ५५८३कळंगुट ३६३३ ४९२८हळदोणे ३४२१ ४७००म्हापसा ४५११ ५८५९थिवी ५०४२ ६११०डिचोली ६४२० ७७१०पाळी ५४२६ ६३०५पणजी २३४७ ४१७५
अशी प्रत्येक मतदारसंघात विलीनीकरणवाद्यांच्या मतात वाढ झालेली आहे. म. गो. च्या कार्यकर्त्यांनी काम केले नसते, तर ही वाढ दिसली नसती. मग तुम्ही म्हणाल, जनमत कौलात विलीनीकरणवाद्यांचा पराभव झाला कसा? पहिली गोष्ट अशी की, मराठी आणि विलीनीकरण म्हणजे भारताशी ऐक्य असे समीकरण हिंदूंच्या मनात जसे बाळगले होते, तसेच विलीनीकरण म्हणजे हिंदूंच्या वर्चस्वाखाली सतत राहणे असे समीकरण ख्रिश्‍चनांनी ठरविले होते. त्यामुळे सार्‍या एकजात ख्रिश्‍चनांनी विलीनीकरणविरोधी मत दिले होते.

ख्रिश्‍चन बहुसंख्य असलेल्या तीन मतदारसंघांतील विलीनीकरणवाद्यांची शोचनीय अवस्था पाहा. एकूण मतदान ३३७८२. त्यापैकी विलीनीकरणवाद्यांना फक्त ४५९० मते पडली होती. वर उल्लेखीत अशा तीन मतदारसंघांपैकी बाणावलीमध्ये संघराज्याला १०७८९ मते पडली आहेत, तर विलीनीकरणवाद्यांना फक्त ८२९ मते पडली आहेत. असा हा जमीन – अस्मानाचा फरक असल्यामुळे कितीही प्रयत्न झाले तरी हा फरक भरून काढणे शक्य झाले नसते. गोव्यात ख्रिश्‍चन ४५ टक्के आहेत व हिंदू ५५ टक्के असले तरी हिंदूंपैकी उच्चवर्गीय बहुतांशी संघराज्याच्या बाजूने राहिले. बहुजन समाजातले श्रीमंतही तसेच झाले आणि त्यामुळे संघराज्यवाले पन्नास टक्क्यांहून जास्त झाले आणि आम्ही पराभूत झालो.

जनमतकौलाचा निकाल ज्या दिवशी लागला, त्याच दिवशी विजेत्या पक्षाने विजयोन्मादाच्या आवेशात जो धुमाकूळ घातला, तो त्यांना खूप महागात पडला. आता जर हे असे; तर राज्य मिळवल्यावर होणार कसे? अशी भीती सर्वसामान्य हिंदूंच्या मनात ठाण धरून बसली आणि जातीयवादाच्या चक्रात गोवा रुतून बसला. गोव्यात जातीयवादाचे चक्र सुरू झाले असे ज्यावेळी कोणी म्हणतो, त्यावेळी त्याच्या मनात कोंकणे आणि किरिस्तांव असा भेद असतो. जनमत कौलाच्या निकालानंतर विलीनीकरणवाद्यांनी तर म. गो. ला मते दिलीच, पण स्वतंत्र घटकवादी जनतेनेही यु. गो. च्या नाराजीने म. गो. लाच पाठिंबा दिला. परिणाम असा झाला की, ‘‘गोव्यातला विलीनीकरणवादी पोल हरला, तरी तो राजकारणात हरलेला नाही.’’ असे मी जे लिहिले होते, ते दुसर्‍या निवडणुकीत खरे ठरले. राजकारणातले आडाखे नेहमीच खरे ठरतात असे नसले तरी त्यावेळी तरी मी तंतोतंत भविष्य वर्तवणारा ज्योतिषी ठरलो खरा.