जगावं कसं… हिरव्यागार झाडासारखं!

0
3
  • सुरेखा सुरेश गावस-देसाई

‘श्यामची आई’ हे पुस्तक म्हणजे आमच्या पिढीसाठी मातृ-पितृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र! आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे संस्कार! त्यांनी सरासरी 138 पुस्तके लिहिली… केवढा तो लेखनाचा आवाका! त्यांचे वाचन प्रचंड, लेखन प्रचंड! आयुर्मान फक्त 51 वर्षे!

माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. पहिला गुरू आई (बरोबरीने बाबा). पण सर्वात मोठा गुरू म्हणजे निसर्ग. तो जीवन जगण्याची कला शिकवतो. निसर्गातील प्रत्येक गोष्ट एकमेकाशी जोडलेली आहे, म्हणूनच सानेगुरुजींना लाखो गुरू असलेली बिनभिंतीची उघडी शाळा आवडली असेल! झाडाखाली पारावर, हिरवळीवर भरलेले गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे ‘शांतिनिकेतन’ आवडले असेल!

ते ठिकठिकाणी हिंडत, रानोमाळ भटकत… कुतूहल आणि जिज्ञासा! तेथील लोकमानस, बोलीभाषा, देव-धर्म, फुले-फळे-पिके, खानपान, सणवार, संस्कृती वगैरे समजून घेत. रत्नपारखी नजरेतून चांगले तेच टिपत. सर्व टिपणे, निरीक्षणे सुधेस- आपल्या पुतणीस- पत्रातून लिहून पाठवत. मुले त्यांना फार आवडत. मुले म्हणजे देवाघरची फुले! सुधेमार्फत ते महाराष्ट्रातील तमाम मुलांशी संवाद साधत. त्यांनी मुलांना निसर्गावर-सृष्टीवर प्रेम करायला शिकवले. त्यांना अनेक भाषा चांगल्या अवगत होत्या. त्यांनी इंग्रजी भाषा-विषय घेऊन एम.ए. ही उच्च पदवी मिळवली. पत्रांत म्हणी, ओव्या, अभंग, आर्या, श्लोक, ऋचा, इंग्रजी अवतरणे यांचा वापर करत. सहज-सुलभ भाषेतील ही पत्रे लहान मुलांप्रमाणे मोठ्यांनाही मोलाची तशीच माहितीपूर्ण वाटतात. त्यांनी सुधेस लिहिलेली सुंदर पत्रे ‘साधना’ मासिकातून प्रकाशित होत. प्रत्येक शनिवारी एक पत्र (अपवाद वगळता) याप्रमाणे बेचाळीस पत्रे त्यांनी सुधाला पाठविली. ती पत्रे म्हणजे ‘स्मृतिरत्नांचे रांजण’ असे म्हटले जाते. पानोपानी विखुरलेले संदर्भ, विविध भाषांतील समर्पक उदाहरणे, अलंकार पाहता त्यांनी किती ग्रंथ चाळले असतील, किती पुस्तके धुंडाळली असतील, किती हाताळली असतील, अभ्यासली असतील असे वाटावे. पण तो लहानपणीचा वाचनाचा संस्कार! बालपणात केलेले पाठांतर, अभ्यास-पारायण त्याचा हा परिपाक आहे. त्यांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती चक्रावून टाकणारी वाटते.

या प्रतिभावान साहित्यिकाने लिहिलेले व गाजलेले लोकप्रिय पुस्तक म्हणजे ‘श्यामची आई.’ संस्कारक्षम वयातील आपल्या जीवनाची सुरुवातीची 22 वर्षे- जीवनप्रवास ‘श्यामची आई’ या पुस्तकातून शब्दांकित केला आहे. सविनय कायदेभंग चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना अटक झाली होती, त्यावेळी तुरुंगात असताना 9 ते 13 फेब्रुवारी- फक्त पाच दिवसांत त्यांनी हे पुस्तक लिहिले. धडपडणारा श्याम व त्याची आई यामधील नाते. मुलाच्या जडणघडणीत संस्कारांचे किती महत्त्व आहे, हे सांगणारी श्यामच्या जीवनातील आत्मकथनात्मक कादंबरी म्हणजे ‘श्यामची आई.’
हे पुस्तक म्हणजे आमच्या पिढीसाठी मातृ-पितृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र! आई म्हणजे प्रेम, आई म्हणजे त्याग, आई म्हणजे संस्कार! त्यांनी सरासरी 138 पुस्तके लिहिली, पण अर्धीअधिकच प्रकाशित झाली. केवढा तो लेखनाचा आवाका! त्यांचे वाचन प्रचंड, लेखन प्रचंड! आयुर्मान फक्त 51 वर्षे!
माणसाचे आयुष्य बदलून टाकणाऱ्या त्यागमूर्ती सानेगुरुजींना केवळ 51 व्या वर्षी मृत्यूने कवटाळले. ‘श्यामची आई’ लिहिणारे सानेगुरुजी संवेदनशील, भावनाप्रधान होते. पण प्रसंगी कठोरही होत. ते लिहू लागले की त्यांची लेखणी चालत राही… डोक्यातील विचारांनुसार लेखणीतून शाई झरझर कागदावर झरत असे. ते बोलू लागले की त्यांची वाणी चाले.

आईवर लिहिलेल्या पुस्तकामुळे ते अमर झाले. त्यांची वाणी गोड. त्यांना ठिकठिकाणी व्याख्यानासाठी बोलावले जाई. ते खास ‘शिक्षकांसाठीही’ व्याख्याने देत.
24 डिसेंबर 1899 या दिवशी पालगड- रत्नागिरी येथे सानेगुरुजींचा जन्म झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांनी कष्टात दिवस काढले. हलाखीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेतले. इंग्रजी विषय घेऊन एम.ए.ची उच्च पदवी मिळविली. वयाच्या 25 व्या वर्षी ते शिक्षक म्हणून अमळनेरच्या हायस्कूलमध्ये शिकवू लागले. तेथे ते छात्रालयात राहत. ते गरजू मुलांना मदत करत. त्यांचे अगाध ज्ञान, गोड प्रेमळ स्वभाव, अमोघ वक्तृत्व यामुळे सर्वजण भारावून जात. आपल्या हळव्या कोमल भावनाप्रधान स्वभावाने शाळाच नव्हे तर संपूर्ण खानदेशवासीयांना त्यांनी जिंकले.

सानेगुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने म्हणजेच श्याम. छात्रालयात असताना रात्री झोपताना सर्व मुलांना गोळा करून ते गोष्टी सांगत. रोज एक गोष्ट. आपल्या जीवनातील एकेक प्रसंग! त्याचेच संकलन करून (श्यामची आई) पुस्तक घडले- मैलाचा दगड ठरले.
या आत्मकथनात्मक कादंबरीचे सर्वच भारतीय भाषांत अनुवाद झाले. शिवाय ते जपानी व इंग्रजीतही अनुवादित झाले.
‘श्यामची आई’ हा चित्रपट आचार्य अत्रे- प्रल्हाद केशव अत्रे- या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा एक अभूतपूर्व आविष्कार ठरला. कारण मराठी भाषेतील पहिला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळविण्याचा मान या चित्रपटाने पटकावला. हा चित्रपट खूप गाजला, नावाजला गेला व लोकप्रियही झाला.
श्याम व त्याची आई यांच्या नात्याची वीण अतिशय सुंदररीत्या विणली गेली आहे. मुलाला संस्कार देऊन घडविताना आई उपदेश करीत नाही, सल्ले देत नाही; ते तिच्या आचार-विचारांतून मुलात झिरपत जातात.

पूर्वी आजच्यासारखी स्नानगृहे-शौचालये यांची सोय घरात नव्हती. माळरानावर वा ओढ्याकाठी जावे लागे. विहिरीच्या आसपास पुरुषमंडळी आंघोळी उरकत, तर लहान मुले व बायकांसाठी परसदारी झापांनी आडोसा करून सोय केलेली असे. एकदा आंघोळ झाल्यावर श्यामने आईला तळपाय ठेवण्यासाठी पदर पसरवून घरापर्यंत न्यायला सांगितले. त्याला उचलून घेत सहजगत्या आई म्हणाली, ‘श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस ना, तसेच मनाला घाण लागू नये म्हणूनही जप हो!’ मनाची घाण म्हणजे मनात येणारे दुष्ट विचार, असूया वगैरे. एक निरक्षर बाई केवढे ‘तत्त्वज्ञान’ सांगून जाते! धन्य तो श्याम आणि धन्य ती श्यामची आई!!