छाननीनंतर २३६ उमेदवारी अर्ज वैध

0
135

>> जिल्हा पंचायत निवडणूक, ७० अर्ज फेटाळले

राज्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननीनंतर २३६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. आज शनिवार ७ मार्चला सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत आहे. त्यानंतर जिल्हा पंचायतीचे निवडणूक चित्र स्पष्ट होणार आहे.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी ११९ आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीसाठी ११७ उमेदवारी अर्ज ग्राह्य ठरले आहेत. ७० उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले. त्यात उत्तर गोव्यातील ३६ आणि दक्षिण गोव्यातील ३४ अर्जांचा समावेश आहे. तसेच ३९ उमेदवारी अर्ज निकालात काढण्यात आले आहे. त्यात उत्तर गोव्यात २० आणि दक्षिण गोव्यात १९ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतीच्या ५० जागांसाठी ३०५ उमेदवारांनी ३४५ उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

दक्षिण गोव्यातील रिवण मतदारसंघात सर्वाधिक ११ उमेदवार आहेत. तर, उत्तर गोव्यातील ताळगाव व नगरगाव या दोन मतदारसंघात प्रत्येकी दोन उमेदवार आहेत. इतर मतदारसंघात तीन आणि तीनपेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपचे ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात उत्तर गोवा २५ आणि दक्षिण गोव्यातील १७ उमेदवारांचा समावेश आहे.
कॉंग्रेस पक्षाने ३८ मतदारसंघात उमेदवार उभे केले आहेत. त्यात उत्तरेतून २१ व दक्षिणे तून १७ उमेदवारांचा समावेश आहे. मगोपच्या १८ उमेदवारांत उत्तर गोव्यात ८ आणि दक्षिण गोव्यात १० उमेदवारांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाचे २१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात उत्तर गोव्यात ७ आणि दक्षिण गोव्यात १४ उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर आणि दक्षिण गोव्यात प्रत्येक ३ उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रीय समाज पक्षाकडून उत्तर गोव्यात एक उमेदवार उभा केला आहे.