सामूहिक कार्यक्रम शक्यतो टाळा ः आरोग्यमंत्री

0
171

भारतात आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने राज्यांना काही महत्वाच्या सूचना केलेल्या आहेत. त्यात मोठ्या संस्ख्ेयने लोक एका ठिकाणी जमतील असे सामूहिक कार्यक्रम टाळावेत. शक्यतो असे कार्यक्रम कोरोनाची साथ आटोक्यात येईपर्यंत पुढे ढकलावेत. असा एखादा कार्यक्रम करावाच लागला तर कोणती काळजी घ्यावी याची माहिती राज्यांनी आयोजकांना द्यावी, असे म्हटले आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. पुढीलकिमान २ ते ३ महिने सामूहिक कार्यक्रम करणे टाळावे, अशी सूचना केल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवधर्न यांनी कोरोनावरून नुकतीच व्हिडिओ कॉन्फन्सिंगद्वारे राज्यांतील आरोग्यमंत्र्यांशी संवाद साधून जगभरात फैलावू लागलेल्या कोरोनाची साथ भारतात पसरू नये यासाठी कोणती काळजी घेतली जावी याविषयीची सविस्तर माहिती दिली व महत्वाच्या सूचना केल्याचे राणे म्हणाले. विविध देशांतून भारतात येणार्‍या लोकांची व पर्यटकांची योग्य ती तपासणी विमानतळ व अन्य ठिकाणी केली जावी. कोरोनाच्या व संशयित कोरोना रुग्णांसाठी इस्तिपळात वेगळे वॉर्ड तयार केले जावेत अशी सूचनाही करण्यात आली आहे. हर्षवर्धन यांच्याशी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरिंगच्या वेळी कोरोनासाठी विमानतळ, मुरगाव बंदर आदी ठिकाणी स्क्रिनिंग करण्यात सरकारला कोणत्या अडचणी येतात व त्यासाठी केंद्र सरकार गोव्याला कोणती मदत करू शकते याची माहिती आपण त्यांना दिल्याचे राणे यांनी सांगितले. दाबोळी विमानतळाचे प्रशासन हे विमानतळ प्राधिकरणाच्या हाती आहे. त्यामुळे गोवा सरकारला तेथे स्क्रिनिंग करता येत नाही. त्यामुळे केंद्राने गोवा सरकार व विमानतळ प्राधिकरण यांच्यातील एक दुवा बनून राज्य सरकारला कोरोनासाठीचे स्क्रिनिंगचे काम तेथे त्यांनी घेण्याबाबत सहकार्य करावे, अशी सूचना विमानतळ प्राधीकरणाला तसेच मुरगाव बंदरालाही करावी, अशी विनंती आपण केल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. विदेशात नोकरी करणार्‍या व सध्या भारतात आलेल्या नोकरदारांची कोरोनामुळे अडवणूक होऊ लागलेली आहे. हे लोक आता गोवा सरकारच्या आरोग्यखात्याशी संपर्क साधत असल्याचे राणे म्हणाले. या लोकांना गोमेकॉतर्फे प्रमाणपत्र देण्याबाबत आमचा विचार चालू असून हा मुद्दा केंद्राकडे नेला जावा, अशी सूचना आरोग्य सचिवांनी आपणाला केल्याचे ते म्हणाले.

थर्मल स्कॅनरचा अभाव
देश -विदेशांतून येणार्‍या लोकांची कोरोनासाठी तपासणी करण्यासाठी विमानतळावर एका थर्मल स्कॅनरची गरज आहे. विमानतळ तसेच अन्य ठिकाणी तपासणी करण्यासाठी हे स्कॅनर दिले जावेत, अशी मागणी आपण केल्याचे राणे यांनी नमूद केले. विमानतळावर येणार्‍या प्रवाशांची तपासणी कशी केली जावी त्याविषयीची एक यंत्रणाही उभारली जावी, अशी मागणीही केल्याचे ते म्हणाले. रेल्वे व बसने येणार्‍यांची तपासणी कशी करणार असे विचारले असता ते सरकारसमोर एक मोठे आव्हान असल्याचे राणे म्हणाले. केंद्र सरकार लवकरच कोरोनाबाबत तरी मार्गदर्शन तत्वे तयार करणार असल्याचे राणे म्हणाले. एका दिवसाआड राज्याचे आरोग्य सचिव कोरोनाबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाशी संवाद साधत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. गोमेकॉचे डिन शिवानंद बांदेकर व डॉ. जुझे डिसा हेही यावेळी हजर होते.

शिमगोत्सवाबाबत सरकार
निर्णय घेईल
सरकारी शिमगोत्सव रद्द केला जाईल काय, असे पत्रकारांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना विचारले असता त्याबाबत काय करायचे हे सरकारला ठरवावे लागेल. आपण काहीही सांगू शकत नसल्याचे ते म्हणाले.

गोव्यात कोरोनाचा अजून
एकही रुग्ण नाही
दरम्यान, गोव्यात अजून एकही कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळला नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राणे यांनी दिली. संशयावरून ताब्यात घेतलेल्या रुग्णांना २८ दिवस निरीक्षणाखाली ठेवावे लागते. अशा प्रकारे १८ दिवस निरीक्षणासाठी ठेवून नंतर डिसार्च देण्यात आलेल्यांचा आकडा ३८ एवढा आहे. तर सध्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्यांना आकडा २९ एवढा आहे. तर गोमेकॉत आणखी ४ नव्या संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. काल ६ रोजी संशयित रुग्णाला दाखल करण्यात आल्यचे ते म्हणाले. दोघा विदेशी संशयित कोरोना रुग्णांचे अहवाल अजून मिळालेले नसून त्यात एक नेपाळी व एका ब्रिटीश नागरिकाचा समावेश आहे. तर अन्य दोघांचे अहवाल हाती आलेले असून त्यांना कोरोना नसल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिली.