छत्रपती शिवाजी महाराज आणि गोमंतभूमी

0
1646

– सचिन बाळासाहेब मदगे

छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्याच्या भूमीत प्रत्यक्ष आगमन झाले, त्याला आज ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. शिवाजी महाराज आणि गोव्याचा संबंध काय असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. शिवरायांचा गोव्याशी कोणता ऐतिहासिक ऋणानुबंध आहे याची समग्र माहिती देणारा विशेष लेख –

सन १५१० मध्ये गोव्याच्या इतिहासातील एक काळे पर्व सुरू झाले. पोर्तुगीज खलाशी आफोन्स द आल्बुकर्क याच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीज नौदलाचे गोव्यावर आक्रमण झाले. सुरुवातीला आदिलशहाच्या ताब्यातील गोव्याचा तिसवाडी तालुका ताब्यात घेऊन आजचे जुने गोवे (ओल्ड गोवा) म्हणजे त्या कालचे ऐल (एला) या संपन्न व्यापारी बंदर असणार्‍या गावात त्याने आपले मुख्य ठाणे वसविले.
सन १५४६ मध्ये आदिलशहाच्या दोन राजपुत्रांच्या भांडणाचा फायदा घेत पोर्तुगिजांनी बारदेश आणि साष्टी हे संपन्न तालुके बळकावले. मग त्यांचे या भूमीतील स्थान अधिकच घट्ट झाले. त्याकाळी पोर्तुगीज स्वत:ला संपूर्ण जगाच्या समुद्रसत्तेचे स्वामी समजत आणि परिस्थितीही तशीच होती. भारतातच नव्हे, तर जगभरात पोर्तुगिजांच्या नौदलाला आव्हान देणारे सोळाव्या शतकात कोणी नव्हते. समुद्रात कोणीही व्यापार आणि प्रवासी वाहतूक करायची म्हटले तर पोर्तुगिजांच्या परवानगीचे पत्र घेणे सक्तीचे होते. अगदी मोगल, आदिलशहा सारखे भारतातील त्या काळचे बलाढ्य सत्ताधीश सुद्धा व्यापारी वाहतुकीसाठी , हज यात्रेसाठी पोर्तुगिजांचे परवानगी पत्र घेत असत.
बारदेश, तिसवाडी, सालसेत हे व्यापार आणि शेतीसाठी सर्वांत संपन्न तालुके. या तालुक्यांतच पोर्तुगिजांनी आपले पाय रोवले, तेव्हा त्यांना आव्हान देणारी देव, देश ,धर्म यांची चाड असणारी एकही सत्ता भारतात नव्हती. त्याचा फायदा घेत त्यांनी गोव्यातील जुनी काबिजाद म्हणजे बारदेश (म्हापसा) तालुक्यातील सर्व मंदिरांचा विद्ध्वंस केला. हे आक्रमण होताच काही मोजक्या मंदिरांतील मूर्ती भक्तांनी रातोरात शेजारील प्रदेशांत नेल्या. शेजारील राज्य हे आदिलशहाचे राज्य. तेथे या देवतांना राजाश्रय नव्हता, पण लोकाश्रय मात्र नक्कीच होता. या गावांतील कष्टकर्‍यांनी आपल्या वस्तीमध्ये या देवतांना जागा उपलब्ध करून दिली. या जागांमध्ये माडाच्या चुडतांच्या सावलीत हे देव विसावले. पारतंत्र्याच्या या कालखंडात लोक एका युगपुरूषाची वाट पाहू लागले.

इन्क्विझिशनचा काळा कालखंड

जुन्या काबिजादीत पोर्तुगिजांच्या धार्मिक अत्याचारांना तोंड देण्यापेक्षा अनेकांना गाव, घरदार, जमीन, संपत्तीचा त्याग करून परागंदा व्हावे लागले. पण ज्यांना हे शक्य नव्हते, त्यांना मात्र नाइलाजाने धर्मांतर करावे लागे. नाइलाजाने आपली जमीन, घरदार, वतन राखण्यासाठी आपली भाषा, संस्कृती, दैवते यांचा त्याग करावा लागे, परंतु अनेक लोक पोर्तुगिजांपासून लपून छपून भारतीय संस्कृतीचे सण उत्सव साजरे करीत असत. तेव्हा पोर्तुगिजांनी या लोकांना वठणीवर आणण्यासाठी धर्मसमीक्षण (इन्क्विझिशन) कायदा आणला. जर कोणी नव ख्रिस्ती जर आपल्या कोणत्याही जुन्या हिंदू प्रथांचे अनुकरण करताना आढळला, तर त्यास धर्मन्यायाला उभे करून भयंकर शिक्षा दिल्या जात. कोणाचे हात पिरगाळून बाहेर काढत तर कोणास जिवंत जाळत. उकळते तेल अंगावर ओतत. अशा अमानुष आणि अमानवी शिक्षांना गोमंतकीय जनता तोंड देई. या अमानुष धर्मसमीक्षणाला भिऊन अनेक धर्मांतरितांनी सुद्धा आपली जन्मभूमी सोडली. धर्मांतरितांपुढे तर दुहेरी संकट उभे होते. आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखेच. एकीकडे धर्मसमीक्षण सभेचे भय, तर दुसरीकडे परत आपल्या मूळ धर्मात जाण्याचे सर्व दरवाजे कायमचे बंद, अशा दुहेरी दुष्टचक्रात अडकलेल्या गोमंतकीय जनतेला त्राता कोणी उरला नव्हता. अशा अन्याय अत्याचाराच्या मिट्ट काळोखात गोव्याचे एक शतक गेल्यानंतर आशेच्या किरणांचा कवडसा दिसू लागला.

शिवाजी महाराजांचा उदय

१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाबाई आणि शहाजीराजे यांच्या पोटी जन्मलेल्या बाळाने पुढे भारतवर्षाचे भाग्य उजळविले. शिवाजी राजांचा जन्म झाला. सन १६४६ मध्ये रोहिडेश्‍वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेऊन तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण उभारले. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी स्वराज्य बाळसे धरू लागले. अनेक जिवावरच्या संकटांशी सामना करत विस्तारू लागले. सन १६५७ रोजी मुंबईजवळ कल्याण बंदरात सुवर्णाक्षरांत नोंद घेण्यासाठी एक घटना घडत होती. ते म्हणजे शिवाजी महाराजांचे आरमार. आपला देश, आपला समुद्र असूनही तत्पूर्वी त्यावर आमचा हक्क नव्हता. दूरदेशावरून आलेल्या पोर्तुगिजांकडे समुद्राची मालकी, त्या जोडीला इंग्रज, डच, सिद्धीही त्यावर हक्क आणि मालकी सांगायला. या सर्वांशी संघर्ष करायचा तर नौदल हवेच. शिवाजी महाराजांनी कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर स्थानिक कोळी, भंडारी, मराठे, प्रभु यांना जवळ केले आणि आपला नौदलाचा विचार त्यांच्यापुढे मांडला, पण नौदल – म्हणजे लढायांसाठी लागणार्‍या नौका मागील कित्येक पिढ्यांनी तयार केल्याच नव्हत्या. नौदलाचे तंत्रज्ञान होते युरोपीय पोर्तुगिजांकडे. पोर्तुगिजांचा कारागीर लुई लैतांव व्हिएगस हा त्याकाळी प्रसिद्ध होता. त्यास शिवाजी राजांनी बोलावून नौदल उभारण्याची जबाबदारी दिली. त्याच्या हाताखाली स्थानिक भंडारी, कोळी लोकांना मदतनिस म्हणून दिले. लुई लैतांव हा, शहाजीराजांचा बंडखोर मुलगा शिवाजीराजे यांच्यासाठी नौदल उभारतोय हे पोर्तुगीज गव्हर्नरला कळले. गव्हर्नरने ताबडतोब लैतांवकडे निरोप पाठवून गुपचूप काम बंद करून निघून येण्यास सांगितले. लुई लैतांव आणि त्याचा मुलगा फेर्नाव व्हिएगस हे क्षणाचाही विलंब न लावता रातोरात स्वत:ला मिळालेले काम आणि त्यासाठी मिळणार्‍या पैशांवर पाणी सोडून पळून आले. का? तर हे तयार होणारे नौदल आज ना उद्या आपल्याच देशबांधवांविरुद्ध – म्हणजे पोर्तुगिजांविरूद्ध वापरले जाणार आहे म्हणून. पण पोर्तुगीज कारागिरांनी अर्धवट सोडलेले नौदल महाराजांच्या स्थानिक कारागिरांनी असे काय उभे केले की, ते पोर्तुगीज, इंग्रज या बलाढ्य युरोपीयनांनाही पाणी पाजू लागले.

खवासखानाची स्वारी

सन १६६४ ऑक्टोबर मध्ये खवासखान हा आदिलशाही सरदार परत कुडाळ प्रांत जिंकून घेण्यासाठी आला, तेव्हा शिवाजी महाराजांनी प्रथम खवासखानाच्या मदतीस येणार्‍या बाजी घोरपडे याला त्यांच्या गावातच मुधोळ (उत्तर कर्नाटक) येथे गाठून ठार मारले. तेथून त्वरेने येऊन कुडाळ जवळील माणगावच्या खोर्‍यात मुक्काम ठोकणार्‍या खवासखानाचा दारुण पराभव करत शिवाजी राजांनी त्याला विजापुरास पिटाळून लावले. खवासखानाच्या पराभवानंतर शिवाजी महाराज कुडाळहून वेंगुर्ले येथे गेले. त्यावेळी शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची दहशत बसून पेडणे, डिचोली, साखळी येथील आदिलशाही अधिकारी पळून गेले. तेव्हा पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके प्रत्यक्ष लढाई न करता आणि स्वत: प्रत्यक्ष येथे न येताच शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सामील झाले. त्याच वर्षी २४ नोव्हेंबर रोजी मालवणच्या कुरटे बेटावर सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामाचे भूमीपूजन केले. सिंधुदुर्ग म्हणजे १८ टोपीकरांच्या उरावरील शिवलंकाच होती. अठरा टोपीकर म्हणजे अनेक परदेशी व्यापारी सत्ता होत. त्यात गोव्यातील पोर्तुगिजांना सर्वांत जास्त दहशत होती. सिंधुदुर्गाच्या बांधकामासाठी महाराजांनी हरहुन्नरी जंजिरे (किल्ले बांधणारे गवंडी) कुंभारजुवे येथून नेले होते.

शिवरायांचे आरमार

सिंधुदुर्गाचे बांधकाम सुरु सुरू करून शिवाजी महाराज एका अनोख्या मोहिमेच्या तयारीस लागले. ही मोहीम होती नौदल मोहीम.त्यात अनोखे असे काय होते? त्याकाळी समुद्रावर पोर्तुगीज स्वत: सम्राट समजत. त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही व्यापार करू शकत नसत. त्यामुळे लढाऊ युद्धनौका तर दूरचीच गोष्ट. या पार्श्‍वभूमीवर पोर्तुगिजांच्या उरावरून म्हणजे गोव्याच्या समुद्रातून आणि सिंधुसागरातून स्वत: युद्धनौका घेऊन कर्नाटकातील पोर्तुगीज आणि आदिलशहाचे बंदर असणार्‍या बसरूर वर स्वारी करणारा हा पहिला भारतीय राजा होय.
फेब्रुवारी १६६५ च्या सुरुवातीला स्वत: शिवाजी महाराज ८५ गलबते आणि तीन मोठ्या युद्धनौका घेऊन मालवणहून शिडे उभारून पोर्तुगिजांच्या डोळ्यांदेखत आग्वाद, वास्कोच्या किल्ल्यासमोरुन सिंधुसागरातून गेले. बसरुर बंदरात आदिलशहा आणि पोर्तुगीज यांच्याकडून वसुली घेऊन महाराज परत फिरले आणि गोकर्ण येथे जहाजातून उतरुन गोकर्ण – महाबळेश्‍वराचे दर्शन घेऊन जमीन मार्गाने कारवारला आले. तेथे इंग्रज व अदिलशहाकडून जबरदस्त वसुलीचे नजराणे स्वीकारून शिवाजी महाराज गोव्यातील सत्तरी तालुक्याच्या सीमेवर भीमगड येथे मुक्कामास आले. गोकर्णहून महाराजांचे गोवा मार्गे येणारे नौदल पोर्तुगिजांनी मुरगाव (वास्को) च्या समुद्रात अडविले. येथे दोन्ही नौदलांची लढाई झाली. त्यात तांदळाने भरलेल्या अकरा बोटी पोर्तुगिजांनी पकडल्या, पण लगेच सोडून दिल्या. याच काळात गव्हर्नरने मुघलांच्या सेवेत असणारा पोर्तुगीज अधिकारी फ्रांसिस्कु-द-मेलु याला लिहिलेल्या पत्रात पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतो – ‘‘मागील जयाबद्दल शिवाजीस इतका गर्व झाला की, त्याने मुरगावच्या बेटाजवळ आपले आरमार पाठवून या शहरासाठी (म्हणजे गोव्यासाठी) धान्य घेऊन येणार्‍या जहाजांना प्रतिबंध करण्याचे धाडस केले. पोर्तुगीज आरमाराने त्यांच्या अकरा नौका पकडल्या. याचा अर्थ बसरुर वरून जाताना पोर्तुगीजांच्या ताब्यातील समुद्रात शिवरायांच्या नौदलाने खोडी काढून आव्हान दिले होते.

फोंड्याच्या मुक्ततेचा प्रयत्न

मार्च, १६६६ मध्ये शिवाजी राजे आग्रा भेटीस निघाले असता इकडे फोंडा आदिलशहांच्या तावडीतून मुक्त करण्याचा प्रयत्न चालू होता. आदिलशहाच्या सैन्याला फोंडा येथे पोर्तुगिजांनी अनेक प्रकारची मदत केली. फोंडा जिंकण्याचा प्रयत्न पोर्तुगिजांमुळे अयशस्वी झाला. पोर्तुगिजांना शिवाजी राजासारखा पराक्रमी आणि ध्येयवादी राजा आपल्या शेजारी नको होता. कल्याण – भिवंडीतील नौदल स्थापना ते फोंडा स्वारी या काळात शिवाजीराजे नक्की काय चीज आहे हे पोर्तुगिजांनी चांगलेच ओळखले होते. त्यामुळे या काळात पोर्तुगीज शिवाजी महाराजांची तुलना युरोपीय महान योद्धे अलेक्झांडर आणि सीझर यांच्याशी करू लागले होते, तर दुसरीकडे पोर्तुगिजांच्या कानावर अशाही आख्यायिका येऊ लागल्या होत्या की, शिवाजी राजांना अनेक जादूई विद्या अवगत आहेत. ते एकाच वेळी अनेक ठिकाणी प्रकट होऊ शकतात. किंवा ते कित्येक फर्लांग लांब उडी मारू शकतात. अशा अचाट आख्यायिका कानी पडण्यास कारणेही तशीच होती. अफझलखान, मिर्झा राजे जयसिंग अशी अनेक जिवावरची संकटे ज्या अद्भुत शौर्याने, धैर्याने त्यांनी परतवून लावली, त्यामुळे गोव्यातील सर्वसामान्य जनतेपर्यंतही शिवरायांच्या पराक्रमांच्या आख्यायिका कानी पडू लागल्या. अशा पराक्रमी शिवरायांचा प्रत्यक्ष गोमंतक भूमीवर पोर्तुगीजांबरोबर सामना अजूनही झाला नव्हता. पण लवकरच पोर्तुगीजांच्या कर्माने तो दिवस येणार होता.
२२ सप्टेंबर १६६७ रोजी पोर्तुगीज गव्हर्नरने एक अजब आणि धक्कादायक हुकूमनामा काढला. बारदेशमध्ये जे शिल्लक राहिले आहेत, त्यांनी दोन महिने मुदतीच्या आत धर्मांतर तरी करावे किंवा घरदार सोडून जावे, असा तो हुकूम होता. बारदेशमध्ये त्या काळात उघडपणे हिंदू धार्मिक विधी करण्यास बंदी होती आणि त्यांना सरकारी नोकरीही मिळत नसे. त्यात अशा हुकुमामुळे तर त्यांची परिस्थिती भयंकरच झाली. त्यातच शेजारी शिवाजी महाराजांच्या राज्यांतील देसाई मंडळी महाराजांचे महसूल धोरण त्यांच्या फायद्याचे नसल्यामुळे महाराजांविरूद्ध कारवाया करू लागली, तेव्हा महाराजांनी या देसायांना त्यांच्या पदांवरून हटवून आपल्या कायदा आणि धोरणास अनुकूल अशा देसायांना त्यांच्या जागी नियुक्त करू लागले. असे पदमुुक्त झालेले देसाई पोर्तुगिजांच्या आश्रयास बार्देशमध्ये येऊन राहू लागले. ते पोर्तुगिजांच्या जिवावर स्वराज्यात उपद्रव करू लागले, तेव्हा अशा उपद्रवी देसायांना आणि धर्मांध पोर्तुगिजांना धडा शिकविण्यासाठी शिवाजी महाराज गोमंतभूमीत १९ नोव्हेंबर १६६७ रोजी बार्देशमधील कोलवाळ गावात आपल्या सैन्यासह दाखल झाले.

शिवरायांचे बारदेशमध्ये आगमन

शिवाजी महाराजाची स्वारी बारदेशवर होणार आहे याची बातमी पोर्तुगिजांना अगोदरच मिळाली होती. त्यामुळे पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आग्वादच्या किल्ल्यात आश्रय दिला. तेव्हा बार्देशमध्ये कोलवाळ – थिवीचा सरळ लांब रेषेत तटबंदी असणारा किल्ला महाराजांच्या सैन्याने सहजपणे जिंकून घेतला. पोर्तुगिजांचेे सैन्य घाबरून लगेच आग्वाद किल्ल्याच्या आश्रयास पळून गेले. काही जुन्या गोव्यात आश्रयास जाऊन राहिले. कोणतेही पोर्तुगीज सैन्य शिवरायांचा सामना करण्यासाठी पुढे आले नाही.
२२ नोव्हेंबर रोजी शिवाजीराजे बारदेशातून निघून डिचोलीस आले. त्यानंतर खासा विजरई बार्देश मध्ये आला. तोपर्यंत बार्देशमधील झालेला प्रकार पाहून शिवाजीराजांकडे आपला वकील रामजी शेणवी कोठारी यास डिचोली येथे तह करण्यासाठी पठविले. रामजी शेणवी हा शिवाजी महाराजांचे पत्र घेऊन गव्हर्नरकडे आला. पुढेे या तहाच्या वाटाघाटी ५ डिसेंबर पर्यंत चालल्या व ६ डिसेंबर रोजी तह झाला.
बारदेशच्या मोहिमेच्या दरम्यान पुष्कळ ख्रिस्ती स्त्रिया आणि मुले पकडली गेली होती. त्यांना कोणताही त्रास न देता तसेच त्यांच्याकडून एक रूका (रुपया)ही न घेता शिवाजी महाराजांनी त्यांस सोडून दिले, असे पोर्तुगिजांनी शिवरायांविषयी आदरपूर्वक लिहून ठेवले आहे. ‘‘शिवाजी हा शत्रूंच्या बायकांस अत्यंत आदराने वागवी.’’ हे पोर्तुगिजांचा शिवाजी महाराजांचा चरित्रकार कॉस्मी-द-ग्वॉद त्यांच्या चरित्रात साक्ष देतो. शिवरायांच्या बारदेश स्वारीची धास्ती पोर्तुगिजांना चांगली बसली होती. पोर्तुगिजांना अशा प्रकारे आक्रमण करून धडा शिकविणारा हा पहिलाच भारतीय राजा होता.

शिवरायांचे डिचोलीतील वास्तव्य

या बारदेश प्रकरणानंतर शिवाजीराजे डिचोली येथे पुढे पंधरा दिवस तरी होते, असे अनुमान पोर्तुगीज आणि शिवरायांदरम्यानच्या पत्रव्यवहारावरून तरी दिसते. या पंधरा दिवसांत शिवरायांना येथील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा चांगलाच अंदाज आला होता. येथे नक्की काय केले पाहिजे, इथल्या लोकांना पोर्तुगिजांपासून नक्की काय त्रास होत आहे, त्यावर परिणामकारक कृती काय केली पाहिजे याचा अंदाज आला होता. त्यासाठी नेमकी कृती करण्याच्या तयारीला शिवाजी महाराज लागले. बार्देशच्या तहाच्या वाटाघाटींनुसार पोर्तुगिजांनी बंडखोर देसायांना आपल्या राज्यातून हाकलून लावले. पोर्तुगीज शिवरायांशी, त्यांच्या वकिलाशीे मैत्रीपूर्वक वागू बोलू लागले होते, पण इकडे शिवाजी महाराजांच्या डोक्यात पोर्तुगीजांना गोव्यातून हाकलून लावण्याचा डाव मनात घोळत होता. त्यानुसार परत एक वर्षानंतर शिवाजी महाराज नोव्हेंबर १६६८ मध्ये सैन्य घेऊन डिचोलीस येण्यास राजगडावरून निघाले.

या वेळची मोहीम ही फार आगळीवेगळी होती. आजच्या भाषेत हा एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक होता. त्या योजनेनुसार वेगवेगळ्या वेशांत मराठा सैनिक आधी ओल्ड गोव्यात वावरू लागले. चारशे ते पाचशे लोक वेश बदलून काम करू लागले. कोणी हमाल, तर कोणी काही वस्तू विकण्याचा बहाणा करू लागले. हळूहळू ही संख्या दुप्पट होणर होती. एकदा पुरेशी तयारी झाली की, अचानक रात्री हल्ला करून ओल्ड गोव्यात शिरणारी एखादी पायवाट ताब्यात घायची. मग बाहेरील सैन्याने मोठा हल्ला करीत पोर्तुगिजांचे सैन्य रणांगणावर उभे राहण्याच्या आत हल्ला करून गोवा पोर्तुगिजांकडून मुक्त करायचे असा बेत ठरला. परंतु दुर्दैवाने कुठे तरी माशी शिंकावी तसा प्रकार झाला. पोर्तुगिजांंना संशय येऊन गुप्त वेशातील सर्व मराठा सैनिक पकडले गेले. यावेळी पोर्तुगीज गव्हर्नर साव्हेंसेती हा आजारी होता. अगदी मरणाच्या दारात होता. आजारी असूनही या गुप्त कटाच्या बातमीने तो ताड्‌कन उठला. त्याने त्वरेने शिवाजी राजांच्या गोव्यातील वकिलास बोलावून संतापाने बेभान होऊन दोन-तीन थोबाडीत देऊन त्या वकिलाला आणि गोवा शहरात घुसलेल्या लोकांना हाकलून लावले.

सप्तकोटीश्वराचा जीर्णोद्धार

ही घटना घडली तेव्हा शिवाजी महाराज डिचोलीला येण्याच्या वाटेवर वेंगुर्ला येथे होते. तेथे त्यांना आपला कट उघड होऊन पोर्तुगीज अधिक सावध झाले आहेत हे कळले. या बातमीने शिवाजी महाराज नक्कीच हळहळले असतील, पण निराश झाले नाहीत. त्यांचा अजून एक मोठा बेत होता तो अंमलात आणण्यासाठी ते डिचोली येथे आले.
डिचोलीस आल्यानंतर शिवाजी महाराज नार्वे गावातील सप्तकोटीश्‍वर महादेवाच्या दर्शनास गेले. त्यावेळी सप्तकोटीश्‍वराचे मंदिर आजच्या सारखे नव्हते. महादेवाची पिंडी ही माडांच्या चुडतांच्या झोपडीवजा मंदिरात होती. या झोपडीतील महादेवाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर त्यांनी निर्णय घेतला की, या महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा. हा निर्णय महाराजांनी फार विचारपूर्वक घेतला असावा. आणि त्यासाठी सप्तकोटीश्‍वराची का निवड केली? त्याकाळी डिचोली महालात अनेक देवदेवता या पोर्तुगिजांच्या ताब्यातील बार्देश, तिसवाडी भागातून आणल्या गेल्या होत्या. यातून फक्त सप्तकोटीश्वराचीच निवड का करावी महाराजांनी? बहुधा अगोदरच्या वर्षी बार्देश स्वारीच्या वेळी डिचोलीतील मुक्कामात येथील स्थानिक लोकांकडून पोर्तुगिजांच्या धार्मिक अत्याचारांचा आणि सप्तकोटीश्‍वराचा इतिहास त्यांना समजला असावा.

कदंबांचे राजदैवत

सप्तकोटीश्‍वर हे पोर्तुगीजपूर्व काळातील गोव्यातील समृद्ध आणि वैभवशाली कदंब राजवटीचे आराध्य दैवत. कदंब राजांच्या बिरूदावली मध्ये सुद्धा सप्तकोटीश्‍वराचा उल्लेख श्रीलब्धवरप्रसाद सप्तकोटीश्‍वर असा मिळतो. असे सप्तकोटीश्‍वर महादेवाचे प्राचीन वैभवशाली मंदिर जुन्या गोव्या शेजारील मांडवी नदीच्या पात्रातील दिवाडी बेटावर दिमाखात उभे होते. या वैभवशाली सप्तकोटीश्‍वरावर पहिला घाला घातला बहामनी राजवटीने. १३५८ साली बहामनी आक्रमणात सप्तकोटीश्‍वर मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील शिवलिंग शेताच्या बांधावर चिखलात घालून त्याची विटंबना केली गेली. परत पुढे काही वर्षांनी विजयनगर राजांनी गोमंतक भूमी बहामनीच्या तावडीतून जिंकून घेऊन गोव्याचा सुपुत्र माधव मंत्री याने परत विजयनगर राजांच्या उदार राजाश्रयाने पुन्हा त्या मंदिराची स्थापना करून शेतातील चिखलातील सप्तकोटीश्‍वराच्या शिवलिंगाची दिमाखात स्थापना केली. १३९१ साली विजयनगर साम्राज्याचा पराभव होऊन गोव्यावर बहामनी आणि नंतर विजापूरची आदिलशहाची राजवट सुरू झाली. या राजवटीत अरब मुस्लीम पुरूष आणि केरळीयन स्त्रिया यांची संतती असलेल्या नायटे लोकांचा त्रास स्थानिक जनतेला फार होऊ लागला, तेव्हा या त्रासापासून मुक्त होण्यासाठी तेव्हाचे अरबांचे कट्टर शत्रू पोर्तुगीज यांना तिमोजी या गोव्यातील मोठ्या प्रतिष्ठीत माणसाने आमंत्रण दिले. पण हे आमंत्रण पुढे गोव्याच्या इतिहासातील काळ्या अंधाररात्रीचे ठरेल याची कल्पना तिमोजी याला नसावी.

सप्तकोटीश्वरावरील घाले

१५१० मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी सेनापतीने गोव्यावर आक्रमण करून आदिलशाही फौजेचा पराभव करून नायटे लोकांची कत्तल केली. गोव्यातील जनतेला नायटे लोकांचा नायनाट झाला म्हणून समाधान वाटले, पण हे समाधान फार काळ टिकले नाही. सतत मिळालेल्या विजयामुळे उन्मत्त झालेल्या पोर्तुगीजांना त्या काळात पोर्तुगालमध्ये सन १५२१ला गादीवर बसलेला तिसरा दो ज्युआंव या धर्मांध राजामुळे धर्मांधतेचे उधाण आले आणि गोव्यातील देवळे मोडण्याचा निर्णय घेण्यात आला.
पोर्तुगिजांचा पहिला घणाघात दिवाडी बेटावरील सप्तकोटीश्‍वरावर पडला सन १५४० मध्ये. सप्तकोटीश्‍वर मंदिर उद्ध्वस्त करून त्यातील शिवलिंग एका विहिरीच्या काठावर बसविले गेले आणि त्या विहिरीतून सक्तीने धर्मांतर केलेल्या लोकांना पाणी काढायला लावले जाई. दिवाडी बेटावरील नार्वे भागात असलेल्या या मंदिराला अशाप्रकारे अवकळा प्राप्त झाली. मंदिराचे रूपांतर चर्चमध्ये झाले. त्यावेळी सप्तकोटीश्‍वराचे भक्त असणारे डिचोली महालातील सूर्यराव देसाई यांना हे सोसत नव्हते. त्यांनी एका रात्रीत गुपचूप आपल्या लोकांसह दिवाडी बेटावर जाऊन विहिरीवरील शिवलिंग काढून आपल्या डिचोली महालातील हिंदळे या गावी आणले.
हिंदळे गावातील कुळागरात या शिवलिंगाची स्थापना करण्यात आली. कदंब राजाचे आराध्य दैवत दिवाडीतील नार्वे या गावातून हिंदळे गावात असे आले. तेव्हा लोकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या हिंदळे गावचे नाव बदलून नार्वे असे केले. नार्वे गावात माड-सुपारीच्या कुळागरात माडांच्या चुडतांच्या सावलीत निर्वासीतपणे वसलेल्या या कदंबराजांच्या राजदेवताला राजाश्रय दिला छत्रपती शिवाजी महाराजांनी.

शिवाजी राजांना साकडे

सप्तकोटीश्‍वराच्या जीर्णोद्धारात महाराजांबरोबर डिचोलीचे खल शेणवी सूर्यराव व नारायण खल सूर्यराव शेणवी हे देसाई होते. हे डिचोलीचे देसाई अगोदरच्या वर्षी बारदेशच्या स्वारीच्या काळात पोर्तुगिजांच्या आश्रयास होते. त्यांना उपरती होऊन ते स्वराज्यात सामील झाले. यावेळी देसायांना माफी देऊन त्यांचे देसकतीचे वतन त्यांच्या मानसन्मानासह त्यांना परत केले. या कौल पत्रात शिवाजी महाराज स्पष्टपणे म्हणतात की, तुम्ही ‘‘पुरातन वैकुंठवासी राजश्री-महाराज -साहेबांपासून साहेबांचे स्थापित ’’. पुरातन वैकुंठवासी राजश्री महाराज साहेब म्हणजे शिवाजी राजांचे वडील शहाजी राजे. शहाजी राजे आणि डिचोलीच्या देसांयांचे संबंध आदिलशाही दरबारात चांगले स्नेहाचे होते, हे डिचोलीच्या देसायांच्या कागदपत्रावरून कळून येते. तसेच सन १६५७ या काळातील शहाजीराजांच्या पत्रात शहाजीराजांनी आपल्या सैन्याचा खर्च भागविण्यासाठी पेडणे आणि भतग्राम हे दोन महाल जहागीर म्हणून आदिलशहाकडे मागीतले होते.
शके १५९० म्हणजे १३ नोव्हेंबर सन १६६८ या दिवशी शिवाजी राजांच्या आज्ञेने सप्तकोटीश्‍वराच्या देवालयाचे बांधकाम प्रारंभ केले असा संस्कृत शिलालेख मंदिराच्या दारावर बसविला आहे. खरे तर शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्‍वर मंदिर जिर्णोद्धारासाठी निवडण्याचे कारण काय हे स्पष्टच आहे. नार्वे गावातून नदीपलीकडचा जुने गोव्याचा परिसर स्पष्टपणे दिसतो. त्या काळातील धर्मांध पोर्तुगीजांना स्पष्टपणे संदेश जावा की, तुम्ही येथील राजसत्तेचे प्रतीक असणारे सप्तकोटीश्‍वर मंदिर जसे हट्टाने पाडलेत, तसे आम्ही ते राजाश्रय देऊन परत हिकमतीने बांधणार.

शिवरायांची व्यापारनीती आणि गोवा

‘साता समुद्राचे धनी’ म्हणवून घेणारे पोर्तुगीज शिवाजीराजांच्या बारदेश स्वारी आणि गोव्यावरील गुप्त मोहिमेमुळे पुरते घायाळ झाले. त्यातच पोर्तुगीजांना नमवून केलेल्या तहानंतर शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज परवानगी पत्रे घेण्याचे बंद केले. इतकेच नव्हे तर आपल्या सागरी हद्दीत संचार करणार्‍या व्यापारी जहाजांना आपली दस्तके घेतली पाहिजेत असा हुकूम जारी केला. या हुकुमानुसार मराठा आरमार अधिकारी पोर्तुगीज व्यापारी नौकांना महाराजांची दस्तके घेण्याची सक्ती करू लागले. हा उलटा प्रकार होत असल्याचे पाहून पोर्तुगीजांच्या इंग्रज आणि डचांच्या बळकावलेल्या व्यापारावर परिणाम होऊन पोर्तुगीज आरमारी आणि आर्थिक सत्ता अधिक केविलवाणी झाली.
शिवाजी राजांचे व्यापारी धोरण विदेशी पोर्तुगिजांशी कसे होते हे १६७१ मधील बार्देशच्या मिठावरून कळले. शिवाजीराजांनी समुद्र किनार्‍यावरील मिठाच्या व्यापाराला कर लावून शिस्त लावली. त्यात पोर्तुगीजांचे बार्देशमधील मीठ व्यापार्‍यांना स्वस्त पडू लागले. तेव्हा व्यापारी बार्देशातून पोर्तुगिजांचे मीठ खरेदीस जाणार आणि स्वराज्यातील मीठ बंदराला त्यामुळे नुकसान होणार म्हणून शिवाजीराजांनी पोर्तुगीजांच्या सरहद्दीवरील आपल्या कुडाळचा सुभेदार नरहरी आनंदराव यांस आज्ञा केली. संगमेश्‍वराहून बार्देशचे मीठ महागच पडे ऐसा जकातीचा तह देणे, तरी पावेल तेच घटिकेस कुलघाटी जकाती करणे, संगमेश्‍वराहून बार्देशी मीठास जबर निरख पडे ती गोष्ट करणे. त्यामुळे गोव्यातील पोर्तुगीजांचे मीठ ही शिवाजीराजांनी अळणी करून टाकले.

शिवराज्याभिषेकाचा गोमंतकीय साक्षीदार

सन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या राज्याभिषेकाने भारतवर्षाचा भाग्योदय झाला. भारताच्या सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाने पुन्हा एक वेगळे वळण घेतले. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आज आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित समजतो, तो इंग्रज वकील हेन्री ऑक्सीडेन यांच्या वहीतील नोंदीमुळे. हा वकील प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक समयी इंग्रजांचा प्रतिनिधी म्हणून हजर होता. त्याने चौकसपणे निरक्षण केलेल्या नोंदीमुळे राज्याभिषेकाचा तपशील समजतो, पण या इंग्रज वकिलाला राज्याभिषेकाच्या प्रसंगाचे बारकावे समजावून सांगणारी व्यक्ती गोमंतकीय होती. या व्यक्तीचे नाव होते नारायण शेणवी. नारायण शेणवी दुभाषा म्हणून पोर्तुगीज आणि इंग्रजांकडे काम करीत असे. त्याने इंग्रज वकीलास व्यवस्थित वर्णन करून हा प्रसंग सांगितला म्हणून तो आज आम्हा सर्वांस नीट कळतो. योगायोग असा की, शिवाजी महाराजांचे राज्याभिषेकाचे सर्वांत प्रसिद्ध असणारे चित्र चितारणारे चित्रकार होते गोमंतकीय सुपुत्र, प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल. एका गोमंतकीयाने प्रत्यक्ष शिवरायांचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहून त्याचे व्यवस्थित वर्णन केले आणि दुसर्‍या गोमंतकीयाने सर्वांना तो राज्याभिषेक कसा झाला असावा याचे नेत्रदीपक चित्र रेखाटले.

फोंड्याच्या किल्ल्यावरची मोहीम
राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांनी परत एकदा गोव्याकडे लक्ष दिले. आता त्यांनी लक्ष केंद्रित केलेते फोंडा महालाकडे. त्याकाळी फोंडा हा प्रांत होता. या प्रांताच्या आधिपत्याखाली हेमाडबार्से (सांगे) पंचमहाल, अष्टागार (केपे ) अडवलकोट (काणकोण) हे आजच्या गोव्यातील तालुके येत असत. माडा – पोफळीची कुळागरे, भातशेती आणि बाराही महिने वाहणार्‍या नद्यांनी हा भाग समृद्ध होता. पण हा भाग अजूनही आदिलशहाच्या ताब्यात होता. सन १६६६ मध्ये शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत झालेल्या मोहिमेत अपयश आले होते, परंतु आता स्वत: शिवाजी महाराज छत्रपती या नात्याने गोव्यात फोंडा जिंकण्यास येत होते. १८ एप्रिल १६७५ रोजी शिवाजी राजांनी फोंड्याच्या किल्ल्यास वेढा दिला. त्याकाळी फोंडा किल्ला फोंड्यातील पंडितवाड्याच्या बाजूस असलेल्या कोट या भागात होता. आदिलशहाच्या येथील किल्लेदाराचे नाव होते महंमद खान. मागील मोहिमेत पोर्तुगीजांनी फोंड्यास आदिलशहाने मदत केली होती. अशी गोष्ट परत होऊ नये म्हणून पोर्तुगीजांनी तटस्थ राहण्याचे वचन घेऊन विजरईकडे आपला वकील ठेवला. असे असून सुद्धा पोर्तुगीजांनी गुप्तपणे फोंड्याकडे मदतीसाठी धान्याने भरलेली दहा शिबाडे आणि काही माणसे पाठवली. पण मराठ्यांनी ती पकडून नेली. यावेळी २००० घोडदळ ७००० पायदळ इतके सैन्य घेऊन फोंड्यात शिवाजी महाराज नेतृत्व करीत होते. इकडे पोर्तुगीजांंनी तटस्थ न राहता गुप्त मदत केल्यामुळे पोर्तुगीजांना धडा शिकविण्यासाठी फोंड्याचा वेढा चालू असता २९ एप्रिल रोजी पोर्तुगीजांच्या साष्टी (मडगाव) तालुक्यातील कुंकळ्ळी आणि चांदर या गावावर मराठ्यांच्या दोनशे स्वारांनी हल्ला केला. या आक्रमणाची खबर मिळताच विजरईने शिवाजी राजांच्या वकिलास अटकेत ठेवण्याची आज्ञा केली.

आदिलशाहीची शरणागती

१६ मे रोजी शेवटी फोंडा किल्ल्यातील आदिलशाही फौज शरण येऊन फोंडा प्रांताचे स्वामी शिवाजी राजे झाले. फोंडा जिंकल्यामुळे शिवाजी राजांच्या ताब्यात अंत्रुज, अष्टागार, हेमाडबार्से, बाळ्ळी, चंद्रवाडी, काकोडे म्हणजे फोंडा, सांगे , केपे, काणकोण, हे तालुके आले. याच महिन्यात कारवार, अंकोला हे किल्ले जिंकत आपली स्वराज्य सीमा गंगावल्ली नदी पर्यंत नेली. आता कल्याण – भिवंडी पासून कारवार – अंकोला पर्यंतच्या कोकण प्रांताचे स्वामी शिवाजी महाराज झाले होते. पण त्यात मोठा अडथळा होता पोर्तुगीजांचा. गोव्यातील बार्देश , तिसवाडी, सालसेत आणि मुंबईकडील पनवेलपासून वसई, डहाणू पर्यंत भाग पोर्तुगीजांकडे होता. या भागातून त्यांना कायमचे घालविण्याचा प्रयत्न महाराज सदैव करीतच होते.
फोंडा जिंकल्यावर गोवे आता पोर्तुगीजांकडून घेणार ही खात्री इंग्रजांनाही होती. त्यांच्या गोव्यातील वकिलाने मुंबईस लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की शिवाजी आता कारवार प्रांताचा स्वामी झाला असून त्याची पुढची स्वारी गोव्यावर होईल असे बोलतात, पण एकाचवेळी मोगलांशी व पोर्तुगिजांशी युद्ध करण्यात मुसद्दीपणा नव्हता. त्यामुळे शिवाजीने पोर्तुगिजांशी युद्ध टाळले.
वेंगुर्ल्याचेे डच आपल्या पत्रात म्हणतात की, शिवाजी राजे, पोर्तुगिजांची कायमची हकालपट्टी करण्यास आम्ही तुमची मदत करू. पोर्तुगिजांच्या साष्ट, बारदेशवर शिवाजी राजे आपला हक्क सांगू लागल्यामुळे पोर्तुगीज शिवाजी राजांना आपला शत्रू मानून भिऊन वागत होते. पोर्तुगिजांना गोव्यातून कायस्वरूपी हाकलून द्यायचे असूनही त्यांना इतर राजकारणापुढे त्यासाठी सवड मिळत नव्हती.

विदेशी शत्रूविरुद्ध मोहीम

सन १६७९ च्या सुरवातीला शिवाजी महाराजांनी पश्‍चिम किनार्‍यावरील इंग्रज, सिद्धी आणि पोर्तुगीज या विदेशी शत्रूसाठी व्यापक मोहीम सुरू केली. तिचा व्याप मुंबईपासून कारवारपर्यंत होता. मुंबईजवळ खांदेरी-उंदेरी हे किल्ले बांधून तिथे मुंबईकर इंग्रजांशी वर्षभर मोठा संघर्ष सुरू केला. जंजिरेकर सिद्धीची नाकेबंदी करून त्याला मर्यादा घातल्या. कारवारला पोर्तुगीजांचे कट्टर शत्रू अरबांना आश्रय देण्याची बोलणी सुरू करून पोर्तुगीजांना घाम आणला आणि गोव्यात पोर्तुगीजांचे नाक दाबण्यासाठी एका महत्त्वाच्या मोक्याच्या जागी किल्ला बांधण्यास सुरवात केली. ती महत्त्वाची जागा म्हणजे आजचा दक्षिण गोव्यातील साळ नदीच्या मुखावरचे बेतुल. साळ नदी मडगावजवळ वेर्णा येथे उगम पाऊन मडगाव, चिचोणे, असोळणा मार्गे बेतुल येथे समुद्रास जाऊन मिळते. या साळ नदीतून पोर्तुगीजांचे व्यापारी पडाव, छोटी गलबते भरतीच्या वेळी मडगाव या मुख्य बाजारपेठेच्या खारेबांध भागापर्यंत जलवाहतूक करीत असत. साळ नदी ही बेतुल येथे शिवाजी महाराजांचे राज्य आणि पोर्तुगीज यांची सीमारेषा होती. उत्तर काठावर पोर्तुगीज राज्य, तर दक्षिण काठावर शिवाजी महाराजांचे राज्य अशी सीमा होती.

बेतुलच्या किल्ल्याची उभारणी

बेतुल येथे शिवाजी महाराजांच्या बाळ्ळीच्या हवालदाराच्या देखरेखेखाली किल्ला बांधला जात आहे हे पोर्तुगीजांच्या लक्षात आले. त्यांचा लष्करी अधिकारी – राशोल किल्ल्याच्या किल्लेदाराने गव्हर्नरकडे सविस्तर वृतांत कळविला, तो असा – असोळणे (साळ) नदीच्या पैलतीरावर शिवाजी राजे यांनी एक किल्ला बांधण्यास घेतला आहे. तो जर बांधून झाला तर आमच्या राज्याच्या सुरक्षिततेला त्यांच्यापासून धोका आहे. असा किल्ला बांधण्याचा विचार आदिलशहाने कधी केला नव्हता, परंतु शिवाजी राजे यांनी त्याचे राज्य घेतल्यावर हा प्रयत्न सांप्रत सुरु केला आहे. तेव्हा रासईच्या कॅप्टनला गव्हर्नरने उत्तर धाडले की, शिवाजी राजे यांनी अशा किल्ल्याचे बांधकाम केल्याने आमच्यात मैत्रीचा जो तह झाला आहे, त्यास बाधा येणार आहे. तेव्हा बाळ्ळीच्या हवालदाराने किल्ल्याचे बांधकाम थांबवावे. तेव्हा बाळ्ळीच्या शिवाजी महाराजांच्या हवालदाराने त्यास उत्तर पाठविले की, मी किल्ला शिवाजी राजे यांच्या आज्ञेवरून बांधीत आहे, परंतु या किल्ल्याचा उपसर्ग तुम्हाला होणार नाही. दुसरी गोष्ट आमच्या राज्यात आम्ही काहीही करण्यास मुख्यत्यार आहोत. त्याचा जाब विचारणारे तुम्ही कोण? बाळ्ळीच्या हवालदाराचे उत्तर ऐकून रासईच्या कॅप्टनने फोंड्याच्या सुभेदारास पत्र पाठविले. पण त्याचे उत्तर लवकर मिळेना. तेव्हा पोर्तुगीज काय समजायचे ते समजले. पण किल्ला पूर्ण झाला तर साष्टीतील जलवाहतूक संकटात येऊन साष्टीच्या सुरक्षिततेची भीती वाटत होती. तेव्हा या किल्ल्याचे बांधकाम गुपचूप काही माणसे ठेवून पाडून टाकावे, पण बांधकाम पाडताना पोर्तुगीज सरकारचा त्याच्याशी काही संबंध नाही हे दाखवावे असे ठरले. पुढील काळात या बेतुलच्या किल्ल्याचे नक्की काय झाले कळत नाही. यावरचा इतिहास उजेडात यायचा आहे, पण आजही पोर्तुगीज पत्रांत वर्णन केलेल्या जागेवर साळ नदीच्या मुखावर बंदुकीच्या गोळीच्या टप्प्यात बेतुल येथे एक बुरूज आणि त्यावर साळनदीकडे मोहरा करून असणारी तोफ साक्ष देत आहे की, पोर्तुगीजांना घाम आणणारा साळ नदीच्या मुखावर शिवरायांच्या आशीर्वादाने बांधला जाणारा हाच तो बेतुलचा किल्ला.

शिवाजी महाराजांचा मृत्यू

सन १६७९ च्या शेवटी शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांचे संबंध विकोपास गेले होते. दोन्ही बाजूंनी जोरदार तयारी केली गेली. पोर्तुगीजांनी कुंकळ्ळी येथे पाच हजार सैन्य सज्ज ठेवले होत,े ते फोंडा येथे सुभेदार मदाजी अनंतने पोर्तुगीजांशी लढाई करण्याच्या उद्देशाने जय्यत तयारी सुरू केली. इतक्यात १६८० मध्ये शिवाजी राजांचा मृत्यू झाल्याची बातमी आली, तेव्हा पोर्तुगीजांचा श्‍वास मोकळा झाला. पोर्तुगीज शिवरायांविषयी लिहिताना तो आमचा महान शत्रू होता किंवा शिवाजी हा युद्धकाळापेक्षा शांततेच्या काळात अधिक धोकादायक होता असे म्हणत.
शिवाजी महाराजांनी गोव्यातून आदिलशाही सत्तेचे उच्चाटन केले आणि पोर्तुगिजांच्या आक्रमक राजकारणाला आणि धर्मांधतेला आळा घातला, त्याचबरोबर येथील राज्यकारभारात शिस्त आणली. शिवाजी महाराजांच्या काळी आजच्या गोव्याचा भाग त्यांच्या कुडाळ आणि फोंडा या दोन प्रांतांत मोडत होता. कुडाळ प्रांतात पेडणे, डिचोली, सत्तरी हे तालुके होते, तर फोंडा प्रांतात फोंडा, सांगे ,केपे, काणकोण हे तालुके होते. या प्रांताचे प्रमुख सरकारी अधिकारी सुभेदार असे, तर तालुक्यांचा प्रमुख हवालदार असे. शिवाजी महाराजांचे सुभेदार आणि हवालदार आपल्या राज्यातील व्यापार, प्रजेचे संरक्षण या बाबतीत किती दक्ष होते याची उदाहरणे पाहण्याजोगी आहेत.

प्रजाहितदक्षतेचे दाखले

डिचोली तालुक्यातील शिरगावात पोर्तुगीज नागरिक आंतोनियु पाइश हा काही शिपाई आणि दोन होड्या घेऊन येऊन देऊ कामत यांच्या घरातील सहा माणसांना पकडून घेऊन गेला, तेव्हा देऊ कामत डिचोलीचा हवालदार नरसो काळो यांच्याकडेे याबाबत तक्रार घेऊन गेला. तेव्हा हवालदाराने लगेच पोर्तुगीज गव्हर्नरकडे तक्रार करून आंतोनियु पाइश याच्यावर कारवाई करून देऊ कामतच्या कुटुंबियांना सोडवावे अशी मागणी केली. तेव्हा गव्हर्नरने या गुन्ह्याची चौकशी करून आंतोनियु पाइशला कैद करून त्याच्या हातापायास बेड्या घातल्या. अधिक चौकशी केली तेव्हा असे कळले की, देऊ कामत हा पाइश याचे सातशे साठ पादवि देणे होता. तेव्हा नरसो काळो ने देऊ कामतच्या पैशाची हमी देऊन देऊ कामतच्या कुटुंबियांची सुटका केली. अशा प्रकारे आपल्या प्रजेसाठी पोर्तुगिजांसारख्या शत्रुकडेही जामीन राहणारे सरकारी अधिकारी शिवरायांचेच असू शकतात.
व्यापारी, शेतकरी यांच्या होड्या पोर्तुगीज जप्त करीत, तेव्हाही फोंडा, डिचोली, पेडणे येथील अधिकारी तत्पर दखल घेत असल्याचे दिसते. या संबधी असंख्य पोर्तुगीज कागदपत्रांचे दाखले इतिहास संशोधक स. शं. देसाई यांनी आपल्या शिवशाही पोर्तुगीज कागदपत्रे या ग्रंथात दिले आहेत.

संभाजी राजांचा उदय

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर पोर्तुगिजांना समाधान वाटत असले तरी ते समाधान फारसे टिकले नाही. छत्रपती संभाजी राजे म्हणजे बाप से बेटा सवाई या म्हणी प्रमाणे पोर्तुगिजांनी अनुभवले. शहजादा अकबर या औरंगजेबाच्या लहान बंडखोर मुलास संभाजीराजांनी डिचोली येथे आश्रय दिला, तेव्हा मोगल या भागात आक्रमण करून संभाजीराजांना अडचणीत आणणार याचा फायदा पोर्तुगीजांनी घेण्याचे ठरविले, पण पोर्तुगिजांचा हा डाव मात्र त्यांच्यावरच उलटला. स्वत:चा कसाबसा बचाव करत त्यांनी आपली अब्रू सांभाळली. संभाजीराजे आणि पोर्तुगीज यांच्या संघर्षाचा इतिहास फार रोमांचकारी आणि मोठा आहे. त्याने एक मोठा ग्रंथच तयार होऊ शकतो. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यामुळे पोर्तुगीजांच्या राजकीय आणि धर्मांध महत्वाकांक्षांना हाती पायी बेड्या पडल्या. पुढे संभाजी राजांच्या बलिदानानंतर झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीतही पोर्तुगीज फारसे डोके वर काढू शकले नाहीत.

राजाराम महाराजांचा कालखंड

राजाराम महाराजांनी अस्थिर राजकारणात स्वराज्य टिकविण्यासाठी जहागिरी देण्याचे धोरण स्विकारले. त्यांचा फायदा घेत कुडाळचे सावंत आणि सौधेचे वडियार सौंधेकर यांनी राजाराम महाराज आणि नंतर छत्रपती शाहू महाराजांशी चांगले संबंध प्रस्थापित करीत पेडणे , डिचोली , सत्तरी हे तालुके सावंत वाडकरांनी आणि फोंड्यासह दक्षिण गोवा सौधेकरांनी वार्षिक २५ हजार होन याप्रमाणे जहागीर म्हणून घेतला.

शाहू छत्रपतींचा वरदहस्त

शाहू छत्रपतींच्या काळात हिंदवी साम्राज्य चारही दिशांनी वाढले. अनेक गोमंतकीय लोक दरबारात मोठ्या पदावर दिसू लागले. नारो राम मंत्रा (रेगे) रामचंद्र सुखटणकर हे मंत्रिमंडळातील प्रमुख लोक. यांच्या काळात शाहू छत्रपतींच्या आशीर्वादाने गोव्यातील कवळे, शांतादुर्गा, मंगेशी इत्यादी मंदिरे दिमाखदारपणे उभी राहिली. पोर्तुगिजांना वसई आणि गोव्यातून उखडून काढण्यासाठी थोरल्या बाजीरावाचा भाऊ चिमाजीअप्पा यांच्या नेतृत्वाखाली वसईची इतिहासप्रसिद्ध मोहीम झाली. दोन वर्षे चाललेल्या त्या रक्तरंजित मोहीमेत असंख्य मराठे वीरांनी प्राणांची आहुती देत वसईतून आणि उत्तर कोकणातून पूर्णपणे उखडून टाकले, तसेच गोव्यात साष्टी, बार्देश ताब्यात घेऊन जीव कंठाशी आणला, परंतु आमच्या चांगल्या इतिहासाबरोबर आमचा भ्रष्ट इतिहासही आहे. गोव्यात वसईच्या मोहिमेची जबाबदारी असणार्‍या दादाजीराव नरगुंदकर भावे आणि व्यंकटराव घोरपडे यांनी बत्तीस हजार असुर्वी लांच खाऊन पोर्तुगीजांची गोव्यातील हकालपट्टी वाचवली. वसई मोहिमेनंतर पोर्तुगीजांची बोलतीच बंद झाली. ते आपली अब्रू कशीबशी संभाळून राहिले, पण त्यांना एक मोठा धडा मिळाला.

पोर्तुगिजांना कायमचा धाक
छत्रपती शिवरायांनी गोमंतभूमीवर परकीय धर्मांध शक्ती विरूद्ध रोवलेल्या संघर्षाच्या बिजांना छत्रपती संभाजीराजांनी आपल्या धाडसी पराक्रमांनी वाढविले, तर शाहू छत्रपती आणि चिमाजीअप्पा यांनी तो संघर्ष पूर्णत्वाला नेला. स्वराज्यातील अंतर्गत भांडणाचा फायदा घेत सन १७६३ ते ८५ च्या दरम्यान अनुक्रमे सावंत वाडकर आणि सौंधेकर यांच्याकडून आजच्या गोव्यातील नव्या काबीजादींचा भाग पोर्तुगिजांनी पुन्हा ताब्यात घेतला. मात्र, तेथे आपले जुने धर्मांध धोरण राबवले गेले नाही. तिथे तेथील स्थानिक देसायांना विश्‍वासात घेऊन तुमच्या धर्माला आणि मंदिरांना हात लावणार नाही असा जाहीरनामा काढून सर्वत्र जाहीर दवंडी पिटवून सांगितला गेला.

पोर्तुगिजांनी नव्या काबीजादीचा भाग ताब्यात जरी घेतला तरी त्यावर थोरले माधवराव पेशवे यांची करडी नजर होती आणि त्याहूनही जास्त काळजी महादजी शिंद्यांना होती, कारण महादजी शिंद्यांचे असंख्य कारभार हे गोवा आणि सिंधुदुर्गातील होते. या कारभार्‍यांची कुलदेवता गोव्यात होती. जिवबादादा केरकर, लखबादादा लाड, सुखटणकर, वागळे, दळवी, गुळगुळे इत्यादी मोठे अधिकारी हे मूळ गोव्यातील होते. त्यांच्या हाती शिंदे-होळकरांचा उत्तर हिंदुस्थानातील कारभार होता. सन १७८५ च्या दरम्यान शांतादुर्गा, कवळे या मंदिराच्या जमिनीचे उत्पन्न पोर्तुगीज सरकारने रोखून धरले, तेव्हा उत्तर हिंदुस्थानातून पोर्तुगीजांना जाब विचारून हे उत्पन्न परत मंदिरास चालू करावे अशी आज्ञा करणारे पत्र गोव्याच्या पुराभिलेखात आढळते. अशा प्रकारे गोमंतकीय धर्म, संस्कृतीचे संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजांनी बार्देश स्वारीपासून प्रारंभ केला, त्यास या वर्षी ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या गोव्याशी असलेल्या ऋणानुबंधांच्या स्मृती जागविण्याचा हा प्रयत्न.

संदर्भ ग्रंथ सूची

१) पोर्तुगेज मराठे संबंध – लेखक – पां. स. पिसुर्लेकर, प्रकाशन – पुणे विद्यापीठ.
२) पोर्तुगेज मराठे संबंध – लेखक – पां. स. पिसुर्लेकर, प्रकाशन – महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक मंडळ. सं. शं. देसाई भाग
१,२,३
३) शिवचरीत्र पत्रसार संग्रह भाग १,२,३ प्रकाशन – भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे. संपादन – शिवचरीत्र कार्यालय
पुणे.
४) शिवशाही पोर्तुगेज कागदपत्रे – लेखक – स. शं. देसाई. प्रकाशन – शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
५) श्री राजा शिवछत्रपती – लेखक – गजानन भास्कर मेहेंदळे. प्रकाशन – डायमंड पब्लिकेशन
६) आदीलशाही फर्मान – संपादन – निनाद बेडेकर, गजानन मेहेंदळे, रविंद्र लोणकर, प्रकाशन – डायमंड पब्लिकेशन
७) शिवछत्रपतीचे आरमार – लेखक – गजानन भास्कर मेहेंदळे, प्रकाशन – डायमंड पब्लिकेशन
८) जेधे शकावली व करीना – संपादन – अ. रा. कुलकर्णी, प्रकाशन – डायमंड पब्लिकेशन
९) राजा शिवछत्रपती – लेखक – ब. मो. पुरंदरे, प्रकाशक – पुरंदरे प्रकाशक