राज्यात मागील चौदा दिवसात सुमारे १८.९६ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पावसाचे सामान्य प्रमाण अंदाजापेक्षा ५३ टक्के जास्त आहे. दरम्यान, रविवारी पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने नागरिकांना उष्णतेला तोंड द्यावे लागले.
मागील चोवीस तासात उत्तर गोव्यात जोरदार पाऊस पडला. पेडणे येथे सर्वाधिक ४.७४ इंच, ओल्ड गोवा येथे ४.३५ इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी येथे ३.६२ इंच, पणजी येथे २.७४ इंच, म्हापसा येथे २.७९ इंच पावसाची नोंद झाली आहे. दक्षिण गोव्यात पावसाचे प्रमाण त्यामानाने कमी आहे. दाबोेळी येथे १.४८ इंच पावसाची नोंद झाली. इतर भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. वाळपई, फोंडा आणि काणकोण येथील पावसाच्या प्रमाणाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आगामी चार दिवसांत काही भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.