निलंबनानंतर बदलली विचार प्रक्रिया

0
141

>> लोकेश राहुलने सांगितले यशाचे रहस्य

‘कॉफी वुईथ करण’ या कार्यक्रमात महिलांसंबंधी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई झाल्यानंतर मला खडबडून जाग आली व मी माझी खेळासंबंधीची विचार प्रकिया पूर्णपणे बदलून टाकली. या बदललेल्या प्रक्रियेमुळे मी सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलो, असे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल याने काल रविवारी सांगितले.

राहुल व हार्दिक पंड्या यांना मागील वर्षी आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या प्रशासकीय समितीने कठोर कारवाई केली होती. या दुकलीला ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना मायदेशात माघारी बोलावण्यात आले होते.

‘माझ्या बदललेल्या खेळाचे संपूर्ण श्रेय त्या घटनेनंतर बदललेल्या माझ्या विचार प्रक्रियेला जाते. या घटनेपूर्वी मी स्वतःसाठी खेळायचो, मी स्वार्थी, आत्मकेंद्रित होतो, त्यामुळे माझ्या अपयशी खेळींची संख्या अधिक होती. परंतु, त्यानंतर मी संघाची गरज ओळखली व त्याप्रमाणे स्वतःमध्ये मोठे बदल केले,’ असे राहुल म्हणाला.

राहुल संघात परतल्यानंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये ऋषभ पंतला सक्षम पर्याय म्हणून उभा राहिला. त्याने वनडेतील ५ सामन्यांत ७५.७५च्या सरासरीने व ११४.७७च्या स्ट्राईक रेटने ३०३ धावा जमवल्या. टी-ट्वेंटीतही सलामीला येत त्याने ५६.००च्या सरासरीने व १४४.५१च्या झंझावाती स्ट्राईक रेटने २२४ धावा आपल्या खात्यात जमा केल्या.

राहुल पुढे म्हणाला की, आपल्या क्षमतेला योग्य दिशा देणे किती गरजेचे आहे हे मला निलंबनानंतर लक्षात आले. क्रिकेटपटू म्हणून तुमचे आयुष्य खूप कमी असते त्यामुळे त्याचा सद्उपयोग केला पाहिजे. प्रसिद्धीमुळे वाहून जाण्यास वेळ लागत नाही. परंतु, रुळावर येण्यास कित्येक वर्षे लागू शकतात. मी अजून ११ ते १२ वर्षे क्रिकेट खेळून देशासाठी योगदान देऊ शकतो, असा विश्‍वासही कर्नाटकच्या या २८ वर्षीय क्रिकेटपटूने व्यक्त केला.

राहुलने या प्रसंगी रोहित शर्माचा आवर्जुन उल्लेख केला. रोहितने दिलेला पाठिंबा व पाठबळ कधीच विसरणार नसून त्याच्या खेळाचा मी मोठा चाहता असल्याचे राहुल म्हणाला. ‘टी-ट्वेंटीमध्ये सलामीच्या जागेसाठी राहुलची जागा पक्की आहे. दुसर्‍या जागेसाठी माझ्यात व धवनमध्ये चुरस असते, असे रोहित मला म्हणाल्याचे राहुलने सांगितले. सचिनचा खेळ पाहून जसे डोळ्यांचे पारणे फिटते तसेच रोहितचा खेळ नॉन स्ट्राईकवरून पाहताना वाटते, असे राहुलने हिटमॅनचे कौतुक करत सांगितले. कठीण काळात रोहितसारख्या वरिष्ठ खेळाडूंचा पाठिंबा मिळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, असे राहुल शेवटी म्हणाला.