राज्यात चोवीस तासांत १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या त्यामुळे ४१९ झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये ८ कोरोना रुग्णांचा काल मृत्यू झाला. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. उत्तर गोव्यातील आझिलो इस्पितळात एका रुग्णाला मृतावस्थेत आणण्यात आले. इस्पितळातून डिस्चार्ज घेतलेल्या एका कोरोना रुग्णाचा घरी मृत्यू झाला आहे. सदर कोरोना रुग्णाने वैद्यकीय सल्ल्याला न जुमानता डिस्चार्ज घेतला होता, असेही आरोग्य खात्याच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
राज्यात काल नवे ३८१ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३२,७७७ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४५७७ एवढी आहे.
चोवीस तासांत आणखी ७०९ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या २७,७८१ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ८४.७६ टक्के एवढी आहे.
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या आणखी ३१२ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय काल स्वीकारला. होम आयसोेलेशनखालील रुग्णांची संख्या १५,२३९ झाली आहे. इस्पितळात नव्या ९४ रुग्णांना दाखल करून घेण्यात आले आहेत. कोविड प्रयोगशाळेत चोवीस तासांत १७५० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ३८१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. मागील दोन दिवसांत सरासरी दीड हजाराच्या आसपास कोविडच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहेत. कोविड प्रयोगशाळेत दोन हजारांच्यावर स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी केल्यास पाचशेपेक्षा जास्त रुग्ण आढळून येतात.
मेळावलीत आयआयटी विरोधात आंदोलन पेटले
>> नागरिकांनी सर्वेक्षण अधिकार्यांस रोखले, पोलिसांची माघार
मेळावली – गुळेली येथे कोणत्याही परिस्थितीत आयआयटी येऊ देणार नसून प्रसंगी आमचे रक्त सांडले तरी चालेल असा इशारा देत काल गुळेली पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना रोखून परत पाठवले. काल सकाळी नऊ वाजल्यापासून गावातील सुमारे पाचशे ग्रामस्थांनी सर्वेक्षणा विरोधात रस्ता रोखून धरला होता. मुरमुणे, शेळ, मेळावली, पैकुळ व धडा गावातील नागरिकांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला. गावातील महिला सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांनीही आयआयटीविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, सरकारी अधिकार्यांच्या कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवून रात्री दोन आंदोलकांना पोलिसांनी अटक केली.
सरकारने आयआयटी प्रकल्पाचा फेरविचार करावा असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला. आयआयटीविरोधात गुळेली पंचक्रोशीचे नागरिक आक्रमक झाले असून वेळ आली तर कोणत्याही आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवली असल्याचे नागरिकांनी सांगितले. काल सुमारे दोनशे पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती. मात्र, त्यांना न जुमानता आंदोलन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सरकारने मेळावली सत्तरीतील लोकांची फसवणूक केली असून वाळपईच्या आमदाराने जनतेवर ही आयआयटी लादली आहे, असा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. सरकार आयआयटीचे निमित्त करुन जमिनी ताब्यात घेत आहे, अशी टीका आंदोलकांनी केली. यापुढे स्थानिक आमदाराला मेळावली गावात प्रवेश दिला जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. वाळपई गट कॉंग्रेसने कालच्या आंदोलनात सहभागी होऊन आयआयटी विरोधी आंदोलनास आपला पाठिंबा दर्शवला.
जर सरकारने पोलिसांमार्फत नागरिकांची सतावणूक केली तर जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. जोवर सर्वेक्षण थांबवण्यात येत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील असे सांगण्यात आले.
पोलिसांची माघार
मेळावली गावातील सुमारे पाचशे आंदोलकांनी काल गावचा रस्ता रोखल्यानंतर पोलिसांनी सर्वेक्षण अधिकार्यांना आपल्या संरक्षणात गावात नेण्याचा प्रयत्न केला, पण नागरिकांनी त्यांना आत जाऊ दिले नाही. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर न करता माघार घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी आजगांवकर, पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, सत्तरीचे मामलेदार दशरथ गावस, संयुक्त मामलेदार, वाळपई पोलीस निरीक्षक सागर ऐकोस्कर यांची उपस्थिती होती.