चोवीस तासांत कोरोनाने ४ मृत्यू

0
261

राज्यात चोवीस तासात नवीन १७२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून कोरोना पॉझिटिव्ह आणखी ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील कोरोना मृतांची एकूण संख्या ६३० एवढी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४४ हजार ५४४ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या २०६५ एवढी आहे.

२३८ जण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी २३८ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ४१ हजार ८४९ एवढी झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९५ टक्के एवढे आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या नवीन १०४ रुग्णांची होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन ३२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

आणखी ४ रुग्णांचे निधन
राज्यात कोरोना रुग्णाचे मृत्यूसत्र सुरूच असून आणखी ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये दोन रुग्ण आणि मडगाव येथील ईएसआय इस्पितळात दोन रुग्णांचे निधन झाले आहे. खोर्ली म्हापसा येथील ७७ वर्षीय पुरुष रुग्ण, डिचोली येथील ६५ वर्षीय महिला रुग्ण, कुडचडे येथील ६६ वर्षीय पुरुष रुग्ण, फातोर्डा येथील ८८ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.

पणजीत नवे १० कोरोना रुग्ण
पणजीत नवीन १० कोरोना रुग्ण आढळून आले असून कोरोना रुग्णांची सध्याची संख्या १३४ एवढी झाली आहे. दोनापावल, मिरामार, आल्तिनो, बॉक द व्हॉक या भागात नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

उत्तर गोव्यातील चिंबल आणि कोलवाळ येथे प्रत्येकी १२० कोरोना रुग्ण आहेत. दक्षिण गोव्यातील मडगाव येथे १६७ रुग्ण, फोंडा येेथे १३३ रुग्ण, वास्को येथे १०९ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागातील कोरोना रुग्णांची संख्या शंभरांपेक्षा कमी आहे.