कॅसिनो व्यापार परवाना प्रकरणी पणजी महानगरपालिकेचा यूटर्न

0
101

पणजी महानगरपालिकेने मांडवी नदीतील ६ तरंगत्या कॅसिनो कार्यालयाच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण न करण्याच्या निर्णयाबाबत अखेर माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या ११ नोव्हेंबरला होणार्‍या बैठकीत कॅसिनो कार्यालयांच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरणाचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापौर उदय मडकईकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी कॅसिनो मांडवीतून हटविण्याची मागणी केल्यानंतर पणजी महानगरपालिकेने कॅसिनो कार्यालयाच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला होता.

शहरातील हॉटेल व इतर व्यावसायिक, रिक्षा, मोटरसायकल, टॅक्सी चालक व इतरांच्या हितासाठी कॅसिनो कार्यालयाच्या व्यापार परवान्याचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असा दावा महापौर मडकईकर यांनी केला.
कॅसिनोत काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी आपली वाहने मुख्य रस्ता, निवासीवस्तीत पार्क करू नये, अशी अट घालण्यात येणार आहे. रस्ता, निवासीवस्तीत पार्क केल्या जाणार्‍या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. कॅसिनोत काम करणार्‍यांना वाहन पार्किंगसाठी पाटो पणजी, पणजी मार्केट या भागात जागा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती महापौर मडकईकर यांनी दिली.

कॅसिनो कार्यालयांचा व्यापार परवाना, जाहिरात फलक शुल्कांच्या माध्यमातून अंदाजे ५२ लाख रुपयांचा महसूल प्राप्त होतो. कॅसिनोतील कर्मचारी, टॅक्सी चालक यांच्यासाठी टॉयलेटची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे, असेही महापौर मडकईकर यांनी सांगितले.