>> मुंबई इंडियन्सविरुद्ध आज महत्त्वपूर्ण लढत
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या १२व्या पर्वातील विजेत्या व उपविजेत्या संघांत आज यूएईत सुरू असलेल्या आयपीएलच्या १३व्या पर्वातील ४१वा सामना आज शारजा क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ९ लढती खेळलेल्या असून ६ विजय व ३ पराभवांसह ते १२ गुण मिळवित गुणतक्त्यात तिसर्या स्थानी आहेत. चेन्नई सुपरकिंग्जला पराभूत करीत आज त्यांचा गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थानी झेप घेण्याचा प्रयत्न असेल. मुंबईचे सलामीवीर कर्णधार रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकन क्विंटन डी कॉक पूर्ण बहरात आहेत. त्यांच्याकडून आजही दमदार सलामीची अपेक्षा संघ व्यवस्थापन व चाहते करीत असणार. गेल्या सामन्यात मुंबईला किंग्ज इलेव्हन पंजाबकडून ‘डबल सुपर ओव्हर’मध्ये पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात क्विंटन डी कॉकने शानदार अर्धशतक तर अष्टपैलू कीरॉन पोलार्ड व कृणाल पंड्या यांनी उपयुक्त योगदान दिले होते. सूर्यकुमार यादव, ईशान किशन व हार्दिक पंड्याकडेही मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. जर या सर्वांची बॅट चालली तर चेन्नईसाठी ते धोकादायक ठरतील. गोलंदाजीत ट्रेंट बौल्ट, जसप्रीत बुमराह, नाथन कुल्टर-नाइल चेन्नईच्या फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकतात. राहुल चहर व कृणाल पंड्या शानदार गोलंदाजी करीत आहेत.
दुसर्या बाजूने चेन्नई सुपरकिंग्जसाठी ही लढत ‘जिंकू किंवा मरू’च्या स्थितीतील असेल. त्यांना गुणतक्त्यात वर यायचे असेल तर उर्वरित सर्व लढती जिंकाव्या लागतील. स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळ जवळ संपुष्टात आलेले असले तरी उर्वरित चारही लढती जिंकल्यास त्यांच्यासाठी काहसा आशेचा किरण असेल. आतापर्यंत खेळलेल्या १० लढतींपैकी केवळ ३ लढतीच त्यांना जिंकता आलेल्या आहेत. तीन वेळची विजेती व चार वेळची उपविजेती असेलेली चेन्नईन ६ गुणांसह तळाला आठव्या स्थानावर आहे. त्यातच त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडल्याने त्यांना जोरदार झटका बसलेला असेल. गेल्या सामन्यात चेन्नईला राजस्थान रॉयल संघाने ७ गड्यांनी पराभूत केले होते. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईला ५ गडी गमावत केवळ १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली होती. चेन्नईसाठी जमेची बाजू म्हणजे त्यांनी स्पर्धेतील शुभारंभी सामन्यात मुंबई इंडियन्सवर मात केली होती. त्या आत्मविश्वासाच्या बळावर आज ते पुन्हा एकदा बाजी मारण्याचा प्रयत्न करतील. फाफ ड्यूप्लेसी व सॅम करन यांना चेन्नईला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. शेन वॉटसन व अंबाती रायडूही आणखी एक मोठी खेळी करण्याच्या प्रयत्नात असतील. मध्यफळीत कर्णधार धोनी, रवींद्र जडेजा आणि केदार जाधव यांना उपयुक्त योगदान देण्याची गरज आहे. गोलंदाजीत दीपक चहर आणि सॅम करन यांना चांगला मारा करावा लागेल. शार्दुल ठाकुरही उपयुक्त ठरू शकतो. फिरकीच्या विभागात पीयूष चावला पहिला सामना सोडल्यास उर्वरित सामन्यात अपयशी ठरला आहे. आज त्याला पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध करण्याची गरज आहे. रवींद्र जडेजाकडे फलंदाजांना माघारी पाठविण्याची क्षमता आहे.
मुंबई इंडियन्स (संभाव्य) ः रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, हार्दिक पंड्या, कीरॉन पोलार्ड, कृणाल पंड्या, नाथन कुल्टर-नाइल, राहुल चहर, ट्रेंट बौल्ट, जसप्रीत बुमराह.
चेन्नई सुपरकिंग्ज (संभाव्य) ः फाफ डू्यूप्लेसी, सॅम करन, शेन वॉटसन, अंबाती रायडू, महेेंद्रसिंह धोनी (यष्टिरक्षक/कर्णधार), रवींद्र जडेजा, केदार जाधव, दीपक चहर, पीयूष चावला, शार्दुल ठाकूर, जोश हेजलवुड/इम्रान ताहिर.