इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी पहिल्या सत्रातील चुरशीच्या खेळात चेन्नईन एफसीने केरला ब्लास्टर्स एफसीवर ३-१ असा दणदणीत विजय मिळविला. चारही गोल पहिल्या सत्रात झाले.
या लढतीपूर्वी दोन्ही संघांच्या खात्यात एकमेव विजय जमा होता. त्यामुळे दुसर्या विजयासाठी चुरस होती. त्यात नवे प्रशिक्षक ओवेन कॉयल यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान संघाने बाजी मारली. त्यांच्यासाठी घरच्या मैदानावरील पहिली लढत संस्मरणीय ठरली. ब्लास्टर्सची निराशा कायम राहिली. सलामीला एटीकेला गारद केल्यानंतर एल्को शात्तोरी यांचा संघ अजूनही एका प्रयत्नात तीन गुणांच्या प्रतिक्षेत आहे.
चेन्नईनने दुसर्या विजयाची लांबलेली प्रतीक्षा अखेर संपुष्टात आणताना एक क्रमांक प्रगती केली. ८ सामन्यांत २ विजय, ३ बरोबरी व ३ पराभव अशा कामगिरीसह त्यांचे ९ गुण झाले. त्यांनी ब्लास्टर्सला मागे टाकून आठवे स्थान गाठत एक क्रमांक प्रगती केली. ब्लास्टर्सला ९ सामन्यांत चौथा पराभव पत्करावा लागला. एकमेव विजय आणि ४ बरोबरी अशा कामगिरीसह त्यांचे ७ गुण कायम राहिले. त्यांची एक क्रमांक घसरण झाली. आता ते नवव्या स्थानावर आहेत. ब्लास्टर्स आणि तळातील हैदराबाद एफसी यांना केवळ एकच विजय मिळविता आला आहे. खाते उघडण्याची शर्यत चेन्नईनने जिंकली. डावीकडे रॅफेल क्रिव्हेलारो याने चेंडूवर ताबा मिळवित गोलक्षेत्रात धडक मारली. त्याने नेटसमोरच आंद्रेला पास दिला. पहिल्या प्रयत्नात चेंडूवर ताबा मिळवित आंद्रेने अफलातून फटका मारत गोल केला. चौथ्याच मिनिटाला झालेला गोल सनसनाटी ठरला. कर्णधार बार्थोलोम्यू ओगबेचे याने ब्लास्टर्सला बरोबरी साधून दिली. यात एलि साबिया याने फाऊल केल्यामुळे ब्लास्टर्सला गोलक्षेत्रालगत फ्री किक मिळाली. त्यावर ओगबेचेने मारीओ आर्क्वेसला पास दिला. त्यातून पुन्हा चेंडू मिळवित त्याने उत्तम ड्रीबलिंगचे कौशल्य सादर करीत गोल नोंदविला. चेन्नईनने ३०व्या मिनिटाला आघाडी घेतली. क्रिव्हेलारोनेच ही चाल रचत नेरीयूसला पास दिला. त्यातून छांगटेला पास मिळाला. आपल्या मार्करला चकवित छांगटेने चेंडूला नेटची दिशा दिली आणि मग उत्स्फूर्त जल्लोष केला.
पूर्वार्ध संपण्यात पाच मिनिटे बाकी असताना अनिरुध थापाने मध्य क्षेत्रातून छांगटेला पास दिला. त्यानंतर प्रतिस्पर्धी गोलरक्षक टी. पी. रेहेनेश पुढे सरसावला, पण छांगटेने चेंडू नेटच्या दिशेने मारला. तो रोखण्याचा प्रयत्न व्लाच्को ड्रोबारोवने केला, पण चेंडू पोलला लागला. मग आपल्या दिशेने चेंडू येताच नेरीयूसने पुढील काम चोखपणे पार पाडले.मध्यंतरास ३-१ अशी आघाडी चेन्नईनच्या बाजूने होती. दुसर्या सत्रात यात काहीही बदल झाला नाही.