चेकिनाटो, थिएम उपांत्य फेरीत

0
61
Italy's Marco Cecchinato celebrates after victory over Serbia's Novak Djokovic during their men's singles quarter-final match on day ten of The Roland Garros 2018 French Open tennis tournament in Paris on June 5, 2018. / AFP PHOTO / CHRISTOPHE ARCHAMBAULT

>> नोवाक जोकोविच, आलेक्झांडर झ्वेरेवचा पराभव

इटलीच्या बिगरमानांकित मार्को चेकिनाटो याने १२ ग्रँडस्लॅम विजेत्या व विसाव्या मानांकित सर्बियाच्या नोवाक जोकोविचचा ६-३, ७-६ (७-४), १-६, ७-६ (१३-११) असा पराभव करत फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
या स्पर्धेपूर्वी ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकही विजय मिळविण्यात अपयशी ठरलेल्या चेकिनाटो याने ३ तास २६ मिनिटे चाललेल्या मॅरेथॉन लढतीत जोकोविचच्या अनुभवाला पाणी पाजले. दुसरीकडे सातव्या मानांकित डॉमनिक थिएम याने सलग तिसर्‍यांदा फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करताना द्वितीय मानांकित आलेक्झांडर झ्वेरेव याला ६-४, ६-२, ६-१ असे पराजित केले. उपांत्य फेरीत ऑस्ट्रियाच्या थिएमचा सामना जागतिक क्रमवारीत ७२व्या स्थानावरील इटलीच्या मार्को चेकिनाटो यांच्याशी होणार आहे.

आपल्या पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळण्यासाठी लागोपाठ तीन सामने पाच सेटपर्यंत खेळलेल्या झ्वेरेवचा काल थिएमविरुद्ध निभाव लागला नाही. त्याच्या फटक्यांत ताकदीचा अभाव स्पष्टपणे जाणवत होता तसेच त्याची हालचालदेखील मंदावली होती. रोलंड गॅरोवरील सलग तीन मॅरेथॉन लढतींमुळे थिएमविरुद्ध केवळ हजेरी लावण्याचे काम झ्वेरेवने केले. दुसर्‍या सेटमध्ये तर त्याला आपल्या डाव्या पायावर पट्टीदेखील बांधावी लागली. झ्वेरेवने संपूर्ण सामन्यात तब्बल ४२ टाळता येण्यासारख्या चुका केल्या तर केवळ १९ विजयी फटके लगावले.

ढगाळ वातावरणातील पहिल्या सेटमध्ये थिएमने एकमेव ब्रेक पॉईंट शानदार बँकहँडद्वारे आपल्या नावे करतानाच बिनतोड सर्व्हिच्या जोरावर हा सेट खिशात घातला. थिएम दुसर्‍या सेटमध्ये ४-१ असा आघाडीवर असताना झ्वेरेवने ‘मेडिकल टाईम आऊट’ घेतला. यानंतर लगेचच त्याला दोन सेटनी पिछाडीवर जावे लागले. यामुळे उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी त्याला पाच सेटपर्यंत झुंजावे लागणार हे नक्की झाले. परंतु, थिएमने तिसर्‍या सेटसह सामना जिंकत झ्वेरेवला बाहेरचा रस्ता दाखवला.

महिला एकेरीत अमेरिकेच्या दहाव्या मानांकित स्लोन स्टीफन्सने १४व्या मानांकित दारिया कसातकिना हिला ६-३, ६-१ असा दणका दिला तर १३व्या मानांकित मॅडिसन कीजने युलिया पुतिनेत्सेवा हिला ७-६, ६-४ असे पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा व एदुआर्द रॉजर व्हेसलिन यांचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच संपला. त्यांना ८व्या मानांकित निकोल मेकटिक व आलेक्झांडर पेया यांनी ७-६, ६-२ असे हरविले.