चॅम्पियन्स करंडकाऐवजी टी-२० विश्‍वचषक

0
104

भारतात २०२१ साली होणारी आठ देशांची चॅम्पियन्स करंडक स्पर्धा रद्द करण्यात आली असून त्या जागी टी-२० विश्‍वचषक स्पर्धा खेळविली जाणार आहे. आयसीसी कार्यकारी मंडळाच्या काल संपलेल्या बैठकीनंतर आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सदर घोषणा केली. टी-२० स्पर्धेत सोळा देशांचा समावेश असेल, असेही ते म्हणाले. सुरुवातीला विरोध केल्यानंतर बीसीसीआयचे प्रतिनिधी अमिताभ चौधरी यांनी आयसीसीच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. त्यामुळे दुसर्‍यांदा लागोपाठच्या वर्षी टी-२० विश्‍वचषक स्पर्धा होणार आहे.

२०२० साली ऑस्ट्रेलियातील स्पर्धेनंतर भारतात २०२१ साली टी-२० विश्‍वचषकाचा थरार पहायला मिळणार आहे. यापूर्वी २००९ (इंग्लंड) व २०१० (वेस्ट इंडीज) साली सलग दोन विश्‍वचषक स्पर्धा झाल्या होत्या. याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी संलग्नित सर्व १०४ देशांच्या टी-२० सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याचे काल गुरुवारी आयसीसीने जाहीर केले. जागतिक स्तरावर क्रिकेटची लोकप्रियता वाढविण्यासाठीचे हे मोठे पाऊल मानण्यात येत आहे. त्यामुळे अर्जेंटिना व पापुआ न्यू गिनी यांच्यात झालेल्या टी-२० सामन्यालादेखील आंतरराष्ष्ट्रीय सामन्याचा दर्जा लाभणार आहे. महिला संघासाठीच्या टी-२० आंतरराष्ट्रीय दर्जाला १ जुलै २०१८ पासून तर पुरुषांच्या सामन्यांना १ जानेवारी २०१९ पासून आंतरराष्ट्रीय दर्जा मिळणार आहे. महिला संघांची क्रमवारी ऑक्टोबर २०१८ पासून तर पुरुष संघांची क्रमवारी मे २०१९ पासून जाहीर करण्यात येणार आहे.