चीनला मागे टाकत भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश

0
16

भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकले असून, आता भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनला आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए) च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. भारताची लोकसंख्या आता चीनपेक्षा सुमारे 29 लाखांनी जास्त आहे. या आकडेवारीनुसार भारताची लोकसंख्या 142 कोटी 86 लाख आहे. दुसरीकडे चीनची लोकसंख्या 142 कोटी 57 लाख एवढी आहे.
या वर्षाच्या सुरुवातीलाच जागतिक तज्ज्ञांनी 2023 मध्ये भारत सर्वाधिक लोकसंख्येचा देश होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.

यूएनएफपीएच्या नव्या आकडेवारीने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या अहवालानुसार भारताची लोकसंख्या एका वर्षात 1.56 टक्क्यांनी वाढली.
या अहवालानुसार, भारतातील 25 टक्के लोकसंख्या 0 ते 14 या वयोगटातील आहे. 18 टक्के लोक हे 10 ते 19 वयोगटातील आहेत, 26 टक्के 10 ते 24 वयोगटातील आहेत. 68 टक्के लोक 15 ते 64 वर्षे वयोगटातील, तर 65 वर्षांवरील 7 टक्के लोक आहेत. दुसरीकडे, चीनमध्ये 17 टक्के लोक 0 ते 14 वर्षे, 12 टक्के लोक 10 ते 19 वर्षे, 18 टक्के लोक 10 ते 24 वर्षे, 69 टक्के 15 ते 64 वर्षे आणि 14 टक्के लोक 65 वर्षांच्या दरम्यान आहेत.