चिन्मयानंद स्वामींची ८ तास चौकशी

0
98

>> कायदा विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरण

कायदा शाखेच्या एका विद्यार्थिनीवर बलात्काराचा आरोप असलेले भाजप नेते तथा माजी केंद्रीय मंत्री स्वामी चिन्मयानंद यांची एसआयटीच्या पथकाने शहाजहांपूर पोलिस स्थानकावर काल रात्रीपासून सुमारे आठ तास कसून चौकशी केली. नंतर पहाटे चिन्मयानंद यांना कडेकोट बंदोबस्तात तक्रारदार विद्यार्थिनीसह शहाजहांपूर येथील त्यांच्या आश्रमात आणून चौकशी केली व तेथील त्यांच्या बेडरूमला सील ठोकण्यात आले.

चिन्मयानंद यांच्या आश्रमाजवळच तक्रारदार विद्यार्थिनी शिकत असलेले कायदा महाविद्यालय आहे. एसआयटीच्या चौकशी पथकाने तक्रारदार विद्यार्थिनीस चिन्मयानंद यांच्या बेडरुममध्ये आणून तपासकाम केले. यावेळी बरोबर फॉरेन्सिक विभागाचे अधिकारीही होते. विद्यार्थिनीने केलेल्या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी तिला चिन्मयानंद यांच्या बेडरुममध्ये आणण्यात आले असे पोलिसांनी सांगितले. चिन्मयानंद यांना या प्रकरणाच्या तपासकामासाठी पोलिस स्थानकावर येण्यास सांगण्यात आल्यानंतर ते गुरुवारी संध्या. ६ वा. तेथे पोचले. तेथे ते एसआयटी पोलीस पथकाबरोबर रात्री १ वा. पर्यंत होते.अशी माहिती त्यांचे वकील ओम सिंग यांनी दिली.
दरम्यान एसआयटीच्या विनंतीवरून तेथील एसएस कायदा महाविद्यालय सुरक्षेच्या कारणावरून काल बंद ठेवण्यात आले. तसेच त्याआधी मंगळवारी एसआयटी पथकाने तक्रारदार विद्यार्थीनीचे वास्तव्य असलेल्या तिच्या हॉस्टेलमधील सीलबंद खोलीला भेट दिली. विद्यार्थिनीने पोलिसांना सांगितले होते की आपण केलेल्या आरोपांसंदर्भातील पुरावे आपण हॉस्टेलमधील खोलीत ठेवले आहेत. त्यामुळे विद्यार्थिनीच्या वडिलांसमक्ष तेथील सदर खोली उघडण्यात आली असे पोलिसांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून हॉस्टेलमधील विद्यार्थीनीच्या खोलीला पोलिसांनी सील ठेकले होते. मात्र विद्यार्थिनीच्या वडिलांनी सदर खोली सीलबंद करण्याआधी तेथे कोणी तरी तेथे येऊन शोधाशोध केल्याचा दावा केला आहे. आपल्या मुलीने तेथे ठेवलेले काही पुरावे नाहीसे झाल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या रविवारी एसआयटीने पीडित विद्यार्थिनी, तिचे वडील व भाऊ यांची सुमारे ११ तास चौकशी केली होती. तसेच संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार बरनवाल व सचिव अवनीश मिश्रा यांचे जबाब नोंदविले होते.