सुरक्षा वाढ, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची हॉटेल, रिसॉर्टना सक्ती

0
120

>> पर्यटन मोसमासाठी व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्त्वे

पोलीस यंत्रणेने आगामी पर्यटन मोसमाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर गोव्यातील हॉटेल, गेस्ट हाउस, रिसॉर्ट व्यावसायिकांना सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यात सुरक्षा व्यवस्था वाढविणे आणि सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे.

उत्तर गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांची बैठक काल घेण्यात आली. या बैठकीत उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उत्कृष्ट प्रसून यांनी हॉटेल व्यावसायिकांना सुरक्षा व्यवस्थेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक महेश गावकर, पणजीचे विभागीय अधिकारी उत्तम राऊत देसाई, पर्वरीचे विभागीय अधिकारी एडवीन कुलासो यांची उपस्थिती होती.

या बैठकीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यासाठी विविध उपाय योजना हाती घेण्याची सूचना करण्यात आली आहे. पर्यटकांची संख्या जास्त असलेल्या विभागात जास्त सावधगिरी बाळगण्याची सूचना हॉटेल व्यावसायिकांना करण्यात आली आहे.
हॉटेल व्यावसायिकांनी नाइट व्हीजन असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. हॉटेल व्यावसायिकांनी स्थानिक पोलिसांच्या संपर्कात राहावे. हॉटेलवर राहण्यासाठी येणार्‍या ग्राहकांची योग्य ओळख पटवून घ्यावी. हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या सर्व कर्मचार्‍यांची योग्य चौकशी करून शहानिशी करून घ्यावी. सुरक्षा यंत्रणा हाताळण्यासाठी कर्मचार्‍यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित आहेत की नाही याची वरच्यावर पाहणी करावी. सामानाचा पुरवठा करणार्‍या वाहनाची तपासणी करून घ्यावी, अशी विविध सूचना करण्यात आलेल्या आहेत.