काल भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे रशियाला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या (एससीओ) महत्त्वपूर्ण बैठकीत भाग घेण्यासाठी रवाना झाले. मात्र तेथे चिनी संरक्षणमंत्र्यांची भेट घेण्यास राजनाथ सिंह यांनी नकार दिला आहे. भारत-चीनमधील सीमेवरील तणावानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. संघटनेचे दोन महत्त्वाचे सदस्य भारत आणि चीन यांच्यात सीमेवर तणाव असताना रशियात ही बैठक होत आहे.
दि. ४ सप्टेंबरला होणार्या एससीओच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीस उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, राजनाथ सिंह हे रशियाचे संरक्षणमंत्री तसेच इतर अनेक वरिष्ठ लष्करी अधिकार्यांशी चर्चा करतील. चीनचे संरक्षणमंत्री जनरल वेई फेंघे आणि पाकिस्तानचे संरक्षणमंत्री परवेझ खटक हे या बैठकीत भाग घेणार आहेत. चीन आणि पाकिस्तानचे सैन्य रशियामधील आंतरराष्ट्रीय युद्ध सरावात भाग घेणार असल्यामुळे भारताने या सरावात भाग घेण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा हा दौरा होत आहे.
पूर्व लडाखमधील पँगॉंग सरोवराच्या परिसरात भारत-चीन सैन्यात दि. २९, ३० ऑगस्ट रोजी झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनच्या सैन्य अधिकार्यांची बैठक होत आहे. या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व लष्कराचे ब्रिगेड कमांडर करतील. दोन्ही देशातील सैन्यात मंगळवारीही ब्रिगेड कमांडर स्तरावर चर्चा झाली.
चीनच्या ११८ ऍप्सवर बंदी
दरम्यान, ५९ चायनीज ऍप्सवर बंदी घातल्यानंतर आज पुन्हा एकदा भारताने चीनवर डिजिटल स्ट्राइक करत काल चीनच्या ११८ ऍप्सवर बंदी घातली. त्यामुळे भारताने बंदी घातलेल्या चिनी ऍप्सची संख्या दोनशेवर पोहोचली आहे. काल बंदी घालण्यात आलेल्या ऍपमध्ये पबजी शिवाय, लिविक, व्हीचॅट वर्क आणि व्हीचॅट रीडिंग, ऍपलॉक, केरम फ्रेंड्स अशा ऍप्सचा समावेश आहे. या आधी भारताने चीनच्या टिकटॉकसह अनेक ऍप्सवर बंदी घातली आहे.