चित्र महाराष्ट्राचे

0
27

जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे, तसतसे एकेका राज्यातील चित्र स्पष्ट होत चालले आहे. उत्तर प्रदेश खालोखाल सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रातील राजकीय चित्र काल काही अंशी स्पष्ट झाले. मुंबईतील राहुल गांधींच्या सभेत व्यासपीठावर उपस्थिती लावणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी येत्या निवडणुकीत मात्र ‘इंडिया’ आघाडीचे स्थानिक रूप असलेल्या महाविकास आघाडीसोबत न जाता ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आणि आपले नऊ उमेदवारही जाहीर केले. तिकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेही काँग्रेसच्या उमेदवार घोषणेची वाट न पाहता आपले सतरा उमेदवार जाहीर करून टाकले. उद्धव यांनी आपल्या पक्षातील निष्ठावंत चंद्रकांत खैरे, अनंत गीते, अरविंद सावंत, विनायक राऊत, अनिल देसाई आदींना उमेदवारी दिली आहेच, शिवाय आता प्रकाश आंबेडकरांनी वेगळा मार्ग पत्करल्याने आघाडीच्या आणखी काही जागांवरही उद्धव यांची शिवसेना दावा करील असे दिसते. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत आपले 23 उमेदवार जाहीर करून टाकले आहेत. शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट आणि महायुतीत येण्याची शक्यता असलेली राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या जागांचा तिढा सुटला की उर्वरित उमेदवारांची घोषणाही पक्ष करील. 2019 च्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महाराष्ट्रात एकत्रितरीत्या उतरले होते. राज्याच्या एकूण 48 जागांपैकी तेव्हा भाजपला स्वतः लढलेल्या 25 पैकी 23, तर शिवसेनेला लढलेल्या 23 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. मात्र, नंतर शिवसेनेची शकले उडाली आणि शिंदे गट भाजपच्या वळचणीला आला. येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाची पहिली कसोटी लागणार आहे. एका परीने त्यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई आहे. गद्दारीचा शिक्का बसलेल्या ह्या गटाचे येत्या निवडणुकीत मतदार काय करणार, त्यांना स्वीकारणार की नाकारणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. शिंदे गटाला भाजप जास्तीत जास्त तेरा जागा, तर अजित पवार गटाला जास्तीत जास्त पाच ते सहा जागा सोडू इच्छितो. मनसेने दक्षिण मुंबई, नाशिक आणि शिर्डी ह्या तीन जागा मागितल्या आहेत, परंतु मनसेला केवळ दक्षिण मुंबईच्या जागेवर समाधान मानावे लागेल असे दिसते. राष्ट्रीय समाज पक्षालाही एक जागा सोडली जाणार आहे. महायुती एकसंध दिसत असली, तरी हे जागावाटप वाटते तेवढे सरळ होण्याची शक्यता नाही. त्यामध्ये अनेक तिढे आहेत. शिंदे गटाच्या ठाण्यासह काही जागांवर भाजप आपले उमेदवार उतरवू इच्छितो. शिंदे आणि पवार गटाला काही जागा सोडाव्या लागणार असल्याने तेथील भाजपचे नेते नाराज आहेत. हीच स्थिती महाविकास आघाडीच्या बाबतीतही आहे. उद्धव ठाकरेंनी उमेदवारांची घोषणा केलेल्या मतदारसंघांमधील काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलन पुकारले आहे. ह्या सगळ्या पेचप्रसंगातून मार्ग काढून येणारी निवडणूक एकसंधपणे लढवण्याचे आव्हान ह्या दोन्ही प्रतिस्पर्ध्यांपुढे असेल. भाजपने आजवर जाहीर केलेल्या उमेदवारांत काही विद्यमान खासदारांच्या जागी नवी नावे दिसतात. त्यामध्ये पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या जागी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे नाव आहे. एका आजारी खासदाराच्या जागी मुलाला तिकीट देण्यात आले आहे. प्रीतम मुंडेंचे तिकीट कापून भगिनी पंकजा मुंडेंना बीडचे तिकीट दिले गेले आहे. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल उत्तर मुंबईतून, तर नितीन गडकरी नागपुरातून निवडणूक लढवत आहेत. गडकरींनी काल रोड शोद्वारे आपल्या निर्णायक प्रचाराला प्रारंभही केला. काँग्रेसने मागील निवडणुकीत पंचवीस जागा लढवल्या होत्या, पण त्यांना केवळ एकच जागा जिंकता आली होती. यावेळी काँग्रेसचे स्थान राहील हे पाहणेही औत्सुक्याचे आहे. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक गेल्या वेळी चार टप्प्यांत झाली होती. यावेळी ती पाच टप्प्यांत ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील निकाल काय लागतात त्याकडे देशाचे लक्ष लागून राहिलेले आहे, याचे एक कारण ऐंशी जागा असलेल्या उत्तर प्रदेशाखालोखाल सर्वाधिक म्हणजे 48 जागा असलेले ते राज्य आहे हे तर आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाने इतर पक्ष फोडून जे केले, त्याला मतदारांचा प्रतिसाद सकारात्मक मिळतो की नकारात्मक हेही येणारी निवडणूक सांगणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंचे वारस उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची बनलेली आहे. दोघांच्याही पक्षांची भाजपने धूळधाण उडवली. त्यातून पक्षाला नवी उभारी देण्याच्या दृष्टीने येती निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे.