चित्रपश्चिमा द ट्रीप टू द मून – चंदेरी दुनिेयेतील चंद्रावरची सफर

0
590

– यती लाड

भारताने आपले दुसरे चांद्रयान यावर्षी ६ सप्टेंबरला चंद्रावर उतरेल अशी घोषणा केली आहे. चंद्र आणि त्यावरची सृष्टी ही केवळ कवी आणि लेखकांनाच नव्हे तर वैज्ञानिकांना व अंतराळवीरांना जशी साद घालत आली, तशीच चित्रपटसृष्टीलाही. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवण्याच्या कित्येक वर्षे आधी एका कलंदराने चंदेरी दुनियेत मानवाला चंद्राची सफर घडविली होती. त्याविषयी –

विज्ञान हे मानवी जीवनाला लाभलेले वरदान. याच विज्ञानाच्या बळावर माणसाने अनेक रहस्ये उलगडली आणि तो उलगडत राहील. विज्ञानाबद्दलची जिज्ञासा माणसामध्ये कायम असणार आहे. याच विज्ञानातील सर्वात जास्त आकर्षित करणारा विषय म्हणजे ब्रम्हांड आणि विश्वाची निर्मिती. मानवाला पृथ्वीची निर्मिती, चंद्र- तारे- ग्रह या सर्व गोष्टींनी नेहमीच भुरळ घातली आहे, नुकतीच त्यात भर घातली ती कृष्णविवराच्या पहिल्यावहिल्या छायाचित्राने. असा हा विषय चित्रपट तयार करणारे तरी कसे काय चुकवतील?
विज्ञानकथा किंवा सायन्स फिक्शन हा जगभरातील चित्रपटांचा एक असा विषय, जो केवळ मनोरंजन नसून विज्ञानाच्या जगतात होणारे संशोधन, प्रयोग आणि त्यांची व्याप्ती किती मोठी असू शकते याची एक झलक दाखवतो.
चित्रपटांमध्ये विज्ञानावर आधारित कथा ही जास्त करून अवकाशाववर केंद्रित असते. अवकाशावर आधारित चित्रपट तयार करण्याचा ट्रेंड मागील काही वर्षांत बराच वाढला आहे. इट्सटेलर, मार्शियन, ग्रॅव्हिटी मार्स मिशन यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना थिएटरमधून थेट अवकाशाची सफर घडवली आहे.

अशा अवकाशकेंद्रित चित्रपटाची सुरूवात फ्रान्समधून झाली १९०२ साली. तो असा काळ होता जेव्हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे जग हळूहळू आकार घेत होते.
द ट्रीप टू मुन हा १९०२ मधे प्रदर्शित झालेला जॉर्ज मेलीएस यांचा चित्रपट. हा सिनेमा आजही अभ्यासला जातो, आजही या सिनेमाबद्दल बोलले जाते आणि तो जगभरात पहिला जातो. या सिनेमाने पहिल्या मोशन पिक्चरचा मान जरी मिळवला नसला तरी सिनेसृष्टीत या चित्रपटाने पहिला यशस्वीरीत्या विज्ञानकथेवर आधारित चित्रपट बनण्याचा मान जरूर मिळवला आहे.

जॉर्ज मेलीएस हे मुळात जादुगार होते आणि आश्चर्यकारक गोष्टी प्रेक्षकांसमोर अधिक प्रभावीपणे मांडायच्या असल्यास चित्रपट हे त्यासाठी उत्तम माध्यम ठरेल हे त्यांनी जाणले होते. इथूनच सुरवात झाली कॅमेर्‍याच्या माध्यमातून अवकाशयात्रेची.
द ट्रिप टू मुन हा चित्रपट अनेक कारणांसाठी खास आहे. ज्या काळी हा चित्रपट बनला, तेव्हा माणसाला चंद्रावर जाता येईल याचा विचार किंबहुना या गोष्टीवर कुणी विश्वासही ठेवला नसता. दुसरी गोष्ट म्हणजे हा चित्रपट तयार होऊन दोन वर्षांनी म्हणजे १९०५ मध्ये विमानाने आकाशात यशस्वी झेप घेतली. अशा परिस्थितीत माणूस चंद्रावर पोहोचेल ही गोष्ट अनेकांसाठी केवळ फँटसी होती. त्यात एडिटिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स, ट्रान्झिशन, सिनेमाची इतर तंत्रे हे अजूनही विकसित झालेले नव्हते. नसल्यातच जमा होते. पण जादुगार असलेल्या जॉर्ज मेलीएस यांनी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसताना आपली करामत दाखवली. त्यांनी प्रेक्षकांना चंद्राची सफरही घडवली आणि विज्ञानाची एक अनोखी आणि जादूई दुनिया प्रेक्षकांसमोर आणली. हा चित्रपट तयार झाल्यानंतर जवळजवळ ६५ वर्षांनी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले…
द ट्रीप टू मुन हा संपूर्ण चित्रपट एका स्टुडिओमध्ये स्टेजवर चित्रित करण्यात आला. नाटकासाठी ज्या पद्धतीने नेपथ्य तयार करण्यात येते, अगदी तसेच नेपथ्य त्यासाठी तयार करण्यात आले होते. या सिनेमातील कॅप्स्यूलच्या आकाराचे अंतरिक्षयान हेदेखील कॅनव्हासद्वारे तयार करण्यात आले होते.
या चित्रपटाचे कथाकार, कॅमेरामन, सिनेमॅटोग्राफर आणि अगदी प्रमुख कलाकारही होते जॉर्ज मेलीएस.

या चित्रपटातील पोशाखांबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटातील वैज्ञानिक हे पारंपरिक पोशाखात नसून जादुगारच्या पोशाखात आहेत. सिनेमांमध्ये आधी कट टू कट फ्रेम वापरल्या जायच्या. जॉर्ज मेलीएस यांनी या सिनेमात दुसरी फ्रेम दाखवण्यासाठी ट्रान्झिशन (रूपांतर)चा वापर केला, ज्याला डिसॉल्व्ह इफेक्ट म्हटले जाते, जो चित्रपटांत पहिल्यांदाच वापरला गेला. सिनेमाचा शेवट करण्यासाठी समुद्रकिनारी बाह्यचित्रीकरण करण्यात आले. पण बाकी सर्व चित्रीकरण इनडोअर असून नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून तयार करण्यात आले होते. यासाठी स्टुडिओचे छप्पर हे काचेचे तयार करण्यात आले होते, कारण त्यावेळी प्रकाशयोजना ही संकल्पना नव्हती.

या चित्रपटाची कथा साधी आहे. वैज्ञानिकांची एक टीम चांद्र मोहिमेसाठी आधी तयारी करते, तेही कोणतेही विश्लेषण न करता. एका फळ्यावर प्रोफेसर जे खुद्द जॉर्ज मेलिएस आहेत ते केवळ पृथ्वी, चंद्र आणि अंतरिक्षयान याचे फक्त चित्र काढून आपल्या टीमला समजावत असतात. हे झाल्यानंतर चांद्र मोहिमेसाठी हे वैज्ञानिक निघतात, मात्र अवकाशात जाणार म्हणून कोणतेही स्पेस सूट घातलेले नाहीत. मात्र जादूगाराचा पोशाख काढून सूटा बूटामध्ये हे अंतराळवीर त्या अंतरिक्षयानात बसतात. त्यानंतर निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती, निरोप दिल्यानंतर अंतराळयान अवकाशात झेपावते आणि चंद्रावर उतरते. हे चंद्रावरचे उतरणेसुद्धा अगदी कल्पकतेने दाखवण्यात आले आहे.

हे यान चंद्रावर उतरत असताना चंद्र हसताना दाखवला आहे. या हसत असलेल्या चंद्राच्या डोळ्यात नंतर यान उतरल्याचे दाखवून हसत असलेला हा चंद्र नंतर माणसाच्या आगमनामुळे रडू लागतो असे चित्रीत करण्यात आले आहे. याचा अर्थ नेमका काय होता आणि जॉर्ज नेमके काय सूचित करत होते हे पाहताना प्रत्येक प्रेक्षक आपल्या परिप्रेक्ष्यातून त्याचा अर्थ लावतो. पुढे माणूस चंद्रावर पोहोचताच काय करील तर आपण राहत असलेली पृथ्वी कशी दिसते याची उत्सुकता त्या माणसामध्ये दाखवण्यात आली आहे. त्यानंतर चंद्रावरील भूभाग, तिथली माणसे, त्याचबरोबर झालेली मारामारी आणि या सगळ्याचा सामना करत पुन्हा पृथ्वीवर परतणे अशी ही संपूर्ण कथा जी प्रेक्षकांना आवडली आणि त्या चित्रपटाची त्या काळी चर्चा सुरू झाली. ह्या सिनेमाचा काही भाग नंतर रंगीतही करण्यात आला.

असा हा मास्टर पीस तयार करण्यार्‍या जॉर्ज यांना नंतर अनेक आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले. त्यांना याच चित्रपटाच्या पायरसीचा जबरदस्त फटका बसला. त्यानंतर त्यांनी पुन्हा सिनेमा तयार केला नाही. मात्र, कल्पनाशक्ती, फँटसी आणि सांकेतिक गोष्टी एकत्रितपणे मांडल्या गेल्या तर निर्माण होणार्‍या गोष्टीला जादू म्हणण्यापलीकडे कोणताही दुसरा शब्द योग्य वाटत नाही. हे स्वतः जादुगार असलेल्या जॉर्ज मेलिएस यांनी सिद्ध केले हे खरे..