पेडणे आता बदललेय…

0
419
  •  शरच्चंद्र देशप्रभू

स्वभाववैशिष्ट्यांचे अनोखे नमुने. काही व्यक्ती परंपरेला धरून चालणार्‍या, रितीरिवाज पाळणारे, चौकटीत राहणारे, जमीनजुमल्याच्या कामात व्यस्त राहणारे तर काही नवी क्षितिजे धुंडाळणारे परिस्थितीमुळे किंवा उफाळलेल्या ऊर्मीमुळे. काही शिक्षणामुळे किंवा नोकरीधंद्यामुळे मुंबईला तात्पुरते स्थायिक झालेले. परंतु यांची नाळ कधी मूळ वास्तुपासून तुटली नाही.

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर पेडण्याला जाणे घडले. कै. मेघःश्याम ऊर्फ मदनबाबा देशप्रभू म्हणजे आजोबा, यांनी अक्षयतृतीयेप्रीत्यर्थ श्री रवळनाथ मंदिरात पालखी-उत्सव सुरू केला होता. चाळीस वर्षांपूर्वी ती.बाबांना श्री देव रवळनाथ म्हणजे सर्वस्व. या दैवतासंबंधीच्या कितीतरी कथा त्यांच्या आठवणींच्या पोतडीत होत्या. संकटकाळी रवळनाथाने आपले कसे रक्षण केले, हे ते समरसून सांगत असत. या जागृत देवस्थानाबद्दल त्यांच्या मनात उत्कट भक्तिभाव होता. आजोबांनी आरंभ केलेला पालखी-उत्सव, लघुरूद्र आम्ही आवर्जून साजरा करतो. व्यावहारिक किंवा प्रासंगिक अडचणी आल्या तरीपण!

कोलवाळचा पूल ओलांडल्यावर वाटले, आपण कुठल्यातरी खनिज खाणीत तर आलो नाही ना? दुतर्फा डोंगर पोखरले होते. धुळीचे साम्राज्य होते. चौपदरी किंवा सहा पदरी राष्ट्रीय महामार्गाचे काम संथ गतीने चालले होते. वाहतुकीचा रस्ता खड्डेग्रस्त! शासनाने जर डोंगर भुईसपाट केले, प्रगतीच्या नावाने, तर सामान्य नागरिक त्यांचे अनुकरण करणारच! गोव्यात तर काही वर्षांनी पर्वतांची नामोनिशाणी राहणारच नाही. पर्वत ही निसर्गाची किमया. मनुष्य याची निर्मिती करू शकत नाही. उभारू शकत नाही. अशा वेळी ही निसर्गाची संपत्ती मातीमोल करण्याचा आपल्याला अधिकार आहे का? गोव्यात दिवसेंदिवस सृष्टीतला ओलावा लुप्त होत चालला आहे अन् त्याचबरोबर मनातील ओलावापण. निसर्ग अन् मानव अंतर्बाह्य ओलावा हटवून बसले आहेत. दोहोंचा समांतर प्रवास चालू आहे शुष्कपणे, नीरसपणे. सारे महत्त्व गडकरींच्या ‘भावबंधन’ नाटकातल्या घनश्यामप्रमाणे. बुद्धीला, भावनेला थाराच राहिलेला नाही. रखरखीत रस्ते अन् रखरखीत मने. पुढच्या पिढीच्या भवितव्याबद्दल कुणालाच तमा नाही.
गेल्या साठ वर्षांत पेडणे किती बदललेय. काळाच्या रेट्यासमोर संदर्भपण सटासट बदलताहेत. गोव्यात आता ग्रामीण भागात खेडे उरलेलेच नाही.

साठ वर्षांपूर्वी नानेरवाडा म्हणजे निसर्गाला पडलेले एक सुंदर स्वप्न. बालकवीच्या ‘औदुंबर’ कवितेत वर्णिल्याप्रमाणे दाट हिरवळ ल्यालेले. कृषीसंस्कृतीचा एक अत्त्युत्तम आविष्कार. आता वेगळेच चित्र दिसून येते. ओसाड वाडे, घरे. माणसं कमी पण वाहने जास्त. राजू गावस हा गोव्यातील नागरी प्रशासनावरील उच्च श्रेणीतील अधिकारी. याचे बालपण पेडण्यात गेले. कारण वडिलांची तेथील पोलीस कचेरीत नेमणूक. अशीच राजूची तिन्हीसांजेला पेडण्यातील नानेरवाड्यात फेरी झाली. बदललेला नानेरवाडा बघून राजू स्तिमित झाला. वीज नसतानापण मुलांच्या बाललिलांनी अन् थोेरामोठ्यांच्या ‘गजालीं’नी खळखळणारा नानेरवाडा आज त्याला रिकामा रिकामा वाटला. प्रगती झाली परंतु गावे ओस पडली. रिकाम्या जागा स्थलांतरितांनी भरून काढल्या. एक वेगळाच समतोल येऊ पाहतोय, जेथे स्थानिकच आपल्या गावात परके होऊ लागले आहेत. स्थलांतरितांच्या वाढत्या लोंढ्यांना चिमुकला गोवा कसा पुरेल? नियोजनच कोलमडल्याचे प्रतीत होत आहे.

बालपणीच्या नानेरवाड्याच्या आठवणी साकळून येतात. हा वाडा सर्वदृष्ट्या स्वयंपूर्ण. भौगोलिकदृष्ट्या पण संकटमुक्त. प्राथमिक गरजा पुरवण्यास सभोवतालचा परिसर पुरेसा होता. पाणी, दूध, भाजीपाला नानेरवाड्यात किंवा जवळच्या परिसरात खाटकीण पण बकरं दाखवून मटण विकत द्यायची. त्यावेळचे मटणाचे माप म्हणजे ‘रात’. ताजे मटण, झाडावरची फळफळावळ अन् धारोष्ण दूध ही सारी नानेरवाड्याची इतर गोव्यातील ग्रामीण भागाप्रमाणे वैशिष्ट्ये होती. आता केंद्रिभूत सेवांमुळे पाणी व दूध शुद्ध मिळण्याचा पर्यायच उरलेला नाही. विविध ठिकाणी पसरलेल्या केंद्रातून दूध गोळा होते. ते कुर्टी येथे पाठवले जाते. तेथे शास्त्रोक्तरीत्या प्रक्रिया केली जाते. नंतर ते सार्‍या गोव्यात वितरीत होते. रतिबाने पुरवलेल्या दुधात काही दोष असतील. परंतु यामुळे विकेंद्रित दूध पुरवण्याची प्रक्रियाच बंद पडणे सामाजिकदृष्ट्या किती समर्थनीय ठरते याचापण विचार व्हायला हवा. परंतु तो प्रश्नच नाही. कालचक्र मागे फिरवणे अशक्यच. अशा कितीतरी जीवनावश्यक वस्तू ग्रामीण जीवनातून बाहेर अलगद सटकल्या आहेत. नानेरवाडा म्हणजे मोठमोठाल्या वाड्यांचे माहेरघर. इतर घरे पण भव्य. कौलारू. सूलची कौले येण्यापूर्वी घरे गावठी कौलांची. या कौलांची शाकारणी करायला कसब अन् आत्मियता हवी असे. अन् हे दोन्ही गुण असणारी माणसं उपलब्ध असत. कालांतराने गावठी कौलांची जागा मँगलोरी कौलांनी घेतली. सिमेंट कॉंक्रिटची घरे आली. काही घरे पत्र्याने आच्छादित केली गेली.

आमचे मूळ घर म्हणजे ‘मधली’ चौपट. ‘सकयल्यागेली’ चौपट अन् ‘वयली’ चौपट यांच्यामधली म्हणून कदाचित मधली. परंतु अन्य कारणे असतील. देशप्रभू घराण्याचे हे तीन भव्य वाडे अन् कालांतराने आलेली अन्य घरे यांचे नानेरवाड्याशी अतूट नाते. देशप्रभू कुटुंबीय नानेरवाड्याच कसे स्थायिक झाले याबद्दल इतिहासात ठोस पुरावे नाहीत. आहेत त्या ऐकीव गोष्टी. कदाचित दस्तऐवज अभ्यासला तर यात प्रकाश पडू शकेल. मधल्या चौपटीच्या डाव्या बाजूलाच आजोबांनी एक छोटे घर उभारले. समोर पुरातन मारुती मंदिर, डाव्या बाजूला रक्षणकर्त्या ब्राह्मणाचे देऊळ अन् उजव्या बाजूला नाडकर्णी कुटुंबाचा वाडा. माझे बालपण म्हणजे सहा वर्षांपर्यंत याच घरात गेले. गेल्या काही वर्षांत या घरात बरीच स्थित्यंतरे झाली. वीज आली. नळजोडणी आली. शेणजमिनीचे रूपांतर चकचकीत फरशीत झाले. जन्म मृत्यू झाले. कधी घर माणसांनी भरले तर कधी ओकेवोके राहिले. परंतु बालपणीच्या आठवणी मात्र मनात रुतून राहिलेल्या. गजबजलेली ‘सकयल्यागेली’ चौपट. कितीतरी कुटुंबांचे घटक यात स्थिरावलेले. वेगळी चूल मांडूनही मूळ बंध धरून ठेवणारे. या घरातील वय झालेली, तरुण तसेच समवयीन कितीतरी माणसे दिसत आमच्या घरासमोरून ये-जा करताना. मतभेद होते पण मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. स्वभाववैशिष्ट्यांचे अनोखे नमुने. काही व्यक्ती परंपरेला धरून चालणार्‍या, रितीरिवाज पाळणारे, चौकटीत राहणारे, जमीनजुमल्याच्या कामात व्यस्त राहणारे तर काही नवी क्षितिजे धुंडाळणारे परिस्थितीमुळे किंवा उफाळलेल्या ऊर्मीमुळे. काही शिक्षणामुळे किंवा नोकरीधंद्यामुळे मुंबईला तात्पुरते स्थायिक झालेले. परंतु यांची नाळ कधी मूळ वास्तुपासून तुटली नाही. १९५६ साली लादलेले कडक निर्बंध पण यांना मूळ घराकडे येण्यापासून अजून रोखू शकले नाहीत. गोवा स्वतंत्र झाल्यानंतर तर सगळेच अडसर दूर झालेत अन् मुंबईतील पेडणेकरांचे येणे-जाणे वाढले. नानेरवाड्यातील घरांना नवा साज मिळाला. कित्येक वर्षे रखडलेली दुरुस्ती शक्य झाली. या सकयल्या चौपटीतल्या गणपतीचे विसर्जन इतर देशप्रभूंच्या गणपतीच्या विसर्जनापूर्वीच व्हायचे. पोर्तुगीज सरकारच्या आदेशानुसार ही व्यवस्था झाली होती. इतिहासाचा मागोवा घेतला तर सगळ्या घराण्याच्या दुहीची कारणे होती देशप्रभू घराण्यातील गणेश विसर्जन न्हयबाग नदीत व्हायचे, अजूनही होते. परंतु घराण्यातील वितुष्टामुळे न्हयबाग येथे घराण्याच्या दोन गटात विसर्जनावेळी संघर्ष होण्याच्या घटना पण घडत. भर ऋषीपंचमीला गणपतीच्या वाजत गाजत येणार्‍या रिकाम्या ‘चवाय’बरोबर जायबंदी लोकांना पण आणावे लागे. झाडापाल्याच्या औषधोपचारासाठी दूहीची बीजे १९०५ साली पेटली. नक्की तपशील माहीत नाही. परंतु हा संग्राम रोखण्यासाठी शासनाने विसर्जनासाठी वेगवेगळ्या वेळा ठरवल्या. सकयल्यागेल्या गणपती विसर्जनात गावठी सुरूंग पण पेटविले जात असल्याचे स्मरते. इथे दत्तजयंती पण मोठ्या धूमधडाक्याने साजरी होत असे. न्हयबागचे स्वार कुटुंबीय, भव्य मंडप उभारत. या उत्सवाला हजारो लोकांची उपस्थिती असे. अच्युत पेडणेकर मशाल घेऊन भारल्या स्थितीत रुमडाच्या पेडाला प्रदक्षिणा घालत असल्याचे पण स्मरते. अनावर झाल्यावर त्याची मशाल हिसकावून घेत असत. अजूनही हा दत्तजयंती उत्सव जरी जुन्या डामडौलाने होत नसला तरी आधुनिकरीत्या साजरा होतो. याच्यानंतर डावीकडील ‘अर्धकारा’चे घर पण लक्ष वेधून घेतले. ही वास्तु पूर्वी मुख्य मळेवाडीला जाण्याच्या रस्त्यावर होती. कालांतराने ती आता असलेल्या जागेत बांधून काढली. इथले कुटुंबीय बहुत करून मुंबईलाच. परंतु कै. विठ्ठल आबा इथेच राहून घर आणि जमीनजुमल्याची व्यवस्था लावत. विठ्ठल आबांची कृश, उंच, एकाच हातावर कोट ठेवून वावरणारी मूर्ती आठवते. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. तसेच खालचे कै. काका देशप्रभू आठवतात. गार्टस पँटला लावून डोक्यावर हात ठेवून सायकल चालविणारे. उजवीकडील नाडकर्णींचे घर पाहिले की मन विषण्ण होते. बालपणी कितीतरी माणसे या घरात होती. गणेश चतुर्थीच्या आरती तीन तीन तास आठवत. दिपावलीच्या पहाटे या घरातून मंत्रपठण ऐकू येत असे. आता या गजबजलेल्या घरात अवघीच माणसं राहिली. काळाचा ठसा इथेपण जाणवतो. कै. माधव नाडकर्णी आमच्या वडिलांचे दोस्त. यांचे बाजारात एक दुकान असल्याचे स्मरते. यांची मुलगी कै. शरद माझी शिक्षिका. जवळच असलेले धुपकर भटजीचे घर. धुपकर म्हणजे जमदग्नीचा अवतार. आता या जागी भव्य इमारत आली. या घरापुढे काही ‘सकरे परोबां’ची घरे, झाल्यावर कुळकर्णी. कुळकर्णी हे रावराजेचे कारभारी. वृद्धपणी यांना मुंबईत नेले. परंतु जराजर्जर स्थितीत पण दसरोत्सवाला आलेले. मुलांनी पण घर उत्तम स्थितीत ठेवले. खालच्या झरीकडे जाणार्‍या उतरंडीवर सुप्रसिद्ध कवी मनोहर नाईक यांचे घर. अलीकडे दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले, मुंबईत झाले. शरीर विकलांग झाले तरी यांना घराची ओढ कायम होती. मध्यप्रदेश सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता कै. बी.जी. नाईकपण या घरातले. वळणावर विजय प्रभू पार्सेकरांचे घर. हे आमच्या घरचे भाचे. यांचे वडील पण शांत स्वभावाचे. आपल्याच वर्तुळात वावरणारे. अशी कितीतरी व्यक्तिमत्त्वे काळाच्या ओघात अंतर्धान पावली. आजच्या प्रगत युगात असा कित्येक व्यक्तींची दखल पण घेतली गेली नसती. परंतु त्या काळात प्रत्येक सामाजिक स्तरावर आपोआप एक समतोल साधला जायचा. द्वेष, असुया, माया, आपुलकी हे अंतर्विरोधाने अधोरेखित केलेले विकार होते. नव्हती ती संवेदनशून्यता जी आता पदोपदी प्रतीत होते.