चित्रपट ‘पायरसी’ रोखण्यासाठी कायदा आणणार

0
28

>> 3 वर्षांची कैद आणि 3 लाखांचा दंड ठोठावणार; केंद्रीय माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती; इफ्फीचे उद्घाटन

चित्रपटांची ‘पायरसी’ करणाऱ्यांना गजाआड करण्याची गरज आहे. चित्रपट पायरसीला पायबंद घालण्यासाठी छायाचित्रण कायदा करण्यात येणार असून, त्या अंतर्गत चित्रपटांची पायरसी करणाऱ्यांना 3 वर्षांच्या कैदेची शिक्षा आणि 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी काल 54 व्या इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्यावेळी स्पष्ट केले.
2047 पर्यंत इफ्फी हा जगातील एक सर्वश्रेष्ठ असा चित्रपट महोत्सव व्हावा, यासाठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांनी प्रयत्न करायला हवेत, अशी अपेक्षा देखील अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 सालापर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. या पार्श्वभूमीवर 2047 पर्यंत इफ्फी हा जगातील एक सर्वश्रेष्ठ असा चित्रपट महोत्सव व्हावा अशी सर्वांचीच मनीषा असायला हवी, असे ठाकूर म्हणाले.

दरवर्षी इफ्फीत ज्या 75 उभरत्या फिल्म मेकर्सची निवड करण्यात येते, त्यांना मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसमध्ये संधी मिळावी, यासाठी सरकारतर्फे प्रयत्न केले जाणार असल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.
जुन्या काळातील उत्कृष्ट आणि अभिजात अशा 5 हजार चित्रपटांचे पुनर्संचयन करून त्यांचे डिजिटलायझेशन करण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली. महिला चित्रपट निर्मात्या व महिला दिग्दर्शकांनी तयार केलेल्या चित्रपटांनाही योग्य ते स्थान देण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय सिनेमाने कात टाकली असून, कथानकासह सर्व बाबतीत नव्या कल्पना व नवे बदल आता चित्रपटात दिसू लागले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

भारतीय सिनेमा म्हणजे फक्त मनोरंजन नव्हे, हे चित्रपटकर्मींनी वेळावेळी दाखवून दिलेले असून, भारतीय चित्रपटांतून भारतीय संस्कृती, भारतीय परंपरा, भारतीय लोकजीवन व समाजजीवन यांचे सुंदर असे चित्रण पहावयास मिळत आहे याचा ठाकूर यांनी यावेळी प्रकर्षाने उल्लेख केला. या सगळ्या गोष्टींमुळे आता भारतीय चित्रपटांना भारताबरोबरच आशियाची राष्ट्रे व अन्य उपखंडातील राष्ट्रांतही प्रतिसाद वाढू लागला असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले. यंदाच्या इफ्फीत जनतेसाठी ‘सिने-मेळा’चे आयोजन करण्यात आल्याचे ठाकूर यांनी नमूद केले.

सर्वप्रथम अनुराग ठाकूर, डॉ. प्रमोद सावंत, यांच्याहस्ते दीप प्रज्वलनाने इफ्फीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक आदी मंडळी उपस्थित होती. सुरवात नृत्याच्या कार्यक्रमाने झाली आणि समारोप बॉलिवूडमधील कलाकारांच्या नृत्य व गाण्यांच्या कार्यक्रमाने झाला.

माधुरी दीक्षित यांना पुरस्कार
भारतीय चित्रपटसृष्टीसाठी विशेष व उल्लेखनीय असे योगदान दिल्याबद्दल सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. ‘पर्सनॅलिटी द इअर’ असे यापूर्वी या पुरस्काराचे नामकरण होते; पण ते आता बदलण्यात आले असल्याचे ठाकूर यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते यावेळी माधुरी दीक्षित यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉलिवूड अभिनेते अपार शक्ती खुराना व अभिनेत्री करिष्मा तन्ना यांनी केले.

विदेशी निर्मात्यांसाठी प्रोत्साहनपर निधीत वाढ
आपल्या चित्रपटांचे भारतात चित्रीकरण करणाऱ्या विदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिला जाणारा प्रोत्साहनपर निधी हा चित्रीकरणासाठी येणाऱ्या खर्चाच्या 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी यापूर्वीची 2.5 कोटी रुपयांची मर्यादा वाढवून ती 30 कोटी रुपये करण्यात आली आहे, असे अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांकडून फिल्म सिटीची घोषणा
गोवा हे सिनेमासाठीचे केंद्र बनवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे व त्यासाठी सरकार सर्व ते प्रयत्न करणार आहे, असे सांगून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी राज्यात फिल्म सिटी उभारण्याची घोषणा केली.

मनोरंजन क्षेत्रात भारत पाचव्या स्थानी
माध्यम व मनोरंजन ह्या क्षेत्रात भारत आता पाचव्या स्थानी आहे. आणि लवकरच तो ह्या क्षेत्रात तिसऱ्या स्थानी झेप घेणार असल्याचा आशावादही अनुराग ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्घाटनाला कलाकारांची मांदियाळी
अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेता सनी देओल, शाहिद कपूर, सारा अली खान, सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर, करण जोहर, पार्श्वगायिका श्रेया घोषाल, दिग्दर्शक आर. बाल्की, गीतकार प्रसून जोशी, दिग्दर्शक राहुल रवैल, दाक्षिणात्य अभिनेत्री खुशबू अशी बॉलिवूडमधील कलाकारांची मांदियाळी काल इफ्फीच्या उद्घाटन समारंभाला होती.