चार महिन्यांच्या खंडानंतर वास्को रेल्वे स्थानकावरून गोवा एक्स्प्रेस काल दि. १६ रोजी १४ प्रवाशांना घेऊन दुपारी तीन वाजता दिल्लीकडे रवाना झाली. कोरोना महामारीमुळे २२ मार्चपासून देशभर लॉकडाऊन केल्यानंतर सगळे दळणवळण बंद करण्यात आले होते. यात भारतीय रेल्वेचाही समावेश होता. त्यानुसार वास्को रेल्वे स्थानकावरून धावणार्या रेल गाड्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. मध्यंतरी मे महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यानंतर ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. मात्र वास्कोत वास्कोत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ती बंद करण्यात आली.
दरम्यान, कालपासून पुन्हा गोवा एक्स्प्रेस (०२७७९) ही रेल्वे १४ प्रवासी घेऊन दिल्लीला जाताना मडगाव रेल्वे स्थानकावर या रेल्वेतून २४५ प्रवासी दिल्लीला रवाना झाले. एकंदरीत २५९ प्रवासी वास्को व मडगाव येथून या रेल्वेतून रवाना झाले. ही रेल्वे आता दररोज वास्कोहून दिल्लीला रवाना होणार आहे. तर दिल्लीहून परतीच्या मार्गावर लागल्यावर वास्को रेल्वेस्थानक शेवटचा थांबा असेल.
कोकण रेल्वेही पूर्ववत मार्गाने सुरू
मडुरे ते पेडणे दरम्यान रेल्वे बोगद्यात दरड कोसळून मार्ग गेल्या दोन महिन्यापासून बंद होता ते अडथळे दूर करुन दुरुस्तीनंतर तो मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला केल्याचे रेल्वे अधिकार्यांनी जाहीर केले. मडगाव येथून लोंडा मिरजमार्गे वळविलेल्या गाड्या आत पूर्ववत सुरू झाल्या आहेत. गाडी क्रमांक ०२६१७ एर्नाकुलम निझामुद्दीन विशेष जलद गाडी दि. १५ पासून सुरू झाली आहे. गाडी क्र. ०२६१८ निझामुद्दीन ते एर्नाकुलम गाडी निझामुद्दीनहून दि. १५ रोजी सोडण्यात आली. गाडी क्र. ०२२९४ निझामुद्दीन एर्नाकुलम जलद गाडी दि. १९ सप्टेंबर रोजी सुटेल. गाडी क्र. ०२२९३ एर्नाकुलम निझामुद्दीन गाडी दि. २२ रोजी एर्नाकुलम येथून सुटेल. गाडी क्र. ०२४३२/०२४३१ नवी दिल्ली थिरुवनंतरपूरम सेंट्रल दिल्ली येथून काल दि. १६ सप्टेंबरला सुटली. गाडी क्र. ०६३४५/०६३४६ लोकमान्य टिळक मुंबई ते थिरुवनंतरपूरम खासगाडी दि. १६ पासून पुन्हा सुरू झाली. या सर्व गाड्या आपल्या पूर्वीच्या मार्गाने धावणार आहेत असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.