>> खाण संचालकांची माहिती; अंतिम लिलावासाठी पात्र कंपन्यांची नावे १४ डिसेंबरला जाहीर; २१ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण
राज्य सरकारच्या खाण आणि भूविज्ञान संचालनालयाने ई-लिलावासाठी खुल्या केलेल्या ४ खाणपट्ट्यांतील खनिज उत्खनन करण्यासाठी १० कंपन्यांकडून २८ तांत्रिक बोली निविदा प्राप्त झाल्या आहेत. या तांत्रिक बोली निविदांची पडताळणी करून खाणपट्ट्यांच्या अंतिम लिलावासाठी पात्र कंपन्यांची नावे १४ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहेत. तसेच, डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव व काले या खाणपट्ट्यांच्या लिलावाची प्रक्रिया २१ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती खाण खात्याचे संचालक सुरेश शानभोगे यांनी काल दिली.
खाण खात्याच्या चार खाणपट्ट्यांच्या लिलावासाठी तांत्रिक बोली निविदा सादर करण्याची २९ नोव्हेंबर ही शेवटची तारीख होती. खाण खात्याकडे खाणपट्ट्यांच्या लिलावासाठी ५१ बोली दस्तऐवज सादर करण्यात आले होते. तथापि, शेवटच्या तारखेपर्यंत केवळ २८ पूर्ण बोली निविदा प्राप्त झाल्या. डिचोली खाणपट्ट्यासाठी ५ बोली, शिरगाव-मये खाणपट्ट्यासाठी ७ बोली, मोंत द शिरगाव खाणपट्ट्यासाठी १० बोली आणि काले खाणपट्ट्यासाठी ६ बोली निविदा प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती संचालक शानभोगे यांनी दिली.
खाण खात्याच्या अधिकार्यांनी या बोली निविदांचे तांत्रिक मूल्यमापन खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत केले. बोलीदारांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन सादर केलेल्या कागदपत्रांची बोलीदारांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आता बोली निविदांची तांत्रिक पात्रता प्रक्रियेचे काम हाती घेण्यात आले आहे, असेही शानभोगे यांनी सांगितले.
या बोली निविदांबाबत काही कागदपत्रांच्या स्पष्टीकरणाची गरज भासल्यास संबंधित कंपनींकडून स्पष्टीकरण करून घेतले जाणार आहे. बोली निविदांची तांत्रिक प्रक्रिया १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. चार खाणपट्ट्यांच्या अंतिम लिलावासाठी सर्वाधिक बोली लावलेल्या प्रत्येकी पाच कंपन्या पात्र ठरविण्यात येणार आहेत, असेही संचालक शानभोगे यांनी सांगितले.
खाणपट्ट्यांचे आकारमान
डिचोली : खाणपट्टा क्षेत्र ४७८.५२०६ हेक्टर
शिरगाव-मये : खाणपट्टा क्षेत्र १७१.२४२२ हेक्टर
मोंत-द-शिरगाव : खाणपट्टा क्षेत्र ९५.६७१२ हेक्टर
काले : खाणपट्टा क्षेत्र १७९.१८२६ हेक्टर
तांत्रिक पात्रता १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण
खाण खात्याकडून खाणपट्ट्यांच्या लिलावाच्या प्रक्रियेची तांत्रिक पात्रता १३ डिसेंबरपर्यंत पूर्ण करून येत्या १४ डिसेंबर रोजी पात्र बोलीदार घोषित केले जातील. त्यानंतर, प्रत्येक पात्र बोलीदाराकडून प्रारंभिक किंमत ऑफर उघडली जाईल. ही संपूर्ण ई-लिलाव प्रक्रिया एमएसटीसी प्लॅटफॉर्मद्वारे व्यवस्थापित केली जात आहे.
१३७ दशलक्ष टन खनिज साठ्याचा अंदाज
लिलावासाठी ठेवलेल्या चार खाणपट्ट्यांमध्ये अंदाजे १३७ दशलक्ष टन खनिज साठा आहे. राज्य सरकारने मोंत द शिरगाव खाणपट्ट्यात ९ दशलक्ष टन, शिरगाव-मये खाणपट्ट्यात २३ दशलक्ष टन, काले खाणपट्ट्यात २० दशलक्ष टन आणि डिचोली खाणपट्ट्यात ८५ दशलक्ष टनपेक्षा जास्त खनिज असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.