चाफेकळी नाक की धारदार नाक?

0
1389
  •  डॉ. मनाली म. पवार
    गणेशपुरी-म्हापसा

आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्येमध्ये म्हणूनच नाकाचे आरोग्य टिकविण्यासाठी म्हणा किंवा नासारोग होऊ नयेत म्हणून नेहमी नाकांमध्ये दोन-दोन थेंब तीळ तेल किंवा अणू तेल किंवा तूप घालावे.

डोक्याखाली उशी न घेणे किंवा अधिक उशी घेतल्याने नाकामध्ये स्राव साचून तो घट्ट होतो हा घनस्त्राव श्‍लेष्मल त्वचेतील कोषांकुरांच्या क्रियेमध्ये बाधा निर्माण करून नासारोग निर्माण करतो.

 

माणसाचे व्यक्तिमत्त्व बर्‍याच अंशी त्याच्या नाकाच्या ठेवणीवर अवलंबून असते. चाफेकळी नाक स्त्री-सौंदर्य दर्शविते. धारदार नाक म्हणजे कणखरपणाचे, करारी माणसाचे लक्षण, नकटे नाक तोरा दाखवण्याचे. कवींनी. कादंबरीकारांनी नाकावर भरभरून लिहिलेले आहे. एवढेच काय नाकाचे काम असते?
नासा हि शिरसो द्वारम् | तत्र घ्राणेन्द्रिय स्थानम्‌॥
नासा म्हणजे नाक हे पंचज्ञानेंद्रियांपैकी एक ज्ञानेंद्रिय आहे. हे घ्राणेंद्रियाचे स्थान आहे. नासा हे शिराचे द्वार आहे. याची उत्पत्ती पृथ्वी महाभूतापासून झालेली आहे. यामुळे पार्थिव महाभूतात्मक गंधाचे ज्ञान नासाद्वारे होते. ह्याशिवाय अन्य ज्ञान होत नाही.
गर्भावस्थेमध्ये गर्भाच्या तिसर्‍या महिन्यात नाकाची उत्पत्ती होते. नाक हे मातृज अवयव आहे. नाकाची लांबी चार अंगुली असते. नासाग्र अल्पता अवनत असते. त्यास नासापुट म्हणतात. नाकाची पोकळी मध्यभागी पटलाने विभाजित होते. या नासापटलास नासाजवनिका किंवा नासावंश म्हणतात. नाकपुड्यांची उंची एक तृतियांश अंगुली असते व बाह्य भागाचा आयाम दोन अंगुली असतो. या नाकपुड्यांना बहिर्मुख स्रोतस म्हणतात. नाकाच्या पोकळीपासून प्राणवह स्रोतसाची सुरुवात होते. नासानिर्मितीमध्ये तीन अस्थि भाग घेतात. या तीन अस्थिंचा एक संधि तयार होतो. नाकाच्या आश्रयाने चोवीस शिरा असतात. त्यापैकी सहा वातवह, सहा पित्तवह, सहा कफवह व सहा रक्तवह होत.
नासास्थित दोष –
– प्राण, उदान व व्यान वायू नासामध्ये असतात. श्‍वासोच्छ्वासाकरिता लागणारा वायू आतमध्ये घेणे व सोडणे या क्रिया उदान वायुमुळे घडतात. प्राण व व्यानवायू या क्रियेवर नियंत्रण ठेवतात. तसेच ते नाकातील रसरक्तादी गतीचे नियंत्रण करतात.
– भ्राजक व साधकपित्त नाकाच्या आश्रयाने राहतात. भ्राजकपित्ताने नाकावरील त्वचेचे व आतील श्‍लेष्मल त्वचेचे भ्राजन होते. साधकपित्त गंधग्रहणाचे कार्य करतो. यातील घ्राणवैशेषिक प्रकाराने गंधज्ञान होते. पदार्थाचा वास नीट कळल्यास उदरातील पाचक पित्त स्रवते.
– अवलंबक कफ नाकामध्ये असतो. त्यामुळे घ्राणेंद्रियाचे तर्पण होते.
नासाश्रित धातू –
– रस व रक्तधातू नाकातील श्‍लेष्मल त्वचेमध्ये पोषण व जीवनकार्य करतात. मांस व मेदोधातु नाकातील त्वचेखाली राहतात. अस्थिधातु नाकाला विशिष्ट आकार देतो. मज्जाधातु घ्राणेंद्रियांचे पोषण करतो. शुक्रधातु रोगप्रतिकार क्षमत्व वाढवतो. कारण शुक्रक्षीणतेमुळे नासाविकार बळावल्याचे दिसते.
नासाश्रित मल –
– नाकातील मांसधातूचा खमल पंकसदृश असतो. रसधातु मल नाकाला आर्द्रता देतो तसेच नाकामध्ये अस्थिचा मल रोम असतात. ते नाकाचे बाह्य उपद्रवापासून संरक्षण करतात.
नासाश्रित मर्म –
नाकाच्या मूलभागी फणामर्म असतो. हे सिरामर्म असून वैफल्यकर मर्म आहे. यावर आघात झाल्यास गंधज्ञान नष्ट होते.
स्वस्थ नासा लक्षणे –
– स्वस्थ नाक चार अंगुली लांब, सरळ, मोठे, श्‍वासोच्छ्वास घेण्यास योग्य, सरळ हाड असलेले व योग्य रितीने गंधग्रहण करणारे असावे.
– नाकाचा अग्रभाग किंचित अवनत असावा. रससार व्यक्तींचे नाक स्निग्ध, मृदु असते.
– रक्तसार व्यक्तीचे नाक प्रसन्न, नाजुक, स्निग्ध व लालबुंद असते.
नाकाचे कार्य –
– अतिशय सूक्ष्म अशा गंधपरमाणूचा नाकातील श्‍लेष्मल त्वचेशी संबंध आल्यानंतर ही संवेदना प्राणवायूद्वारे मेंदूकडे (मनाकडे) पोहचविली जाते. ही संवेदना गंधनाडीद्वारे होते. हे गंधज्ञान आत्म्याला होत असते. तेव्हा त्याठिकाणी असलेला अवलंबक कफ कार्य करतो. या सर्व क्रियांवर साधक पित्त नियंत्रण ठेवते. नाकामध्ये गंधवहन करणार्‍या शिरा एकत्र येतात. त्यांना भृंगाचक मर्म म्हणतात. या मर्मावर आघात झाल्यास गंधज्ञान नष्ट होते. अशाप्रकारे आयुर्वेद शास्त्रामध्ये नाकाचे गंधग्रहण करण्याचे कार्य वर्णन केलेले आहे.
नासारोगांची सामान्य लक्षणे ः-
थंड हवा, धुळ, फार बोलणे, फार जागणे, उशी न घेता निजणे किंवा फार उंच उशी घेऊन निजणे; बदललेले पाणी पिणे, अति जलपान, अति मैथुन, वमन, अश्रु यांच्या वेगांचा अवरोध या कारणांनी वातप्रधान दोष प्रकुपित होऊन नाकात अडथळा उत्पन्न होऊन प्रतिश्याय होतो व जसजसे दोष वाढत जातात तसतसा मनुष्य क्षीण होत जातो.
– शीत हवेचा संपर्क किंवा फार जागल्याने प्रामुख्याने वातदोष प्रकुपित होऊन नासारोगांची निर्मिती होते.
– डोक्याखाली उशी न घेणे किंवा अधिक उशी घेतल्याने नाकामध्ये स्राव साचून तो घट्ट होतो हा घनस्त्राव श्‍लेष्मल त्वचेतील कोषांकुरांच्या क्रियेमध्ये बाधा निर्माण करून नासारोग निर्माण करतो.
– अधिक जल सेवन किंवा पाण्यात बदल केल्यास कफ व आमजन्य दोष प्रकुपित होऊन स्रोतसांचा अवरोध करतात व त्यामुळे नासारोग निर्माण होतात.
– अति मैथुन किंवा वमन अश्रु आदी वेगांचा अवरोध केल्याने वातज दोषाचा प्रकोप होऊन नासामध्ये वातज रोग निर्माण होतात.
– अजीर्ण, अधिक क्रोध, ऋतुविपर्यय, शिरशूल, दिवसा अधिक झोपणे, अति शोक, अधिक उष्णता हीदेखील नासारोगांची कारणे आहेत. या कारणांनी शिरोभागी कफदोष प्रकुपित होतात.
– याशिवाय नेहमी एका कुशीवर झोपणे किंवा पालथे झोपणे, थंड पाण्यात पोहणे, तोंडावर पांघरूण घेऊन झोपणे वा उघड्यावर झोपणे.
– तसेच गुरू, मधुर, शीत व रूक्ष पदार्थांचे नित्य सेवन, गुरू पदार्थ खाल्ल्यानंतर किंवा जेवणानंतर जास्त पाणी पिणे… या कारणांनीसुद्धा नासारोग उत्पन्न होतात.
नासारोगाची सामान्य लक्षणे –
* नासावरोध – नासावरोध हे नासारोगाचे सामान्य लक्षण आहे. हे लक्षण फक्त एक किंवा दोन्ही नाकपुड्यांमध्ये आढळते. तसेच अवरोध पूर्णतः किंवा अंशतः असू शकतो. नासावरोधामुळे रुग्णाला मुखाने श्‍वास घ्यावा लागतो. त्यामुळे मुख उघडे राहते. चेहरा भावनाहीन दिसतो.
* नासास्राव – येथे हे प्रधान लक्षण आहे.
* गंधविकृती – गंधज्ञान नष्ट होणे हे लक्षण असते. गंधगुहेतील गंधग्रहण करणार्‍या श्‍लेष्मल त्वचेचा अवरोध आढळतो. तसेच तीण धूर नाकात गेल्यानंतर किंवा अति तंबाखू खाण्याने वा शीतज्वरामुळे गंधज्ञान नष्ट होते. बरेचदा गंधज्ञान नसणार्‍या रुग्णांना रुचिज्ञान नसते.
नासारोगांची सामान्य चिकित्सा व पथ्यापथ्य ः-
पथ्यकर आहार – भोजनामध्ये गहू, जव, हरभरा यांची चपाती व कुलचा.
– आळीव, मसूर, हरभरा यांच्या डाळी, त्याचबरोबरजांगलमांसरस, त्रिकटुयुक्त घ्यावा.
– जुन्या तांदळाचा भात सेवन करावा.
– घृत, दुग्ध, खीर, दही आगी अभिष्यंदी पदार्थ जीर्ण नासाविकारांमध्ये सेवन करावे म्हणजे दोषअवरोध होऊन दोष बाहेर पडतात.
– दही, गूळ, मिर्‍यासोबत खावे.
– लघु आहार गरम, सैंधव व घृतयुक्त घ्यावा.
– भाज्यांमध्ये मुगाच्या शेंगा, काकडी, पडवळ, पालक, चवळी, वांगे, निंबू, कच्चे मुळे, मेथी यांचे सेवन करावे.
– मसाल्यांमध्ये हिंग, जिरे, मेथी, काळे मिरे, लवंग, विलायची, तेजपान, धने यांचा उपयोग करावा.
– फळांमध्ये संत्री, अंजीर, पिकलेला आंबा, टरबूज, पिकलेले टोमॅटो, काकडी, डाळिंब, अननस, द्राक्षे, लिंबू, आदी हितकर आहेत.
अन्य फळांचे सेवन करताना ती सुंठ, त्रिकटू, सैंधव, आले यांच्याबरोबर खावीत.
– आहारामध्ये तिखट व अम्ल पदार्थ अधिक प्रमाणात घ्यावे.
कागदी लिंबूवर सैंधव व काळ्या मिर्‍याचे चूर्ण लावून चोखावे. तसेच आलुबुखार, आवळे, पुदीना, हिरवे धने, जिरे, सैंधव आणि काळे मिरे टाकून त्याची चटणी करावी.
– मिष्टान्नांमध्ये घीवर, मूग किंवा हरभर्‍याचे लाडू, गाजराचा हलवा, जिलेबी आदींचे सेवन प्रातःकाळी करावे. तसेच बादाम, पिस्ते रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी वाटून घृत, काळे मिरे साखर टाकून शिरा खावा.
उकळलेले पाणी प्यावे., गरम पाण्यामध्ये लिंबुरस टाकून प्यावे.
– भोजनानंतर द्राक्षारिष्ट, दशमूलारिष्ट सेवन करावे.
पथ्यकर विहार –
– रोग्याने खुल्या हवेत रहावे तसेच थोडा व्यायाम करावा.
– शीत वायू पूर्वेकडील वारा, पावसाळी व वादळी वार्‍यापासून संरक्षण करावे.
– अंगावर जाड व गरम कपडे घालावेत.
– डोके गरम कपड्याने गुंडाळावे.
अपथ्यकर आहार- विहार
– पित्तोतेजक किंवा कफकर पदार्थ अहितकर असतात. दारू, कॉफी, चहा, तंबाखू, अति लवण सेवन केल्याने नासापाक निर्माण करतात.
– रूक्ष पदार्थांचे अति प्रमाणात सेवन- उदा. मैदा, वाटाणे, हरभरे आदी वर्ज्य करावे.
– आनूप मांस, मासे, खवा, मलाई, उडदादी डाळ, उडदाचे वडे, कचोरी अहितकर आहेत.
– भाज्यांमध्ये कटहल, केळी, रताळी, भेंडी, कोहळा, बटाटे, अरबी अहितकर आहेत. पेयांमध्ये शीतजल, विभिन्न जल, पावसाचे पाणी, तलावाचे पाणी, बर्फ वर्ज्य आहेत.
अपथ्यकर विहार –
अधिक काळ बसणे, दिवसा झोपणे, रात्री जागरण, झोपून उठल्यानंतर जलपान करणे, स्वेदाधिक्य झाल्यावर पाणी पिणे अहितकारक आहे. याशिवाय मोकळ्या हवेत उघड्या अंगाने फिरणे, डोक्यावरून स्नान करणे, शोक, क्रोध, अधिक निद्रा, जमिनीवर झोपणे, मलमूत्रादी वेगांचे धारण करणे वर्ज्य आहे.
सामान्य चिकित्सा-
साधारणतः सर्व नासारोगांमध्ये –
स्नेहन, स्वेदन, शिरोभ्यंग, वमन, धूम, घृतपान, नस्य आदी स्थानिक चिकित्सा करावी. तसेच आभ्यंतर चिकित्सांमध्ये शुंठ्यादि चूर्ण, लवंगादी चूर्ण, आरोग्यवर्धिनी, त्रिभुवनकीर्ती रस, लक्ष्मीविलासरस इ.चा उपयोग केला जातो.
आयुर्वेद शास्त्रामध्ये दिनचर्येमध्ये म्हणूनच नाकाचे आरोग्य टिकविण्यासाठी म्हणा किंवा नासारोग होऊ नयेत म्हणून नेहमी नाकांमध्ये दोन-दोन थेंब तीळ तेल किंवा अणू तेल किंवा तूप घालावे.