श्रीलंकेचा पाककडून पराभव

0
102

श्रीलंकेला काल सोमवारी पाकिस्तानविरुद्ध ६७ धावांनी पराभव पत्करावा लागला. पहिला एकदिवसीय सामना पावसामुळे वाहून गेल्यानंतर तीन सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना जिंकून यजमानांनी १-० अशी आघाडी घेतली आहे. बाबर आझम याचे ११वे एकदिवसीय शतक व उस्मान शिनवारी याने घेतलेले पाच बळी यामुळे पाकिस्तानला विजय मिळविणे शक्य झाले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ७ बाद ३०५ धावांपर्यंत मजल मारली. यानंतर त्यांनी लंकेचा डाव ४६.५ षटकांत २३८ धावांत गुंडाळला.

पाकिस्तानने या लढतीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. फखर झमान याने आपले १२वे एकदिवसीय अर्धशतक लगावतान ५४ धावांची खेळी केली. इमाम उल हक (३१) याच्यासह त्याने संघाला ७३ धावांची सलामी दिली. तिसर्‍या स्थानावर आलेल्या बाबरने समयोचित खेळ दाखवताना १०५ चेंडूंचा सामना करताना ४ षटकार व ८ चौकारांसह ११५ धावा जमवल्या. हारिस सोहेल (४०) याने त्याची चांगली साथ दिली. नवोदित इफ्तिखार याने २० चेंडूंत नाबाद ३२ धावा करत संघाला तीनशे धावांची वेस ओलांडून दिली. वानिंदू हसारंगा श्रीलंकेचा सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २ बळी घेतले.

आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना लंकेची सुरुवात खराब झाली. २८ धावांत त्यांचा अर्धा संघ तंबूत परतला होता. शेहान जयसूर्या (९६) व दासुन शनका (६८) यांनी सहाव्या गड्यासाठी १८० धावांची भागीदारी करत पाकिस्तानी गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. लागोपाठच्या षटकांत ही दुकली बाद झाल्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुस्कारा सोडला. यानंतर हसारंगा याने ३० धावा केल्याने पराभवाचे अंतर मर्यादित राहिले.