>> मोहिमेसाठी 2 हजार 104 कोटी रुपयांच्या निधीचीही तरतूद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘चांद्रयान-4′ या मोहिमेला मंजुरी दिली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
चांद्रयान-4 मोहिमेचा विस्तार करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रावर मानवयुक्त मोहिमेचा पुढील टप्पा असणार आहे. या दिशेने सर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर ‘चांद्रयान-4′ या मोहिमेला मान्यता देण्यात आली आहे, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
‘चांद्रयान-4′ या मोहिमेसाठी तब्बल एकूण 2,104.06 कोटी रुपयांची आवश्यकता असणार असून, त्या निधीला मान्यता देण्यात आल्याचेही अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केले. अंतराळयानाचा विकास आणि प्रक्षेपणासाठी इस्रो जबाबदारी पार पाडेल. ही मोहीम मान्यता मिळाल्यापासून पुढील 36 महिन्यांत पूर्ण केली जाईल.
मोहिमेचे उद्दिष्ट काय?
चांद्रयान-4 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणे आहे. तसेच तेथील खडक व मातीचे नमुने गोळा करणे आणि ते पृथ्वीवर परत आणणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट असणार आहे. चांद्रयान 4 मध्ये चंद्राच्या कक्षेत जटिल डॉकिंग आणि अनडॉकिंग ऑपरेशन्सचा समावेश असेल. ज्यामुळे भारताच्या अंतराळ क्षमतांमध्ये लक्षणीय प्रगती होईल.