![ISRO reveals Chandrayaan2 aheah of its launch](https://navprabha.com/wp-content/uploads/2019/06/12isro.jpg)
चंद्रावर दुसर्यांदा पाऊल ठेवण्यासाठी भारत आता सज्ज झाला असून पुढील महिन्यात १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी ‘चांद्रयान-२’ अवकाशात झेपावणार आहे. तामिळनाडूमधील महेंद्रगिरी आणि बेंगळुरूमधील ब्याळालू येथे यानाच्या अंतिम चाचण्या होतील. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी काल भारताच्या महत्त्वाकांक्षी व बहुप्रतीक्षित मोहिमेची पत्रकार परिषदेत ही माहिती दिली, तसेच या मोहिमेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. ‘चांद्रयान-२’च्या निमित्ताने अवघ्या दहा वर्षांत दुसर्यांदा ‘इस्रो’ चंद्रावर स्वारी करणार आहे.
यावेळी के. सिवान यांच्या हस्ते या मोहिमेशी संबंधित माहिती देणारी एक वेबसाइटही काल लॉंच करण्यात आली. ‘चांद्रयान-१’च्या धर्तीवरच ही संपूर्ण मोहीम असेल. मात्र, चंद्रावर उतरण्याच्या पद्धतीत पूर्णपणे बदल करण्यात आला आहे. प्रक्षेपणासह या संपूर्ण मोहिमेवर ९७८ कोटी खर्च होतील, असे सिवान यांनी सांगितले.
‘चांद्रयान-२’ असे असेल
‘चांद्रयान-२’चे लँडर, रोव्हर आणि ऑर्बिटर असे तीन भाग असतील. यानाचे एकूण वजन ३८०० किलो आहे. रोव्हर हे एक रोबोटिक यंत्र असून त्याचे वजन २७ किलो असून लांबी १ मीटर आहे. लँडरचे वजन १.४ टन आणि लांबी ३.५ मीटर आहे. तर ऑर्बिटरचे वजन २.४ टन आणि लांबी २.५ मीटर इतकी आहे.
चंद्रावर यान कसे उतरेल
लँडरला ऑर्बिटरच्यावरती ठेवण्यात येईल. लँडर, ऑर्बिटर आणि रोव्हरला एकत्रितपणे कंपोझिट बॉडी असे संबोधण्यात आले आहे. या कंपोझिट बॉडीला जीएसएलव्ही एमके-३ लॉंच व्हेईकलमध्ये गरम आवरणामध्ये ठेवण्यात येईल. १५ जुलैला यानाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण झाल्यानंतर जीएसएलव्ही एमके-३ मधून कंपोझिट बॉडीला बाहेर ढकलले जाईल. त्यानंतर कंपोझिट बॉडीच्या खालच्या भागातून इंधनाचे ज्वलन सुरू झाल्यानंतर ही बॉडी चंद्राच्या दिशेने झेपावेल. त्यानंतर काही दिवसांनी ती चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर योग्य वेळी लँडर ऑर्बिटरपासून वेगळा होईल, त्यानंतर लँडर चंद्रापासून ३० किमी अंतरावरील कक्षेत ४ दिवस फिरत राहील.
प्रत्यक्ष चंद्रावर लँडिगच्या दिवशी लँडरची प्रोपल्शन सिस्टिम त्याचा वेग कमी करेल आणि लँडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवेल. या प्रक्रियेसाठी सुमारे १५ मिनिटांचा वेळ लागेल.