- – मीना समुद्र
शारदसुंदर चंदेरी राती स्वप्नांच्या झुल्यावर झुलावे; आभाळभर चांदणे शिंपीत, ओंजळी ओंजळीने मोती उधळीत जाणारी ही निळावंती, तिचे रूप न्याहाळत अंतरी सुखी व्हावे या हेतूने शारदऋतूतील कोजागरी उत्सव सुरू झाला.
तू सोबत येसी चंद्रा माझ्यामागं
भयभीत अशी मी कुणीच नाही जागं
हे पाठीमागं तुझंच हसरं बिंब
अन् समोर माझी दिसे साऊली लांब
नागपूरचे सुप्रसिद्ध कवी कै. ना. घ. देशपांडे यांच्या ‘रामपहारी’ कवितेतील या ओळी. रात्रीच्या नीरव शांततेत सारीकडे चिडीचूप झालेले असताना भयभीत अवस्थेत घराबाहेर पडलेली ती कुणी एक. तिला तिच्या पाठीमागून येणार्या चंद्रबिंबाची मोठी सोबत वाटते आहे. हे चंद्रबिंब हसरं आहे आणि तिला जणू सांगत आहे- ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.’ तिला त्या स्वच्छ, नितळ चंद्रप्रकाशात मनाला मोठा आधार वाटतो आहे. समोर स्वतःच्याच सावलीची- ती काळोखी असली, लांबत चाललेली असली तरी तिला त्या चंद्रबिंबाचा दिलासा मिळतो आहे. या निखळ हसर्या चंद्रबिंबाच्या साथसंगतीत ती निर्भर होऊन वाटचाल करते आहे.
चंद्राचे पूर्णबिंब असतेच मुळी असे मनमोहक, आश्वासक. त्यातून ते शारद-पौणिमेचे असेल तर मग बघायलाच नको! पावसाळा नुकताच संपत आलेला असतो. त्याची उरलीसुरली ओल जणू चांदण्यांत उतरते आणि त्या आगळ्यावेगळ्या तेजाने आकाशात तळपू लागतात. निरभ्र आकाशात तेवणार्या या तेजस्वी दीपज्योती चमचमत आपले इंद्रजाल धरणीवरही पसरतात आणि माणसाचे मन त्या लावण्याच्या दर्शनाने अन् चांदण्याच्या स्पर्शनाने मोहीत होऊन उठते. कविवर्य ना. घ. देशपांडे यांचीही अवस्था त्यांनी आपल्या अनुभवकथनातून व्यक्त केली आहे.
नागपूरच्या वास्तव्यात एका नातेवाइकाकडे विठ्ठलाच्या दर्शनाला किंवा उत्सवासाठी बनविलेले मेवे खाण्यासाठी कवी गेले. तिथून परतताना मॉरिस कॉलेज व पटवर्धन ग्राऊंडवर सुरम्य चांदणे पडले होते. पलीकडे जंगल होते. सुखद वारा वाहत होता. सेवासदनकडून बासरीचा मंजुळ आवाज त्यांना ऐकू आला. नागनदीतले रुपेरी डबके दिसले आणि मन स्वप्नमय झाले. सुंदर प्रेयसी कवीत संचार करून म्हणू लागली-
रानावनात गेली बाई शीळ,
राया तुला रे काळवेळ नाही
राया तुला रे ताळमेळ नाही
थोर राया तुझं रे कुळशीळ
तरल मनोवस्थेत १० मिनिटांत त्यांनी ही कविता लिहून काढली आणि त्यांची ‘शीळ’ ही कविता अत्यंत गाजली. रसिकमनावर त्याचे गारुड अजूनही आहे. कवीने अनुभवलेले हे चांदणे शारदाचेच असणार हे त्यांच्या कवितेतल्या या ओळींवरून दिसून येते-
तिथं रायाचे पिकले मळे
वर आकाश शोभे निळे
शरदाच्या ढगाची त्याला झील
शारदऋतूतील चंद्रकळेची ती रुपेरी झील, ती झिलई, ती चमक या संपूर्ण कवितेला बसली आणि तिचे गाणे होऊन ती ऐकणार्याच्या मनामनात रुजली.
मृदू तालात मंद वार्यात
गीत गुंफीत रात्र आली
गोल क्षितिज तिने तबक धरलेले
त्यात चंदेरी निळे चांदणे भरलेले
असे नीलनभाचे, शरदाच्या चांदण्याचे उन्मुक्त लावण्य पाहून ‘माझ्या मनात घनतमात अळुमाळ, लाट उठली एक लडिवाळ’ असे स्वतः कवीने ‘गुंफण’ या कवितेत म्हटले आहे. चंद्रप्रकाशात नाहताना अशीच रोमांचाची लाट शरीरावर आणि मनावर उठते. शरदाच्या चांदण्याचा असाच सुखद, शीतल, तरल, अतितरल अनुभव आपल्याही मनाला येतो. चंद्राचा जन्मच मनातून झाला आहे. चंद्राशी आपले घनिष्ठ नाते आहे. त्याच्या सौंदर्याने आपण लुब्ध होतो. त्याच्या सहवासात रमतो. त्याच्या चांदणस्पर्शाने मोहरतो. चांदण्यांच्या ताटव्यासारखे अनेक कल्पनांचे, भावभावनांचे ताटवे आपल्या मनात फुलतात. मन अंतर्बाह्य उजळून निघते. अवनी आणि अंबरतळी पसरलेल्या या स्वच्छ चांदण्यात शरीर-मनाला अभ्यंगस्नान घडते. किती मधाळ मवाळ हे चांदणे! ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांना असे मवाळपण चित्ती आणून आपली अमृतओवी ऐकावी अशी विनंती केली आहे.
इथे शारदीचिये चंद्रकळे माजी अमृतकण कोवळे
ते वेचिती मने मवाळे चकोरतलगे
चित्ताला असे हळुवारपण येते ते शारदीय चंद्रकळेमुळे! शरदाच्या चांदण्यातले अमृतकण आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक. त्यामुळे तुष्टीपुष्टीदायक दूध चंद्रप्रकाशात ठेवून ते प्राशन करण्याची आपली पूर्वापारची परंपरा आहे. चांदणखचित गच्च्यांवर, सौधांवर रात्र जागवून सृष्टीतल्या या सौंदर्यलक्ष्मीचे वरदान प्राप्त करून आपण सुंदर, आरोग्यसंपन्न बनावे ही कोजागरी उत्सवाची प्रेरणा. शारदसुंदर चंदेरी राती स्वप्नांच्या झुल्यावर झुलावे; आभाळभर चांदणे शिंपीत, ओंजळी ओंजळीने मोती उधळीत जाणारी ही निळावंती, तिचे रूप न्याहाळत अंतरी सुखी व्हावे या हेतूने शारदऋतूतील कोजागरी उत्सव सुरू झाला. धनधान्यसंपन्नतेच्या या काळात मनाला थोडी स्थिरता प्राप्त होते. घटस्थापनेपासून सुरू होणारा आणि त्यानंतर चढत्यावाढत्या उल्हासाने, आनंदाने, सौहार्दाने, प्रसन्नतेने साजरा होणारा हा चंद्रोत्सव, प्रकाशोत्सव. नवरात्रीच्या उत्सवाचा हा जणू कळसाध्याय. शारदोत्सवाच्या वीणेचे झंकार आभाळभर उमटवीत प्रकाशगीत गाणार्या शतशततारका आणि कामधेनूच्या दुधातून निघालेल्या लोण्याच्या गोळ्यासारखा शुभ्र सोमनिधी चंद्र- मनाचा चंद्रमणी त्याच्या किरणांनी पाझरला नाही तरच नवल! चराचरसृष्टीच या चंद्रकलेने पालटून जाते. सागरलाटा चंदेरी वस्त्रे परिधान करून उसळतात, घुसळतात, फेसाळतात. आकाशाचे झुंबर सुरम्य तेजाने झळाळत असताना ‘लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळत कोटी ज्योती या’ असे गाणे गात मन नाचू लागते. पक्ष्यांना अवेळीच उजाडले असे वाटून जाग येते. मंद मंद वार्यात रुपेरी साज लेवून डोलणारी झाडे, चांदणस्पर्शासाठी आसुसलेली फुले-पाने अंगभर चंदेरी वर्ख माखून घेतात. आणि या शांत, नीरव वातावरणात कधी ना. घ. देशपांडे यांचे धनगरी गाणे घुमू लागते-
या माथ्यावरती ठळक चांदण्या नऊ
ही अवतीभवती हिरवळ हिरवी मऊऽऽ जी
ही झुडुपे राने रानवेल साजरे
चांदणे हिवाळी मंद धुंद झांजरेऽऽ जी