‘चला हसू येऊ द्या!’

0
93
  • जनार्दन वेर्लेकर

कोरोनामुळे मनमुराद, दिलखुलास हसायचे प्रसंग दुर्मीळ होत आहेत. आमच्यापुरती तरी वर्धापनदिन समारंभामुळे ही कोंडी फुटली. तिचे प्रतिबिंब या कार्यक्रमात उमटले. आठ महिने कळ काढल्यावर आम्ही वृत्तीगांभीर्याने काव्य- शास्त्र- विनोदात यथेच्छ डुंबलो.

कोरोनाच्या सांसर्गिक प्रकोपामुळे कधी नव्हे तो माणूस शारीरिक- मानसिकदृष्ट्या खचला आहे. एकमेकांपासून तुटत चालल्याची भीती त्याला ग्रासून राहिली आहे. त्याचा हताश, निरुत्साही, दुर्मुखलेला चेहरा मुखपट्टी(मास्क)च्या सक्तीनेही त्याला लपवता आलेला नाही. आजची- उद्याची भ्रांत, चिंता आणि अनिश्चितता चारचौघांत वावरताना सावलीसारखी त्याला लगटून आहे. कोरोनाने तर सार्वजनिक जीवनातून त्याला हद्दपार केले आहे.

अशा सर्वतोपरी निराशाजनक वातावरणात गोमंतविद्या निकेतन या संस्थेने कोरोनामुळे पुढे ढकललेला आपला १०८वा वर्धापनदिन समारंभ आयोजित करण्याचा निर्णय घेणे धाडसाचे होते. तरीही चाचपणी करून पाहूया.. असे ठरवले. समारंभाचे नियोजित पाहुणे होते गोवा राज्याचे वित्तसचीव श्री. दौलत हवालदार. ‘‘रविवार दि. २९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेपाच ते साडेसात हा समारंभ आचारसंहितेचे पालन करून आटोपशीरपणे आयोजित करण्याचे आमच्या मनात आहे. आभासी (व्हर्च्युअल) नव्हे तर सर्वांच्या प्रत्यक्ष सहभागाने हा समारंभ आम्हाला आयोजित करता आला तर आम्हाला धीर येईल. तुमचं सहकार्य आम्हाला लाभलं तर नक्कीच आमचा हुरूप वाढेल’’, मोबाइलवरून एका दमात मी आमच्या प्रमुख पाहुण्यांना गळ घातली आणि आश्‍चर्य म्हणजे ‘‘मी येईन’’ या दोन शब्दात त्यांनी लागलीच प्रस्ताव स्वीकारून आम्हाला आश्वस्त- प्रोत्साहित केले. पुनश्च हरिॐ या निश्‍चयाने आम्ही समारंभाच्या जय्यत तयारीला लागतो.

संस्थेचा अत्यंत प्रतिष्ठेचा कै. अच्युत दामोदर कारे स्मृती गोमंतदेवी पुरस्कार यंदा औरंगाबादचे प्रसिद्ध कवी आणि सव्यसाची लेखक श्री. दासू वैद्य यांना या समारंभात प्रदान करण्यात येणार होता. त्यांच्या विमानप्रवासाची तरतूद संस्थेने केली होती. एवढ्यात महाराष्ट्र शासनाने गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतून प्रवास करणार्‍या प्रवाशांची कोरोना चाचणी शिथिल करण्याऐवजी अधिक कडक केली आहे अशा बातम्या वर्तमानपत्रातून झळकल्या आणि आमच्या मनात भीतियुक्त शंकेची पाल चुकचुकली. आणि समारंभाला चारच दिवसांचा अवधी असतान वैद्यांनी ‘नाइलाजाने प्रवासाचा धोका पत्करणे कठीण होत चालले आहे आपण मला समजून घ्यावे’, अशी आपली हतबलता व्यक्त केली. कोरोना आमची सत्त्वपरीक्षा घ्यायला टपला आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली. आमच्या समारंभाची रविवार दि. २९ मार्च ही तारीख कोरोनाच्या टाळेबंदीमुळे हुकली होती आणि आता रविवार दि. २९ नोव्हेंबर ही नवी तारीख. हा कालावधी चक्क आठ महिन्यांचा. गेले आठ महिने कोरोनाने आमचा पिच्छा पुरवला होता. आम्हाला वेठीस धरताना त्याला आनंदाच्या उकळ्या तर आम्हाला दुःखाच्या डागण्या देण्यात त्याने हयगय केली नव्हती. श्री. दासू वैद्य यांच्या उपस्थितीने आम्हा सर्वांनाच त्यातही यंदाच्या गोमंतकीय नवोदित साहित्य पुरस्कार विजेत्यांना अधिक आनंद झाला असता. त्यांच्याच हस्ते या पुरस्कारांचे वितरण आणि मग त्यांचे मार्गदर्शनपर भाषण असा आमचा मनोदय होता. तो फसल्यामुळे आम्ही दुधाची तहान ताकावर भागवावी या इराद्याने मग वैद्यांना गळ घातली की त्यांनी व्हॉट्‌स ऍपवर विडियोद्वारे आपले मनोगत व्यक्त करावे. हा सुवर्णमध्य मान्य करून त्यांनी आपले मनोगत पाठवले जे या कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक व कार्यसीन अधिकारी यांनाही आम्ही वर्धापनदिन समारंभात सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले होते. सदर संस्थेच्या अर्थसाहाय्यामुळे गोमंतकीय लेखकांच्या चार दुर्मीळ, अनुपलब्ध पुस्तकांचे पुनर्प्रकाशन आमच्या संस्थेने केले होते. कोरोनामुळे त्यांचीही २९ मार्चला होणार असलेल्या समारंभाची उपस्थिती हुकली आणि नंतरही तो योग जुळवता आला नाही. मात्र त्या संस्थेचे कार्यसीन अधिकारी श्री. गिरीश पनके यांनी आमच्या प्रस्तावास मान देऊन पुस्तकांच्या पुनर्प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा देताना यथोचित प्रास्ताविक वक्तव्य करून या उपक्रमाचे महत्त्व विशद केले. अर्थात व्हॉट्‌सऍपवर व्हिडिओ पाठवून आम्हाला सहकार्य केले.

मनात खरी धाकधूक होती ती श्रोत्यांच्या उपस्थितीची. कोरोनाची बाधा म्हणा वा सावट, यांची तमा न बाळगता मोजकेच पण चोखंदळ श्रोते या सोहळ्यात सहभागी झाले आणि आयोजक म्हणून आमच्या धडपडीचे सार्थक झाले. प्रमुख पाहुणे सपत्नीक तसेच आपले चिरंजीव सुश्रुत याला आवर्जून घेऊन आले. देशाचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री तथा गोव्याचे माजी खासदार श्री. एदुआर्दो फालेरो हे वयोपरत्वे ज्येष्ठतम नागरिक- सुपर सिनिअर सिटीझन. त्यांच्या खास उपस्थितीमुळे असेल, आमच्या पाहुण्यांनी सभ्यता आणि संस्कृती हा विषय इंग्रजीतून मांडताना आपल्या सखोल व्यासंगाची श्रोत्यांना प्रचिती आणून दिली. ते गोव्याच्या समाजजीवनाशी समरस झाले आहेत. त्यांच्या संयत, अनाग्रही तरीही परखड विवेचनात गोव्याच्या पर्यावरणाचा र्‍हास, म्हादईचे पेटलेले पाणी, गोव्यातील सहकारी बँकिंग क्षेत्राला लागलेली घरघर, जागतिक पर्यटनामुळे गोव्यातील वाहवत चाललेली- ड्रग्ज अर्थात मादक द्रव्यांच्या नशेत वेगाने खेचली जाणारी तरुणाई, माणसातील चांगुलपणा, प्रामाणिकपणा, सचोटी आणि नीतिमूल्यांचा र्‍हास, सर्वव्यापी भ्रष्टाचार, साध्यसाधन विवेकाची तमा न बाळगता येन केन प्रकारेण नफा हेच एकमेव उद्दिष्ट हा मंत्र जपणारे देशातील अवघेच नफेखोर भांडवलदार आणि सत्ताधारी यांनी अपवित्र युती, संकुचित अस्मितांचे – आयडेंटीटींचे देशात फुटलेले पेव या विषयांची त्यांनी घेतलेली झाडाझडती श्रोत्यांना अंतर्मुख करून गेली. आमच्या संस्थेच्या विचारवेध व्याख्यानमालेत चपखल सामावेल अशा एका दर्जेदार, मौलिक व्याख्यानाचा योग वर्धापनदिन समारंभाच्या निमित्ताने जुळून आला याची आयोजक म्हणून आम्हाला धन्यता वाटली.

एक बहुश्रुत वाचक, ग्रंथसंग्राहक म्हणून श्री. दौलत हवालदार गोव्यात – महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. आम्ही गोमंतकीय लेखकांच्या चार दुर्मीळ, अनुपलब्ध, पुनर्प्रकाशित पुस्तकांच्या संचाची ग्रंथभेट देऊन या ऐवजाचा पहिला वाचक म्हणून त्यांचा सन्मान केला. कोरोनामुळे मनमुराद, दिलखुलास हसायचे प्रसंग दुर्मीळ होत आहेत. आमच्यापुरती तरी वर्धापनदिन समारंभामुळे ही कोंडी फुटली. तिचे प्रतिबिंब या कार्यक्रमात उमटले. आठ महिने कळ काढल्यावर आम्ही वृत्तीगांभीर्याने काव्य- शास्त्र- विनोदात यथेच्छ डुंबलो. आमच्या संस्थेची पूर्वपुण्याई म्हणा वा पूर्वसंचित- हेच आमचे भांडवल- नेमक्या शब्दात गुडवील. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने समारंभ मनाजोगता झाला.

‘चला हवा येऊ द्या’ हा दूरचित्रवाणीवरील गडगडाटी हास्यस्फोटक, हलकाफुलका कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ आहे. मनोरंजनाच्या सर्वांच्या कल्पना एकसारख्या नसतात- नसाव्यात. आम्ही असाच एक खेळ मांडला आणि त्यातून साकारला- ‘चला, हसू येऊ द्या’ हा कार्यक्रम.