चतुरस्र अभिनेता… ग्रेट माणूस…

0
29
  • मुक्ता बर्वे (अभिनेत्री)

मराठी-हिंदी चित्रपट आणि नाटक, मालिका अशा तिन्ही प्रांतांमध्ये विक्रमदांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला. कोणत्याही भूमिकेशी समरस होऊन ताकदीने ती भूमिका जिवंत करण्याचे कसब त्यांच्याकडे होते. त्यांच्यासारख्या कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. विक्रमदादा कलाकार म्हणून जेवढे मोठे होते तेवढेच ते माणूस म्हणूनही ग्रेट होते. अभिनयात आपली छाप निर्माण करणार्‍या विक्रमदादांनी कोणताही गाजावाजा न करता समाजकार्यही सुरू ठेवले. अशा या समाजशील, विचारवंत-कलावंताच्या जाण्याचे दुःख अपार आहे.

विक्रम गोखले हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील अत्यंत प्रतिभावंत, चतुरस्र, अनुभवसंपन्न आणि अस्सल अभिनयाचे एक उत्तुंग शिखर होते. त्यांच्यासारख्या श्रेष्ठ कलाकाराबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली, याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. नाटक, सिनेमा, मालिका अशा तिन्ही प्रांतामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा अमीट ठसा उमटवला. याची दखल घेत विक्रमदांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. १९९४ मध्ये आलेल्या ‘वझीर’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. ‘अनुमती’ या मराठी चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पण, या सर्व पुरस्कारांपेक्षा त्यांना रसिकांकडून मिळालेला पुरस्कार सर्वात मोठा होता. विक्रम गोखले यांचं नाटक असलं की ते पाहायला आपण जायलाच हवं, अशी अनेक प्रेक्षकांची मानसिकता असते आणि आलेल्या प्रेक्षकांची अपेक्षापूर्ती विक्रमदादा आपल्या संयत अभिनयाने नेहमीच करत राहिले.

त्यांच्याबरोबर मी ‘अग्निहोत्र’ या मालिकेत आणि त्यानंतर ‘आघात’ या चित्रपटात काम केलं. डॉक्टरी पेशावर आधारीत असलेल्या या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक या नात्याने विक्रमदादा प्रथमच पुढे आले. या दिग्दर्शनाबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. ‘अग्निहोत्र’मध्ये काम करताना त्यांच्याशी माझा चांगला स्नेह जुळला होता. तरीही ‘आघात’च्या निमित्ताने ते दिग्दर्शक म्हणून समोर उभे असल्यामुळे नाही म्हटले तरी मला दडपण आलेच होते. पण, विक्रमदादांनी ते सहजपणे दूर केले. त्यांच्या तुलनेत मी अगदीच नवीन कलाकार होते. त्याचप्रमाणे या चित्रपटाच्या निमित्ताने डॉ. अमोल कोल्हे, कादंबरी हेही चित्रपटासाठी तसे नवीन असणारे कलाकार होते. पण, कामाला सुरुवात करताना ‘तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतो तसा अभिनय करा’ असं विक्रमदादा सांगत असत. त्यामुळे आमच्यावरचे दडपण खूपच कमी झाले.

माझे आईबाबाही विक्रमदादांचे चाहते आहेत. त्यांनी त्यांची अनेक नाटकं पाहिली आहेत. मी लहान असल्यामुळे त्याकाळात त्यांची फार नाटकं पाहता आली नाहीत. तरीही लहानपणी पाहिलेलं त्यांचं ‘संकेत मीलनाचा’ हे नाटक माझ्या आजही स्मरणात आहे. त्याचप्रमाणे स्मिता तळवलकर यांच्याबरोबर त्यांनी केलेला ‘कळत नकळत’ हा माझा आवडता चित्रपट आहे. विक्रमदादा फार पूर्वीपासून रंगमंचावर काम करत आहेत. नंतरच्या काळात चित्रपटांमध्ये ते व्यस्त झाले तरी त्यांनी रंगभूमीवरचं प्रेम सोडलेलं नाही. काही वर्षांपूर्वी आलेलं रिमा लागू यांच्यासोबतचं त्यांचं ‘के दिल अभी भरा नही’ हे नाटक रंगभूमीवर चांगलं गाजलं. यात उतारवयातील जोडप्यांचे मानसिक प्रश्‍न मांडण्यात आले होते. उतारवयात एकमेकांच्या साथीची गरज असताना पती-पत्नी एकमेकांशी भांडू लागले तर काय होते हा या नाटकाचा कथाविषय होता. विक्रम गोखलेंच्या चाहत्यांना हे नाटक म्हणजे अभिनयाची मेजवानीच होती.

विक्रमदांनी सर्व माध्यमांत कामं केली आहेत. व्यावसायिक नाटकं करतानाच त्यांनी प्रायोगिक नाटकांनाही प्राधान्य दिलं. असे कलाकार खूप कमी असतात. त्यामुळे विक्रमदा हे सर्वार्थाने मोठे होते. ते खूप चांगले शिक्षक होते. त्यांच्याबरोबर काम करताना त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळत. काम करताना ते कोणत्याही कलाकारावर स्वत:च्या मोठेपणाचं प्रेशर आणत नसत. अत्यंत खेळीमेळीने काम करत. त्यांनी एखादा सीन करून दाखवला की तो इतका सुंदर असायचा की त्यांच्यानंतर तो आपण करावा असं वाटायचंच नाही. एक परफेक्शनिस्ट कलाकार म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल.

विक्रमजींना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे. ज्येष्ठ दिवंगत अभिनेते चंद्रकांत गोखले यांच्याकडून मिळालेला हा वारसा निष्ठेने जपत त्यांनी मालिका-नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांत स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली. आजपर्यंतच्या आपल्या पन्नास वर्षांहून अधिक काळच्या कारकिर्दीत त्यांनी यशाच्या पायर्‍या चढताना जगाचे बरेच अनुभव घेतले. त्यामुळे ते एक अभिनेते म्हणून जेवढे मोठे होते, त्याचबरोबर माणूस म्हणूनही श्रेष्ठ होते. जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’ या नाटकामुळे ते अधिक गाजले असले तरी इतर नाटकांत आणि चित्रपट-मालिकांमध्ये त्यांनी स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं.

अनेकांना माहीत नसेल पण अभिनयक्षेत्रात पाऊल टाकण्याआधी त्यांनी काही काळ शेतीचा व्यवसायही केला. त्यानंतर ते मराठी चित्रसृष्टीत आले. अनेक आघाडीचे कलाकार शुटिंगला ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा जाण्यासाठी प्रसिद्ध असतात. किंबहुना इतरांना आपली वाट पाहायला लावणं यामध्येच त्यांना मोठेपणा वाटतो. पण, विक्रमदादा इतके मोठे कलाकार असूनही ते नेहमी चित्रीकरणासाठी ठरलेल्या वेळीच उपस्थित होत. यातून त्यांच्यातला वक्तशीरपणा तर दिसून यायचाच; पण त्याबरोबरीने उंच भरारी घेऊनही पाय जमिनीवर असण्याचं ‘डाऊन टू अर्थ’पणाही दिसून यायचा. प्रत्येक भूमिका समरसून करणं ही त्यांची ख्याती होती. त्यांनी भूमिका केलेली नाटकं रंगभूमीवर लोकप्रिय झाली नाहीत असं कधी झालं नाही.

विक्रमदादा कलाकार म्हणून जेवढे संवेदनशील होते, तेवढीच समाजातील वंचित घटकांच्या व्यथांबद्दलही त्यांना तळमळ होती. सामाजिक बांधिलकीचा कोणताही गाजावाजा न करता आपल्या वडिलांचा समाजसेवेचा वारसा त्यांनी पुढे सुरू ठेवला. जवळपास अडीच-तीन दशके विक्रम गोखले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी युद्धात अपंग झालेले जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत नियमितपणे दिली जात होती. पण त्याचा त्यांनी गाजावाजा कधीच केला नाही. जवानांच्या निराधार कुटुंबीयांच्या मुलांनाही त्यांनी शैक्षणिक मदत दिली. सरहद्दीवर जवान आपले प्राण पणाला लावून जागता पहारा देत असतात, त्यामुळेच आपण देशात सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची आठवण देशाने आणि जनतेने ठेवायलाच हवी, असे विक्रमदादा आवर्जून सांगत.

आपल्याला अमकीच भूमिका हवी, असा आग्रह त्यांनी कधी धरला नाही. पण मिळालेल्या प्रत्येक भूमिकेचं त्यांनी अक्षरश: सोनं केलं. त्यांच्या किती म्हणून कलाकृतींबद्दल बोलायचं? त्यांनी मराठी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये तर भूमिका केल्याच आहेत; पण हिंदी चित्रपटाचा पडदाही त्यांनी आपल्या अभिनयक्षमतेने उजळून काढला आहे. ‘मुक्ता’, ‘हे राम’, ‘बलवान’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘परवाना’ आदी सुमारे ९० हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. मराठी व हिंदीसह त्यांनी १७ गुजराती, २ तमिळ व १ कन्नड या भाषांतील चित्रपटांतूनही काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट ऐश्वर्या आणि सलमान यांच्यामुळे लक्षात राहतो, त्याचप्रमाणे तो विक्रमदादांनी साकारलेल्या पंडित दरबार या व्यक्तिरेखेनेही स्मरणात राहतो. आपल्या अभिनयाच्या बळावरच ते अर्ध्या शतकाहून अधिक काळ चित्रपट, नाटकं यामध्ये टिकून राहिले.
परखड स्वभावाचे विक्रमदादा आपल्याला जे पटेल तेच स्पष्टपणे सांगत आणि कृतीही करत. त्यामुळे हिंदी-मराठी चित्रपटातील राजकारणापासून ते नेहमी दूर राहिले.