– देवेश कुसुमाकर कडकडे, डिचोली
इंग्रजी राजवटीबरोबर देशात दारूला प्रतिष्ठा मिळू लागली. हे विष सर्वत्र पसरू लागले. शासकीय मान्यता मिळवून खेड्यापाड्यांत दारूचे गुत्ते उघडले गेले. इंग्रजांच्या या उदार देणगीने घराघरातून प्रवेश केला. दारूच्या व्यसनापायी कित्येक कुटुंबांची राखरांगोळी झाली. खेड्यात जेमतेम एखाद्याला सही करता येत असली, तरी त्याचे हात स्वर्गाला टेकत इतके शिक्षण दुर्मिळ झाले होते. जनता अंधश्रद्धेच्या खोल दरीत सापडलेली आणि बहुतेक सर्व खेडी सावकारांच्या कर्जात पार बुडालेली. अशा या घोर अंधारात २३ फेब्रुवारी १८७६ रोजी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील शेणगाव या गावी परीट समाजात डेबू नावाचे मूल जन्माला आले. पुढे ते श्रीमंत गडगेमहाराज या नावाने महाराष्ट्रात सुविख्यात झाले. आपल्या विरक्तीने भजन कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेविरुद्ध आसूड ओढीत आणि दीनदुर्बळांची सेवा करीत आपल्या तुफानी प्रचाराने हजारो जवानांना त्यांनी सन्मार्गाला लावले.सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठी हृदयपरिवर्तन आणि जन-जागरण या मार्गानेच जावे लागेल, म्हणून त्यांनी किर्तनाच्या माध्यमाचा प्रभावीपणे वापर केला. व्यवहारातील अनेक मार्मिक उदाहरणे देऊन ते आपला मुद्दा पटवून देत. लहानपणापासून डेबूचा आवाज सुरेली होता. तो आपल्या गोड गळ्याने भजन आणि अभंग म्हणत असे. डेबूचे जन्मदाते झिंगरोजी जानोरकर यांनी दारूच्या व्यसनापायी गुरेढोरे, शेती, दागदागिने, अगदी घरातली शेवटची भांडीकुंडीही विकून टाकली. शेवटी दारूच्या व्यसनाने त्यांचा प्राण घेतला. डेबू आपल्या मातेबरोबर मामा चंद्रभानजींच्या घरी दापुर्यास राहायला आले. सखुबाई आणि डेबून मामाच्या घरी अपार कष्ट करीत आपले कर्तव्य सिद्ध करीत मामांवर आपला भार होऊ दिला नाही.
परीट समाजात मूल जन्माला आले की तो प्रसंग बकरे कापून आणि दारू पिऊन साजरा करायची प्रथा होती, परंतु डेबूने आपले मूल जन्माले तेव्हा ही प्रथा मोडून बकरा आणि दारूच्या जागी लाडू घालून बारसा साजरा केला. त्यामुळे त्याला सगेसोयर्यांच्या प्रक्षोभाला सामोरे जावे लागले. पण तो जराही डगमगला नाही. डेबूच्या मामाने सावकाराकडून कर्ज घेतले होते. व्याजाचाच डोंगर उभा राहिला होता. या कर्जाच्या दबावाखालीच मामांचा बळी गेला. हाच घाव डेबूच्या वर्मी बसला. तो दिवसेंदिवस खिन्न आणि उदास झाला व हळूहळू त्याचे मन प्रपंचापासून विरक्त होऊ लागले.
एका रात्री एक जुने फाटके कुडते अंगावर चढवून आणि एक गाडगे हातात घेऊन डेबू घराबाहेर पडला. अंतिम सत्याचा शोध खरा परमात्मा शोधण्यासाठी. मृत्यू लहान-थोर, श्रीमंत-गरीब, पंडित-अजाण हा फरक करीत नाही. हिंदू-मुसलमान असा भेदभाव करीत नाही. मग हे अनमोल जीवन असेच वाया का घालवायचे? त्या शरीराकडून आपण अपार कष्ट करून घ्यायचे. दीनदुबळ्यांच्या सेवेते राबवायचे. आपण देव या दीनदुबळ्याच्या सेवेत शोधायचा हे शरीर त्याकारणी झिजवायचे. शरीराचे सार्थक करायचे.
डेबूने अन्नासाठी दाहीदिशा भटकणारे लुळे-पांगळे पाहिले. सर्वत्र पसरलेले अज्ञान, भोळ्या समजुती त्यांच्या तीक्ष्ण नजरेतून निसटले नाही. शिक्षणाचा गंधही नाही. बर्यावाईटाची चिंता नाही. स्वच्छता म्हणजे काय याची पुसटशी कल्पनासुद्धा नाही. गुराढोरांसारखे खपणारे मजूर, कर्जाच्या ओझ्याखाली चेपली, चिरडली जाणारी दुबळी माणसे, कसा तरी दिवस पुढे ढकलणारी सुखाचे कधीही तोंड न पाहणारी असंख्य माणसे पाहिली. डेबूने निश्चय केला, या लोकांना आपण उपदेश करावा. निःस्वार्थ मनाने त्यांच्यासाठी झटावे.
एक फाटके कुडते आणि धोतर नेसून एखाद्या देवळात जायचे, तिथे अवतीभोवती कचरा घाण साठवलेली असायची. खराटा घेऊन समोरचे पटांगण झाडायला सुरुवात करायची. परीट समाजात जन्माला आल्याने स्वच्छतेची जन्मतःच आवड होती.
डेबू चंदनासारखे होते. त्यांचा परिमळ आपोआप सर्वत्र पसरतो. त्याचा डांगोरा पेटण्याची गरजच भासत नाही. हळूहळू लोकांच्या ध्यानी येऊ लागले की हा माणूस वेडा नाही. तो जगावेगळा आहे. याच्या मनात सामान्यांविषयी कळवळा आहे. दीनदुबळ्यांसाठी दया आहे. खालच्या वर्गाच्या लोकांच्या शोषणाबद्दल मनस्वी चीड आहे.
सदैव हातात गाडगे असल्यामुळे ते गाडगे महाराज म्हणून लौकीकास आले. डेबू हे नाव विस्मृतीत गेले. गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सांगत- ‘सण करा, समारंभ करा, मात्र त्यासाठी सावकारांचे कर्ज काढू नका.’ कर्ज काढून देवाच्या यात्रा करू नका. देव तिथे भेटणार नाही. देव घरीच आहे. गोरगरीबांत आहे. त्यांना मदत करा, भुकेलेल्यांना अन्न द्या. देव तेथे तुम्हाला भेटणार! देवाला नवस करून कोंबडी-बकर्यांची हत्या करू नका.’
आपल्या मुलांना शिक्षण द्या. पैसे नसले तरी काटकसर करा. कमी भावाचे कपडे वापरा. सण साजरा करू नका. परंतु मुलाला शाळेत घातल्याशिवाय राहू नका, कारण विद्या हेच मोठे धन असते. आपल्या म्हातार्या आई-वडिलांची सेवा करा. त्यांना वार्यावर सोडू नका. तसे केल्यास देव तुमचे कधीच कल्याण करणार नाही.
ते तीर्थयात्रेच्या स्थानावर जात, पण देवाचे दर्शन न घेता देवळाच्या बाहेर राहून भक्तांची सेवा करीत आणि तिथला परिसर स्वच्छ करीत. देहू, पुणे, पंढरपूर, नाशिक, त्र्यंबकेश्वर, आळंदी येथे यात्रेकरूंचे हाल होतात. म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी धर्मशाळा बांधून घेतल्या. पै न् पै त्यांनी लोकहिताच्या कार्यासाठी वापरली. त्यांचे हे कार्य पाहून गुजरातमधील सस्तु साहित्य मंडळाचे स्वामी अखण्डानंद भारावून गेले आणि त्यांनी बाबांना धर्मशाळेसाठी पंचवीस हजारांचे दान दिले. त्या काळात सोन्याचे भाव पंचवीस रुपये तोळा होता. अनेकांनी या शुभकार्याला सढळहस्ते देणग्या दिल्या, एवढी लोकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा होती.
बाबांनी गुरांची म्हातारपणी होणारी परवड पाहून त्यांच्यासाठी एक भली मोठी गोशाळा बांधली. वृद्धांची दुर्दशा पाहून त्यांच्यासाठी वृद्धाश्रमाची कल्पना सुचली. दारोदार भटकणार्या वृद्धांसाठी त्यांनी वृद्धाश्रम उभारला. मुंबईचे जे.जे. हॉस्पिटलात अनेक रुग्ण बाहेरगावातून यायचे. त्यांचे जागेच्या तुटवड्यामुळे रुग्णांचे आणि त्यांच्या नातलगांचे फार हाल व्हायचे. बाबांनी अथक परिश्रम करून निधी उभारून त्यांच्यासाठी धर्मशाळा उभारली. कुष्ठरोग्यांना त्यांच्या हातापायाची बोटे, नखे झडल्यामुळे घरची माणसे वाळीत टाकतात. त्या कुष्ठरोग्यांना बाबांनी जवळ केले. स्वतःच्या हाताने त्यांना आंघोळ घालीत, त्यांना मायेने आपल्या हाताने जेवू घालीत.
आपल्या आयुष्याचा एकेक क्षण त्यांनी सत्कारणी लावला. अखेर सतत कष्ट करून त्यांचे शरीर थकले आणि २० डिसेंबर ५६ साली या सिद्धाने शरीर त्यागले. त्यांनी महाराष्ट्रात अतुलनीय अशी लोकजागृती व लोकसेवा केली. त्यांचे सारे जीवन अलौकी आणि केवळ अमर्याद होते.