Home Featured घोगळ-मडगावात दारू दुकानाला आग, 5 ते 7 लाखांचे नुकसान

घोगळ-मडगावात दारू दुकानाला आग, 5 ते 7 लाखांचे नुकसान

0

घोगळ मडगाव येथील झुडिओ मॉलसमोरील दुमजली इमारतीतील दारुच्या दुकानाला आग लागून सर्व दुकान जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 ते 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. काल रविवारी सकाळी सव्वादहाच्या सुमारास ही आगीची घटना घडली. यानंतर त्वरित अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशामक दलाचे अधिकारी गील सौज यांनी, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात विविध प्रकारच्या दारुची घाऊक विक्री केली जाते. दुकानाच्या वरच्या मजल्यावर दारू साठवून ठेवली होती. त्याशिवाय या इमारतीत लोक रहातात. दलाने तात्काळ आग विझवण्यासाठी प्रयत्न केले नसते तर मोठा अनर्थ ओढवला असता. आग लागताच त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. या आगीत फ्रीज, फर्निचर, काउंटर, कपाटे, एसी, इत्यादी सर्व जाळून खाक झाले. तळमजल्यावर कित्येक दुकाने आहेत. आग लागलेल्या दुकानाच्या शेजारी असलेल्या दुकानाचे थोडे नुकसान झाले. या आगीमुळे 5 ते 7 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज असला तरी नेमका आकडा मिळू शकला नाही.
या दुकानाच्या मालकाने आग प्रतिबंधक यंत्रणा उपलब्ध केली नव्हती. सुरक्षेसाठी कोणतेच उपाय नव्हते असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय रहिवासी राहत असल्याने ते दुकान उघडण्यासाठी परवानगी कशी दिली गेली असा प्रश्न उभा राहिला आहे. फ्रीजमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागण्याची शक्यता आहे.