घाव – प्रतिघाव

0
34

शिवसेनेच्या दोन्ही गटांचे भव्यदिव्य दसरा मेळावे परवा मुंबईत पार पडले. उद्धव ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेच्या मेळाव्यातही शिवतीर्थ भरून टाकणारी विक्रमी गर्दी होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वांद्रे कुर्ला संकुलातील मैदानावरील महामेळाव्याने तर गर्दीचे सर्व उच्चांक मोडले. अर्थात, सत्तेवर असताना अशी गर्दी जमवणे सोपे असते. आमदार, खासदारांना कामाला लावून, शेकडो बसगाड्या भाड्याने घेऊन महारा ष्ट्राच्या दूरदूरच्या जिल्ह्यांतून ही अलोट गर्दी जमवून शिंदे यांनी आपला गट फुटीर नसून हीच खरी शिवसेना असल्याचे जगावर ठसवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. उद्धव यांच्या भाषणातील मुद्द्यांना आपल्या भाषणात तिथल्या तिथे उत्तर देण्याचा प्रयत्नही शिंदे यांनी तत्परतेने केल्याचे पाहायला मिळाले.
‘गद्दार’ आणि ‘खोके’ हे शब्द एकनाथ शिंदे गटाच्या फारच जिव्हारी लागलेले दिसतात. त्यामुळे आपलीच शिवसेना ही हिंदुत्वाच्या वाटेने जाणारी खरी शिवसेना आहे हे जनतेच्या मनावर ठसवण्यासाठी काय काय उपद्व्याप त्यांना करावे लागत आहेत. तीन दशके बाळासाहेबांची सेवा करणारा त्यांचा एकनिष्ठ सेवक चंपासिंग थापा ह्याला मेळाव्यात हजर करण्यात आले, ठाण्याच्या शेवटच्या सभेतील बाळासाहेबांची खुर्चीही परवाच्या मेळाव्यात व्यासपीठावर ठेवली गेली. शिवाय ठाकरे परिवारातील खुद्द बाळासाहेबांचे पुत्र व उद्धव यांचे मोठे भाऊ जयदेव ठाकरे, त्यांची घटस्फोटित पत्नी स्मिता ठाकरे आणि उद्धव यांचा सर्वांत मोठा दिवंगत भाऊ बिंदुमाधव यांचा मुलगा निहार ह्यांनादेखील एकनाथ शिंदे यांनी परवाच्या मेळाव्यात व्यासपीठावर आणले आणि ठाकरे कुटुंबीयही आपल्यासोबत असल्याचे ठसवण्याचा प्रयत्न केला. हा सगळा आटापिटा अर्थातच स्वतःवरील गद्दारीचा शिक्का पुसून टाकण्याच्या धडपडीचाच भाग आहे. परंतु उद्धव आपल्या भाषणात म्हणाले त्याप्रमाणे, सत्ता येईल नि जाईल, परंतु गद्दारीचा हा कलंक याजन्मी पुसला जाणे कठीण आहे हेही तितकेच खरे आहे.
ह्या दोन्ही गटांचे मेळावे यशस्वी झाले असले तरी खरी शिवसेना कोणती ह्या प्रश्नाचे उत्तर केवळ ह्या मेळाव्यातील गर्दीवरून मिळवता येणार नाही. त्यासाठी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय हीच योग्य जागा असेल. निवडणूक आयोगापुढे सध्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावरील मालकीचा मुद्दा विचाराधीन आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्यास आयोगाला अनुमती दिल्याने आयोगाने दोन्ही गटांकडून कागदपत्रे मागवून घेऊन सुनावणीला तत्पर सुरूवातही केली आहे. ही वेळकाढू प्रक्रिया असल्याने तोवर शिवसेनेचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्हच गोठविले जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाले तर दोन्ही गटांना पर्यायी निवडणूक चिन्हे स्वीकारावी लागतील. परवा शिंदे गटाच्या मेळाव्यात ५२ फुटी चांदीची तलवार प्रदर्शित करण्यात आली होती. त्यामुळे तोवर तलवार हे निवडणूक चिन्ह मिळावे असा प्रयत्न शिंदे गटाकडून होईल अशी चर्चा रंगली आहे. निवडणूक आयोगापुढील आणि न्यायालयीन लढाईत आपली बाजू जोरकसपणे मांडण्याचे आव्हान उद्धव गटापुढे आहे आणि ते मुळीच सोपे राहिलेले नाही. राज्यापासून केंद्रापर्यंतची सत्ता शिंदे – भाजपच्या ताब्यात, उगवत्या सूर्याला दंडवत घालणार्‍यांची समाजात कधीच कमी नसते, त्यामुळे शिंदे गटाचे समर्थनही दिवसागणिक वाढत चालले आहे. त्यामुळे शिंदे गटाने शिवसेनेत पाडलेली फूट ही केवळ विधिमंडळ गटातील फूट नसून ती मूळ पक्ष संघटनेतील फूटही आहे हे सिद्ध करण्यासाठी सदस्यता नोंदणी मोहीम, पदाधिकारी फेरनिवड वगैरे प्रक्रियाही शिंदे गटाने जोरात आरंभलेली आहे. परंतु हे सगळे आता सत्ता हाती आल्यानंतर घडते आहे. जेव्हा सूरत, गुवाहाटी, गोवा करीत शिंदे गट वेगळा झाला, तेव्हाची परिस्थिती काय होती, हे सर्वोच्च न्यायालयाने उद्या तपासले तर शिंदे गटही गोत्यात येऊ शकतो.
शिवसेनेतील आजवरच्या ह्या सर्वांत मोठ्या फुटीने भाजप मात्र गालातल्या गालात हसतो आहे. प्रादेशिक पक्षांशी आधी जवळीक करायची, नंतर युती करायची, एखाददुसरी निवडणूक सोबत लढायची आणि हळूहळू त्या पक्षाची मतपेढी स्वतःकडे वळवीत त्या प्रादेशिक पक्षाला संपवायचे ही नीती भाजपकडून गोव्यापासून गुवाहाटीपर्यंत कशी अवलंबिली जात राहिली आहे हे देशाने पाहिलेच आहे. त्यामुळे शिंदे गटाशी केलेली सोयरिकदेखील दीर्घकालीक संसारासाठी नाही. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिंदे गटाला वापरून घेईल, पण खरे चित्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळेला दिसू लागेल. शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मतपेढीवर घातला गेलेला हा घाव आहे. फोडा आणि झोडा ही नीती केवळ इंग्रजांपुरती सीमित नाही. त्यामुळे ह्या आव्हानाला शिवसेना कशी सामोरी जाते आणि पुरून उरते हे पाहावे लागेल.