घरून काम (वर्किंग फ्रॉम् होम्)

0
52

  • प्रा. रमेश सप्रे
    एकमात्र खरं गाड्यांचं इंधन, कँटीनचा खर्च, साप्ताहिक सफरी तसेच हॉटेलिंग, मनोरंजन कार्यक्रम नसल्यामुळे आर्थिक बचत अनेकांची झाली. आता यातील काही चांगले झालेले स्वभावबदल चालू ठेवायला हवेत. त्यांच्या साह्यानं नवीन जीवनपद्धतीतील बदल नि आव्हानं आनंदात स्वीकारायचा अभ्यास केला पाहिजे.

प्रसंग दीड वर्षापूर्वीचा. संपूर्ण संचारबंदी – कुलूप बंदीचा सुरवातीचा काळ. एकच संवाद – मित्र-मैत्रिणीतला, युवा-युवतींमधला, नोकरीवर असलेल्या सर्वांमधला. शब्द वेगळे असले तरी सूर एकच.. आनंदाचा, मजेचा, सुटकेचा. याचा संदर्भ आहे – घरून काम (वर्क फ्रॉम होम) करण्याचा. हा अनुभव सार्वत्रिक असल्याने अनेकांना नवा होता. बरेच जण जणू पगारी रजेवर, खरं तर सुट्टीवर होते.

त्या काळात काय त्या नवीन नवीन कल्पना वेळ घालवण्याच्या, नवनवीन योजना फुकट मिळालेला, घरच्या घरी घरबसल्या मिळालेला वेळ सत्कारणी लावण्याच्या! त्या काळात नवे नवे शब्द चलनात आले होते- पँडेमिक (महामारी), इम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती), क्वारंटाइन (विलगीकरण), आयसोलेशन (अलगीकरण), लॉकडाउन जणू सार्‍या देशाला कुलूप! आयुष्यात प्रथमच अशा अनोख्या अनुभवाला सारे सामोरं जात होते.
सुरवातीला एकदम सुन्न, बधीर झाल्यासारखं वाटलं. लोकल ऍनेस्थेशियासारखं! हळुहळु मनोवृत्ती सरावत गेल्या, नवी परिस्थिती अंगवळणी पडू लागली. योगसाधना, ध्यानपद्धती, विविध व्यायाम प्रकार, आहारविहारातले नवे प्रयोग, पाककृतींचे प्रकार इ.मध्ये खूप चांगले बदल घडून आले.

काही अपवाद सोडल्यास अनेकजण घरच्या मिनि-जिम्‌मध्ये नित्य कसरत करू लागले. नव्या भाषा, नवे कोर्सेस, नवी तंत्रं, नवी कौशल्यं, छंदविकास यासाठी घरी बसून छान मार्गदर्शन होऊ लागले. माहिती मिळू लागली. सारं छान चालू होतं.

काही दिवस घोषित झालेली कुलूप-बंदी पुन्हा पुन्हा वाढवली जाऊ लागली. कोविड महामारीची पहिली भयंकर लाट आली अन् आपल्याच पण दूरच्या लोकांना घेऊन गेली. नंतर आली महाभयंकर दुसरी लाट. या काळात आपल्या ओळखीची, अगदी जवळची अनेक माणसं गेली. परिस्थिती भीषण नि मनःस्थिती विषण्ण झाली. अनेकजण एकाकीपण, चिंता, उदासीनता, नकारात्मक विचार यात बुडू लागले. त्यावेळी समाजमाध्यमं, दूरचित्रवाणी (टी.व्ही.) यावरून मोलाचं मार्गदर्शन बिनतोल म्हणजे मोफत होऊ लागलं. सगळ्या समाजाचं मनोधैर्य टिकवण्यासाठी अनेक कल्पक योजना राज्य नि राष्ट्र पातळीवर अंमलात आणल्या गेल्या.

या वेळेपर्यंत वर्क फ्रॉम होम् अगदी रुटीन झालं होतं. त्यात तोचतोपणा आल्यामुळे काहीसं कंटाळवाणंही झालं होतं. त्यातला थरार, नव्हाळी लोपली होती. या घरून काम करण्याच्या पद्धतीमुळे इतर समांतर होत असलेले फायदे लाभदायक वाटेनासे झाले. पूर्वी घरून काम करण्यासाठी निश्चित (फिक्स) किंवा लवचिक (फ्लेक्सिबल्) कामाचे तास होते. नंतर काही ठिकाणी कामचुकारपणा, शॉर्टकट्‌स यामुळे एकूणच कामातील आधीचा उत्साह कमी झाला होता. तो अशा संवादातून झिरपत होता.
‘हाय! व्हॉट डुइंग? व्हॉट् हॅपनिंग?’ ‘नथिंग एक्सायटिंग याऽर!’
‘बोअरिंग रुटीनची सवय झाली तर ती आपल्या जीवनासाठी भयंकर घटना ठरेल’. ‘काम करावंसंच वाटत नाहीत’- असे संवाद बहुधा – सरकारी नोकरीतील कर्मचार्‍यांचे असत.

तर खाजगी कंपन्यात, विशेषतः आय्.टी. क्षेत्रात काम करणार्‍या कॉर्पोरेट संस्कृतीतील युवा वर्गात, ‘टोटली फ्रस्ट्रेटेड यार!’ ‘पूर्वी आपल्या सोयीचा फ्लेक्सी – टाइम असायचा. आता जणू आपले दिवसाचे चोवीसही तास विकत घेतल्यासारखं काम करावं लागतं. पूर्वी इंटेल या कंपनीची एक जाहिरात असे – ‘इंटेल ‘इन’् नि त्या कंपनीत काम करणारी व्यक्ती ‘आउट’् म्हणजे दिवसभर घराबाहेर. आज ‘सारं इन्’ होत चाललंय. तारेवरची कसरत करावी लागते सर्वांना.

त्यामुळे अगदी घरबसल्या पगार मिळाला तरी त्यात मजा उरलेली नाही. मुख्य म्हणजे वीक् एंड पार्टीज, गेटटुगेदर्स, विविध इव्हेंट्‌स, डान्स- ड्रिंक्स्- डिनर सारं शून्यावर आलंय. जीवनात कोणताच चार्म उरलेला नाही.
आता हळुहळू ऑफिस, कारखाने, व्यापारी कंपन्या यांचा प्रत्यक्ष काम करण्याचा प्रवाह सुरू झालाय. पण अजून त्यात जान नाहीये. ‘घरून काम करण्याचा’ हँग ओव्हर टिकून आहे. यामुळे सध्याच्या नव्या काळात पूर्वीसारखं कार्यजीवन किंवा कार्य-संस्कृती अजून अवतरलेली नाही.

आता संवाद पुन्हा बदललेयत. काळ फार दूरचा नसला तरी ‘घरून काम करताना घालवलेल्या दिवसांचं स्मरणरंजन सुरू झालंय.
‘काय छान जीवन होतं नाही, घरून काम करण्याच्या काळातलं!’
‘अहा ते सुंदर दिन हरपले!’ हे उद्गार अर्थातच पन्नाशीनंतरच्या ‘वयस्थितीत’ असलेल्या प्रौढांचे. त्या काळात सर्वांचे खर्चच (पैसे) वाचत नव्हते, तर शक्तीही वाचत होती. अर्थात् शक्तिसंचय कितीजणांनी केला हा संशोधनाचा विषय आहे. एकमात्र खरं गाड्यांचं इंधन, कँटीनचा खर्च, साप्ताहिक सफरी तसेच हॉटेलिंग, मनोरंजन कार्यक्रम नसल्यामुळे आर्थिक बचत अनेकांची झाली. आता यातील काही चांगले झालेले स्वभावबदल चालू ठेवायला हवेत. त्यांच्या साह्यानं नवीन जीवनपद्धतीतील बदल नि आव्हानं आनंदात स्वीकारायचा अभ्यास केला पाहिजे.

एक नक्की लक्षात ठेवायला हवं की आता कोविडपूर्व परिस्थिती येणं जवळजवळ अशक्यच. ‘बॅक टु नॉर्मल’ कठीणच. पण ‘न्यू नॉर्मल’शी जुळवून घेणं जमायला हवं. त्यासाठी संकल्प नि प्रार्थना करु या. नवजीवनाच्या नवस्पंदनांशी तारा नि सूर जुळवूया. नवनवे राग आळवू या. असं करणं स्वतःच्या – घराच्या – कार्यक्षेत्राच्या- देशाच्या- जगाच्या दृष्टीनंही आवश्यक आहे. बघा विचार करून.